कुणाचे भीमराव……… !





उद्या ६ डिसेंबर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या साधकांची वर्दळ मुंबईभर दिसून येतीये. महाराष्ट्राच्या खेड्या पाड्यातून आलेले हे अनुयायी सध्या मुंबई दर्शन करतांना तुम्हा आम्हाला दिसले असतीलच ट्रेन आणि बस मधले यांचे जत्थे विशेष लक्ष वेधून घेतायत .उठून दिसणारा त्यांचा पेहराव ,त्यांची भाषा आणि एकंदरीत त्यांचं वागणं कडक इस्त्री असलेल्या मुंबईकरांना  नेहमीच खटकत  - ६ डिसेंबर आला कि कशाला येतात हे बाबा वाले मुंबईत . हा बहुचर्चित सवाल  . आज पुन्हा एका सहप्रवाशांनी केला. आणि मलाही पडलेल्या या प्रश्नाचा शोध पुन्हा एकदा सुरु झाला. ८ ते ९ जणांच्या ग्रुप मधल्या एका active तरुणाशी बोलायचं ठरवलं आणि सुरवात झालीही नाव -गाव आणि इतर चर्चा करता -करता अपेक्षित प्रश्न पुढे सारत मी मोकळा झालो . बुलढाण्याहून आलेल्या धर्मराज ने दिलेलं उत्तर - साहेब तुम्ही कोणत्या समाजाचे मला माहित नाही. पण हा प्रश्न कधी तुम्ही पंढरपुरला जाणाऱ्या वारकऱ्याला  इचारलाय . ? नसलच इचारला मग का म्हणून आमी या प्रश्नाचं उत्तर दिल पाहिजेल . त्याच्या सोबतच्या इतर पोरांनी भाऊ एव्हडा का तापलाय म्हणून माना फिरवल्या . आणि धर्मराजच्या चढ्या आवाजाने इतर प्रवाशांनीहि आमच्याकडे कटाक्ष टाकला . काहीवेळ तो खूप बोलत राहिला माझ्या प्रश्नाला तो इतका भडक प्रतिसाद देणार याची कल्पना होतीच मला अपेक्षित असलेलं उत्तर त्यानं दिलं नाही याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही . पण बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेल्या या समाजतल्या कित्तेक तरुणांना मी असंच बेभान होऊन बोलतांना पाहिलंय मुळात मी समाज वेगरे मनात नाही .  माणुसकीचा धर्म आणि हितवादी विचारांची जात अधिक महत्वाची आहे माझ्यासाठी .धर्मराज आमचे बाबासाहेब ,आमचा समाज,आमच्यावरचे अन्याय अशा अनुषंगाने खूप बोलला पण त्याचा बोलघेवडेपणा अधिक काळ टिकला नाही . "तुमचे बाबासाहेब ते आमचे कोण" ? या प्रश्नाला तो गोंधळाला ओढाताण करूनही त्याला यावर प्रतिवाद करता येईना. मुळात आमचे - तुमचे अशी आपण महापुरुषांची  विभागणी करूच कशी शकतो. ज्यांनी जातीपातीच्या भिंती पडल्या आणि समतेचा संदेश दिला त्या राष्ट्रीय संताना आपण समाज आणि जातीच्या कुंपणात का अडकवलय. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच स्मारक बांधताय मग इंदू मिलच्या जागेवर बाबा साहेबाचं स्मारक झालंच पाहिजे या भावनिक मागणीवर संधी साधूपणा करणाऱ्या नेत्यांना  आपण का ?  मोठं करतोय.  महाराज आणि डॉ आंबेडकर याचं स्मारक बांधून नवी दुकानदारी सुरु करण्यापेक्षा हा निधी महाराजांच्या असलेल्या गड - किल्यांच्या डागडुजी साठी वापरावा . गडावरील  नैसर्गिक झऱ्याच्या पाण्याला तहानल्या जनतेपर्यंत पोहचवा. खेड्या -वाड्यात लाल मातीच्या  रस्त्यावर एक थर का होयीना डांबर घालावा  , माळ रानावरच्या झोपडीत विजेच्या दिव्याने प्रकाश पोहचावा , भूक भूक करत मारणाऱ्या कुपोषितांना दोन घास मिळवून द्यावेत ,वेशीबाहेर आजही कुड्याच्या भिंतीचा आडोसा करत हलाकीत दिवस काढणाऱ्या उपेक्षित , दलित , भटके  म्हणून दूर सरलेल्यानां निदान त्यांच्या हक्काचं घर  मिळवून द्याव , धर्मराज सारख्या तरुणांच्या हाताला काम उपलब्ध व्हावं  अशा मागण्या आपण का लावून धरत नाही. 

शिवाजीपार्कच्या उद्याच्या गर्दीत प्रत्येकाच्या मनातले भीमराव बहरुन येतील. आंबेडकरी साहित्याच्या पुस्तकांचा विक्रमी खप होईल, स्वतःला दलित नेता म्हणवणाऱ्या पुढाऱ्याची इंट्री पाहायला माना उंचावल्या जातील. साहेबमय झालेला दिवस गबजुन संपेलहि ……………. आणि आलेलि पावलं पुन्हा वळतील माघारी आप -आपल्या ठिकाणावर गाड्या पुन्हा गच्च होऊन मुंबई बाहेर जातील. ६ डिसेंबर च्या मुहूर्तावर सुट्टीवर गेलेले शिवाजीपार्क वाले मुंबईत दाखल होतीलं पार्कात पुन्हा पहिल्या सारखं रुटीन सुरु होयील. पण तुमच्या आमच्यात वाटलेले भीमराव मात्र चैतभूमीवर कायम वाट पाहत असतील समतेच्या वाटेनं येणाऱ्या त्या असंख्य बांधवांची. 

जय भीम !!!


- संतोष टाकळे
Sanntosh Taakale