स्पर्धा - बक्षिसं ……… !



स्थळ मराठी शाळेचं सभागृह ……… दाटी वाटीने बसलेली मुलं. आमच्या नरवणकर आणि सैतवडेकर बाई मुलांना रांगेत बसवण्याच्या गडबडीत ………. काहीवेळातच मुख्याध्यापिका फाटक बाई पाहुण्यांच्या सोबत सभागुहात प्रवेश करतात . निळा फ्रॉक घातलेल्या पोरी आणि खाकी प्यांट पांढरा शर्ट घातलेली पोरं ताड्कन उठतात आणि संमिश्र घोगऱ्या स्वरात एक साथ नमस्ते म्हणतात.………… कार्यक्रम सुरु करायचा का ? फाटक बाई असा इशारा तलाठी गुरुजींकडे पाहत करतात ………. गुरूजी मानाने होकार देतात ………. ज्यांची जयंती किवां पुण्यतिथी असेल त्यांच्या प्रतिमेला हार घालणं समई लावणं असं साग्रसंगीत सुरु होतं ……… प्रास्ताविक -पाहुण्यांची ओळख …… ( अशावेळी पाहुण्यांचा चेहरा भलताच उजळलेला असतो. ) एव्हडे सोपस्कार उरकले कि मग मुलांची भाषणं………. या मुलांना बहुदा पुढच्या रांगेत बसवलं जातं ………… भाषणाचा कागद काढून त्यांची घोक्कम पट्टी सुरु असते. पहिल नाव कुणाचं पुकारतील याची धडधड छातीत चालू असते. बाई पण डोकं लावून त्यातल्या त्यात चागलं बोलेल त्याचं नाव पुकारतात ( उगाच पाहुण्यांसमोर शोभा नको )

आणि सुरवात होते . ……………… अध्यश महोदय आणि जमलेल्या ,माझ्या बाल मित्र मैत्रीनीनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल जे चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने एकूण घ्याल अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या भाषणाला करतो. टिळकांच पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक त्यांच्या वडिलांचं पुर्ण नाव ………………………. भाषणाची टेप सुरु होते. मध्ये कितीक वेळा उम्म्म्म्म्म्म्म्म्म उम्म्म्म्म्म्म्म्म करून एकदाचं भाषण शेवटच्या टप्यात येत समोर काही मुली एकमेकींच्या वेण्या ओढत असतात. काही टवाळ पोरं भाषणं करणाऱ्याचं लक्ष विचलित करण्याकरिता टिवल्या बावल्या करत असतात …बोभाटे गुरुजींच्या ते लक्षात येत. ऐरवी त्यांनी त्या पोरांच्या पाठीत जाळ काढला असता. पण पाहुण्यांकडे एक नजर पाहत पोरांना डोळ्यांनीच राग भरतात …………. एका मागो मग एक १० - १२ भाषणं ऐकणाऱ्या पाहुण्यांचा सुरवातीचा उत्साह बारगळतो. पहिल्या दोन चार पोरांना ते दाद देतात . चागलं बोलली ती विध्यार्थिनी………. , या मुलाच्या भाषणात दम होता. खूप हुशार आहेत बाई तुमची मुलं ………… अशी काही ठरलेली वाक्य …………. टाकून पाहुणे त्यांची कामगिरी बजावतात . पण सलग दिड तास मुलं अध्यश महोदय ………… अध्यश महोदय ……… म्हणत पाहुण्यांना वात आणतात. पाहुणे मेतकुटिला आले असतानाच कुणी तरी जाहीर करतं हे शेवटचं भाषण …………. हुषषष करत सगळेच एकदा घड्याळ्यातल्या काट्यांची हालचाल पाहतात. पाहुणे उशीर झाला म्हणून कुजबुज करतात. साहेब आता अगदीच थोडा वेळ घेणार आहोत तुमचा …………… बक्षीस समारंभ अगदी थोडक्यात उरकूया म्हणत मुख्याध्यापक बाई पाहुण्यांना गळ घालतात ……………… हत्ती गेला आणि ……… राहिलं म्हणत तेही कढ काढतात. पोरांचीही चुळबुळ कमालीची वाढलेली असते . लोकमान्य टिळक आणि त्यांचा जीवनपट एव्हाना पोरांच्या डोक्यात घोंगावत असतो. सरकारचं डोकं ठिकाणावर असो वा नसो पोरांची डोकी आउट झालेली असतात. अपेक्षे प्रमाणे करमरकरांचा अमोल पहिला नंबर उडवतो …………दुसरा बोधे नावाची मुलगी तिसरा टाकळे आणि इतर उत्तेजनार्थ . ….

गमतीचा भाग सोडला तर शाळेतल्या अशा स्पर्धेतूनच विद्यार्थी घडतो. अडखळत भाषण करणारा पुढे वक्ता होतो. मैदानात ढोपरं फोडून घेणारा - खेळाडू , समूहगान करणारी - गायिका , शाळेतल्या पहिल्या भाषण स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसात कदाचित आजचा मी दडलो असेन. काळ्या फळ्यावरच्या अक्षरांना पुसलं तरी त्यांचा व्हाइट मार्क अंधुकसा राहतोच …………. अंगणवाडी - शाळा - महाविद्यालय या दीर्घ प्रवासात शाळेतले काही दिवस न पुसता येणारे अगदी त्या व्हाइट मार्क सारखेच.

- संतोष टाकळे

No comments:

Post a Comment