दिवाळीच्या आठवणी............!



टेलीव्हिजनवर सध्या सुरु असलेल्या एका साबणाच्या जाहिरातीने २० ऐक वर्षांपूर्वीच्या त्या दिवाळीच्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या केल्या. आणी ती दिवाळी मला जशीच्या तशी आठवली ………………पहाटे ३ च्या पहरी उठून. पहिल्या आंघोळीचा (अभ्यंग स्हान ) नंबर लागावा म्हणून आम्हा भावंडात स्पर्धा लागत असे कोण पाहिलं उठून अंघोळ करतंय आणी अंगणात सुतळी बॉम लावून दिवाळीची सुरुवात करणार यात च
. ढाओढ असायची. दिवाळीच्या पहाटेचा माहोल सुगंधी उटण्याने अधिक मोहक होत असे . बोचणाऱ्या थंडीत चुलीवर तापणार पाणी , पाट्यावर वाटलेला ओल्या खोबऱ्याचा रस , न्हाणी घरात लावलेला मिणमिणता दिवा , माजघरात धावती रांगोळी काढून त्यावर मांडलेला पाट , आईने अंगाला घसघसून लावलेलं ऊटण , निरांजनाची ओवाळ आरती . त्या अपार थंडीत हे सगळे सोपस्कार पार पडेपर्यंत गारठून न्हाणी घरात धावत जात अंगावर ओतलेला गरम -गरम पाण्याचा भरला तांब्या, खास पहिल्या अंघोळीसाठी आणलेल्या महागड्या साबणाचा तो मलमली फेस आणी त्याच्या उंची सुवासात अंगभर पसरलेला तजेला अक्षरशः ओतू जात असे . आणि मग उजव्या पायाच्या अंगठ्याने कारेटा फोडून कधी एकदा फटाके वाजवायला अंगणात जातोय असं होई. त्या कळात आत्ता सारखे उंची कपडे घालण्याचा सोस आम्हाला न परवडणारा होता. काहीतरी नवीन घालावं म्हणून मला sando banyan , बहिणींना गाऊन, बाबांना टॉवेल आणी स्वतः आईला एखादा ब्लावूज पीस इतकीच काय ती कपड्यांची खरेदी . …………………… आज अंगावर ब्रान्डेड कपडे घालतांना जितका आनंद मनात दाटतो त्यापेक्षा कईक पटीचं समाधान आईने आणलेल्या त्या sando banyan मध्ये अनुभवता येई. दारातल्या त्या मोजक्या चार पणत्यांचा लखलखाट आजच्या भरगच्च पणत्यांची रोषणाई दिपवून टाकणारा होता. बाबांनी शंबर- दीडशे रुपयात दोन पिशव्या भरून आलेले फटाके वाटून घेतांना झालेली वादावादी आणी मग अर्चू ताईने मध्यस्थी करत . तिच्या वाटणीचे दोन चक्र , दोन पाऊस आणी वर एक फुलबाजाचा बॉक्स माझ्या वाट्यात घातला कि मी काय खुश होत असे माझ्याकडे जास्ती फटाके आल्याचा हर्शील तरंग सरसर करीत उंच जाणाऱ्या मोर छाप पावसा प्रमाणे दिवाळीभर जाई.हेच फाटके तुळशीच्या लग्नापर्यंत पुरावे म्हणून अगदी लवंगी बारची माळ सोडवून त्यातला एक एक फटाका मोकळा करून वाजवायचा. फुसक्या निगलेल्या फटक्यांना उन्हात तापवून पुन्हा त्यांना वाजवी करणं अशा ऐक ना अनेक युक्त्या काढत आम्ही फाटकेबाजी करत असू.
फराळाच म्हणाल तर आईने घरात केलेल्या चकल्या , करंज्या , लाडू ,आणी चिवड्याने भरलेले लक्ख घासलेले पितळी डबे स्वयंपाक घरातल्या फळीवर ओळीने मांडून ठेवलेले असत. नेमक्या याच दिवसात शेतीची कापणीच्या कामांची लगबग असे दिवसा शेतात राबूनही ती एक हाती रात्री उशिरा जागून त्या दिवशी ठरलेला पदार्थ पूर्ण करी सणासुदीच्या दिवसात माझ्या पोरांना लोकांच्या तोंडाकडे बघत बसावं लागू नये हा तिचा त्यामागचा उद्देश …………. ! गेल्यावर्षी मी फराळ विकत आणला तेंव्हा ती म्हणाली विकतच्या फराळात घरगुती गोडवा नसतो रे …………. पण ना इलाज म्हणून तिनं ताट भरलं .चवीला असूनही त्या विकतच्या फराळात आईच्या हातचा रुचकरपणा मात्र नव्हता.…………………… दिवाळीतला आणखी एक महत्वाचा दिवस तो म्हणजे भाऊबीज मला एकूण ५ बहिणी त्याकाळात यावेळी गृहपयोगी वस्तू घेण्याची पद्धत होती. नेमक काय घ्यायचं हे आई ठरवी. ………. यांस कडून ………यांस भाऊबीज सप्रेम भेट. अशी नावं घातलेली पाण्याची टाकी, मांडणी, परात , ग्लास, ताटं, डिश , वाट्या अशी भांडी ,यातली कोणतीही वस्तू आजही कधी नजरेत आली तर तेंव्हाचे ते क्षण सस्निल आठवतात. ………… काळानुसार त्या त्यांच्या सासरी गेल्या आणि आम्हा भावंडांनी भरलेलं घर काहीसं सुनं झालं. प्रत्येक सणाला त्या सगळ्यां भेटतीलच अस नाही. पण त्यांचा नुसता फोन आला तरी बरं वाटतं. technology मुळे निदान हि सोय उपलब्ध झालीये.शेवटी वेळ आणि माणसाचं आयुष्य कायम बदलत असत. .पण आठवणी कधीच न बदलणाऱ्या असतात.

शेवटी रांगोळीत जितके ठिपके तितकी ती कठीण आपलं जगणंहि अश्याच असंख्य ठिपक्यांनी विभागालय गरज आहे. यांना जोडणाऱ्या नात्यांच्या आणि मैत्रीच्या अंधुक रेश्यांची बाकी रंग तर आपसूकच भरले जातील नाही का ?
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा !! शुभ दिपावली !!

No comments:

Post a Comment