रेशनिंग दिवाळी.

 


दिवाळी पंधरा एक दिवसांवर आली की रेशनिंग वर डाळ -साखर-पामतेल -रॉकेल आलय का याची चौकशी करायला आई एक दिवसाआड पाठवत असे . सोबत रेशनिंग कार्ड -चार पाच पिशव्या आणि रेशनच्या हिशोबाने पैसे  ..... कुणास ठाऊक आलंच असेल रेशन तर लगेच पावती करायच्या लायनीत नंबर लाव.नाहीतर पुन्हा घरी येवून पैसे घेऊन जाते पर्यंत लाईन पार चिंचेखाली पोहोचायची आणि  मग काय दुपार शिवाय आपला नंबर लागनार नाय.

एक तर सुट्टीच्या काळात  खेळाच्या  रंगात असतांना आता कुठ मरायला रेशन वर जायचं म्हणून थोड़ासा वैताग यायचा पण मग बाबांच्या शिव्या कोण खायील म्हणून ना इलाजास्तव सायकलला पिशव्या लटकवत जावच लागे. ......अशा सतत दोन चार हेलपाटे घातले  की मग रेशनिंग वालाही वैतागायचा आणि अंगावर येत म्हणायचा अरे गाड़ी आली नाही रे अजुन येईल उद्या -परवा......... की अस करू तूझी पावती करून घेतो आणि आधी ट्रक तुझ्या घरासमोर उभा करुन माल तुला देतो आणि मग गाड़ी दुकानाकडे फिरवतो ...........या अशा खोचक बोलण्याचा प्रचंड राग यायचा तेंव्हा वाटायच रॉकेलचा रिकामा कँन डोक्यात घालावा त्या म्हाताऱ्याच्या .....पण गरज आपल्याला आहे त्याला नाय म्हणून गप बसावं लागायचं ..........अशात एक दिवस वैतागत रेशन दुकानावर गेल्यावर ताड़पत्री मारलेला मोठा ट्रक रेशनदुकाना समोरून वळतांना दिसयचा आणि जीव भांड्यात पडायचा. सायकल धकाड्याला टेकून उभी करत पिशव्या काढीत एका दमात पावतीची लाईन धरायची . अजून अर्धा- एक तास लागेल पावत्या करून बाहेर बसा पोती लावून त्यांची नोंद करायला वेळ जाईल. टिपिकल ब्राम्हणी हेक्यातला तो आवाज ऐकून पावत्या करून घुटमळणारे बाहेर येत बोरीच्या सावलीत बसत. उन्हं  तशी वर येत असायचीत म्हणजे ११ वाजले असतील हा अंदाज तंतोतंत खरा निघायचा रस्त्यावरून जाणाऱ्याला विचारलं काका किती वाजले कि तो म्हणायचा ११ ला ५ कमी.  साडेअकराच्या सुमाराला  दुकानातला गडी बाहेर येत चला पावतीच्या नंबरांन लाईन लावा म्हणत दुकानाची झडपं उघडायचा . कि मग काहीकाळ विसावलेली गर्दी पुन्हा उसळत सळसळायची आणि रांग व्हायची . साखरेला आणलेली मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या , रॉकेलचे कँन, गहू -तांदळासाठीच्या सिमेंटच्या गोण्या भराभरा बाहेर निघत . तिकडं तागडीवर असलेला दिन्या उग्गाच भाव खायचा धान्य जोकतांना इतकी घाई करायचा कि ५० -१०० ग्रॅम कमीच जोकलं जाई . पिशवी अशीच धर, कँन असाच पकड अशा त्याच्या उद्धट ऑर्डरी ने डोक्यात जायचा तो . ..... वर्षभर पडीक असलेला हा दिवाळीत इतका डबल भावात का येतो याची चीड यायची. पण इथेही सालं तेच आपण गरजवंत . इतकी सगळी उलटा पालटी करून शेवटी हातात आलेल्या चार पिशव्या आणि पाच लिटर कँनच्या रॉकेल मध्ये दिवाळी आली हो चा सॉलिड फील येई . त्या ५०-६० रुपयांच्या रेशनमधे  सणासुदीचा आनंद खच्चून भरलेला असे .
काल कागदपत्र शोधताना फायलीत फोल्डर मध्ये अडकवलेला रेशनिंग कार्ड पाहिला आणि एकेकाळी याच्या बारीक चौकटीत युनिट मांडत सरकारी पावतीवर कित्तेकांच्या घरातल्या धान्याची नोंद होई तो त्याचा जुना काळ आठवला आजही अनेकांच्या आयुष्यात रेशनकार्डला तितकंच महत्व आहे. पण इतकी वर्ष उलटूनही आज देखील रेशनवरच्या धान्याचा दर्जा मात्र सुमारच आहे. सरकारी अनुदानात मिळणारं ह्या धान्याची किंमत लॉकडाऊन काळात अधिक अधोरेखित झाली आहे. या काळात सरकारने दिलेल्या मोफत धान्यांमुळे अनेक कुटूंबाना दिलासा मिळाला हे मान्य करावं लागेल.  
बाकी हल्ली सुपर मार्केट , बिग बझार , डी मार्ट च्या खरेदीत वस्तू घ्यायला नाही तर पैसे द्यायला लाईन लावावी लागते .आणि इथल्या शॉपिंगच्या फ्री होम डिलिवरी , discounts, स्पेशल ऑफर्स, बंपर सेल ,etc etc ने ट्रॉली कितीही फुल्ल झाली. तरी यार त्या सायकलवरच्या चार पिशव्या रेटत रेशन घेऊन घर गाठतानाची मज्जा काही औरच होती . अर्थात जुन्या दिवसात नुसतं गुंतायच नाहीये पण आठवणी इतक्या लक्ख प्रकाश देणाऱ्या असल्या कि भूतकाळ सहसा अंधारात ठेवता येत नाही .त्याला निमित्त मात्र लागतं फुलबाज्या तुड -तुडायला पणतीची पेटती वात लागवी अगदी तशी .
© संतोष टाकळे .