कामकरणी बायां ......!


बहुतेक वेळा ऑफिसला जाताना सकाळी जी 9:30 ची बस पकडावी लागते ती साऊथ मुंबईतल्या नेपेन्सी रोड ,वॉर्डन रोड अशा उच्च भ्रु इल्याक्यातून जाते आणि म्हणून या बस ला बऱ्याच कामकरणी बायांची वर्दळ असते.आता खुप वेळा एकत्र प्रवास केल्याने यातल्या काहीजणी चेहऱ्या ने ओळखीच्या झाल्यात.थोडिफार विचारपूस ही होते अधन मधन पण आज झंकारे बाई भेटल्या.आणि त्यांनी मोरे बाईँ बद्दल वाईट बातमी दिली. तीन दिवसांपूर्वी त्या म्हणे हृदयविकाराच्या झटक्याने गेल्या. त्यांचा चेहरा झरकन समोर उभा राहिला .जबरी बाई एकदम.......कधी बस प्याक असली आणि लोक पुढे सरकले नाहीत तर ह्या बाई एका दणक्यात त्यांना जागेवरुन हालवत. कुठून येतात मेले मुंबईत गर्दी वाढवायला हा त्यांचा पेटंट डायलॉग भारदस्त बांधा आणि तितकाच पहाडी आवाज . बोलायला लागली की समोरच्याला गार करील ... नेपेन्सी रोड ते पेडर रोड अशा एकुण 3 ठिकाणी तिची काम .
तिची बोलायची स्टाईल म्हणजे - बघा साहेब सकाळी 9.30ला घर सोडल की डायरेक्ट संध्याकाळी 4 ला आपण घरी परत. एकतर आपल्या कामात किटकिट नाय ,एकदम क्लीन काम करतो आपण ,स्वतःच्या मेहनीतीवर जगतो. आजवर कुणाची बंद्या रुपायाची देनेकरीन नाय,तसा सोन्याचा घास हाय ताटात ... पण सुख नाय हो ,पोरगा उनाड निघाला बापानं मधी कुठं दलाली केली त्याचे एकदम पैसे भेटले त्यात त्याला गाडी घेऊन दिलानं . पोरगा दिवसभर गाडी फिरवतोय आणि त्याच्या बापाचा पाय काय घरात टिकत नाय .....काय करनार बोला एकट्या बाईनं घर चालवू सणवार बघू , नात्या गोत्यातली कार्य करू आणि हा रोजचा काम तर पाचवीला पुजलेला . मी पण आता ठरवलय बिंदास जगायचा कुठ ह्या मेल्यांच्या माग लागत्ताव .गेल्या दिवाळीत तिरुपती करून आली .आमच्या इथ एक तेलगु हाय तो घेऊन गेला होता .40 माणस होतीव सगळी .....ह्या कटकटीतन बाहेर पडली जरा बरा वाटला .या दिवाळीत वैष्णव देवीला जाणार हाय अर्धे पैसे देवून झालेत अर्धे बाकी हायत... जरा पोरग्याचा नीट लायनिवर आला असता ना म्हंजे .... . इतक्यात तिचा स्टॉप येणार असतो .मग ती समोरच्या सीटवर हात टेकत उठते...... साहेब बोल्ला चालला काय नाय हो . चला भेटु पूना
वयाची उतारी आली तरी धूणी -भांडी करणाऱ्या ह्या बाया आणि दोन वेळच आयत मिळतय म्हणून घरात लोळणारी त्यांची हि उद्दाम पोरं ...... आपल्याला नुसतं ऐकून इतका मनस्ताप होतो.त्याना तर किती लागत असाव हे रोज डोळ्यां समोर बघून....इतका वयात आलेला पोरगा पण चार पैसे कमवत नाही. ह्याच पुढे नक्की काय होणार या विचारान किती अस्वस्थ असतील ह्या बाया आतून.... आणि त्यात नवऱ्याचा ताप तो वेगळा.
मालकीणीची भांडी घासुन लक्ख चमकवणाऱ्या ह्या हाताना स्वतःच जगण मात्र उजळवता येत नाही.

© Santo