`````````२४ तासांत मुसळधार `````````





कोकणात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडतोय सकाळी बाबांनी दिलेल्या माहिती नुसार रात्री पासूनचा पाऊस चांगला टिकून आहे . शेतात गुडघाभर पाणी साचून खलाटी( भातशेती जमीन ) तुडुंब भरली आहे . राज्यात अनेक ठिकाणी म्हणावा तसा पाऊस नसतांना कोकणात मात्र सालाबाद प्रमाणे पावसाची खास मर्जी दिसते आहे . दरवर्षी इतका पाऊस असतांनाही गेल्या ५ -६ वर्षांपासून दापोलीत उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष असत .लग्न समारंभात अनेकांना पाणी विकत घ्यावं लागतं .याउपर यंदा तर दापोलीच्या आपल्या विहिरीतल्या पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबवण्या साठी चक्क कंपाउंडला टाळ लावावं लागलं अर्थात इतक्या वर्षात हे कधी करावं लागलं नाही म्हणून हा प्रकार क्लेशदायक होता . आईला म्हटलं काढ टाळ लोक पिण्यासाठी पाणी न्यायला आपल्या दारात येत असतांना आपण त्यांना पाणी नाकारणं योग्य नाही . अर्थात लोकही तळ गाठलेल्या विहिरीतलं पाणी बेतानं काढत नाहीत आणि त्यानं गाळ उसळून सगळंच पाणी गढूळ होतं हा तिचा आक्षेप रास्त होता.

मुळात लोकवस्ती वाढते आहे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोकं दापोलीत नोकरी धंद्या निमित्त येतात आणि इथंच स्थायिक होतात. मिळेल तिथे जागा घेऊन घर बांधली जातायत . डोंगर च्या डोंगर लोकांनी पोखरून त्यात इमले बांधले आहेत. शिवाय पाण्यासाठी जो तो विहारी खणतोय बोर मारतोय पाण्याचं विभाजन त्या त्या नुसार होणं नैसर्गिक आहे . पण सोबतच पाण्याचं नियोजन करण्याचं गांभीर्य मात्र इथल्या शिकल्या सावरल्या लोकांत नाही . त्यामुळं" निसर्ग देतोय आणि गटारात जातंय " असली इथली अवस्था .

शोष खड्डे , Rainwater Harvesting, पावसाच्या पाण्याचे संधारण,जुन्या विहिरींचे पुनर्जिवन , गावातल्या नदी नाल्यांवरचे बंधारे मेंटेन करणं त्यात होणारं प्रदूषण थांबवणं , सध्या अस्तित्वात असलेल्या धरणांची क्षमता वाढावी म्हणून त्यातला गाळ काढणं त्यांची खोली वाढवणं हे प्रशासनाचं प्रायोरिटी वर्क आहे .जे आजही फक्त formality म्हणून केलं जातं, अशा अनेक गोष्टी करण्यालायक आहेत आणि त्या येत्या काळात अतिआवश्यक होणार आहेत . उन्हाळ्यात स्वतःचा ब्यानर लावत टँकर फिरवणाऱ्या नगरसेवक , ग्रामपंचायत सदस्य आणि अगदी आमदारांनी देखील टँकर मुक्त मतदार संघ ही नवीन योजना हाती घेण्याच सिरियसली मनावर घ्यायला हवय.

पिण्याच्या पाण्याला टाळ लावण्याची वेळ आली तरी आपण अलर्ट होणार नसलो तर पुढे पाण्यासाठीची वणवण अटळ आहे .

जिथं मिळतंय तिथं जिरवलं आणि वर्षभर पुरवल कि साठलेल्यात वाढ होईल. नाहीतर कोकण सुद्धा एकदिवस ओसाड होईल.

*फोटो सौजन्य - गुगल 

© Santo 




कट टू कट .......!


शाळा सुरु होउन अगदी नियमित वर्ग सुरु झाले तरी आमच्या वह्या बाजारात असत .वर्गावर बाई आल्या की कुणी कुणी त्यांच्या विषयाला वही घातली नाही त्यांना उभ करत .....खाकी कव्हर त्यावर स्टिकर वैगरे लावून अपटुडेट आलेली पोर मग आमच्याकड़ बघुन फिदिफिदि हसत. बाईनी पट्टी टेबलावर आपटली की पुन्हा वर्ग शांत होई. अरे घाला रे वह्या लवकर मला व्याकरण सुरु करायचय ते काय तुम्ही कच्चा वहित उतरवुन घेणार का ? बाई ह्या वहित लिहतोय सध्या नविन वही आली की मग त्यात लिहून काढिन .हातात जाड्सर असलेल्या बायडिंग(मागच्या वर्षी उरलेल्या कोऱ्या पानांची कोलार्ज करून घेतलेली जाड जुड़ नोट बुक) च्या वहीकड़े एक काटाक्ष टाकत बाई खात्री करून घेण्याकरीता वही घेवून बोलवत( मुळात आपला रेकॉर्ड इतका चांगला नसल्याने त्या रिस्क घेत नसाव्यात. )प्रत्येक विषयाला किमान तीस एक पानं आणि विषयानुसार सेप्रेट सेक्शन करायला पहिल पान दुमडून त्यावर मोठ्या अक्षरात भूगोल -इतिहास -नागरिकशात्र वैगरे लिहून एकाच वहित सात विषय तात्पुरते ट्रांजिस्ट करायचे ...... हे काय हिंदी ला इतकी पान आणि मराठीला इतकुशी अरे माझ्या विषयांची व्याप्ति मोठी आहे हिंदी काय वीस एक पानात पण भागली असती नाहितरी मोहिते बाई असतात कुठे तुम्हाला शिकवायला बघाव तेंव्हा रजेचा अर्ज हातात घेवून मुख्याध्यापक कक्षा बाहेर उभ्या. मुळात इतक्या सुट्या हव्या असणाऱ्या बाईन शिक्षक का व्ह्यव हे देवच जाणे..... आणि हे काय दोन धड़े आणि एक कविता झाली पण शिकवून. घोड्यावर बसवून शिकवते की काय ही बाई ........माझ्याकडे डोळे वाटारुन ....तुला काय झाल दात काढायला पुढच्या आठवड्यात वही नसली तर माझ्या तासाला बसू देणार नाही याद राख .

घरी दप्तर टाकून पहिल आईच्या मागावर जाऊन तिच्यावर वैताग निघायचा काय आई रोज बाई विचारतात वही का नाही घातली.कधी होणार बाबांचा पगार आणि कधी येणार आमच्या वह्या उद्या पर्यंत नाही आल्या तर परवा काय मी शाळेत जाणार नाही .त्यावर आई ....हो हो धीर धर उद्या वागळे डॉक्टर कोकमाचे पैसे देणार आहेत तेंव्हा घे तुला काय घ्यायचाय तो ....तीनं शब्द् दिल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमची शाळा सुटण्याच्या वेळी ती फ़ाटक दुकाना समोर उभी असायची. रुमालात दुमडलेल्या शंभराची एक आणि पन्नास ची एक नोट हातात देत म्हणायची जा घे वह्या जास्ती भारितल्या घेवू नकोस एव्हडेच हायत पैस तुला देवून उरलेत त्यात मला अजुन सरकी पेंड, मेंन्टि (पावसात शेतीच्या कामात डोक्यावर घेण्याचा प्लास्टिक) घ्यायची हायत मला कमी पडल तर यातल उरलेल घेता येतील .
"सुखानंद "च्या काचेच्या काउंटर वर रेलून आत स्टॅंडवर मांडलेल्या वह्या पाहतानां त्यांच्या वरची नेचर -कार आणि अशा तत्सम चित्रात हरवून जायला होई.......किती रूपये डजन वाल्या देवू 65-70 -90 की 110....... .65 वाल्या दया . कव्हर हवेत ........ हो .....कसे देवू साधे की असे प्लास्टिक कोटिंग म्हणजे पावसात दप्तर भीजल तरी वही भिजणार नाही ........ साधेच द्या . स्टिकर देवू ना .....एक कसा आहे ......सुट्टा घेतलास तर 2 रुपये आणि पूर्ण एक शीट घेतलीस तर 20 रूपयाला एकुण 12 स्टिकर...... . दया मग एक शीट .

एका कोऱ्या कागदावर फटाफट वस्तुंच्या नोंदी होत पुढे त्याचा भाव मांडून तोंडी आकड़े मोड़ करीत फ़ायनल म्हणजेच ग्रँड टोटल लीहली जाई....बर एकुण एकशे पाच होतात तू शंभर दे..... पाच रूपये तुला सूट.

कट टू कट पन्नास ची उरलेली नोट ईमानदारीत आईकड़ परत द्यायची आणि सरकी पेंडीच्या तिच्या कंबरे वरच्या बोचक्याला आपल्या डोक्यावर चढवून . हातातल्या वह्यांच्या पिशवीकड़ बघत चालतानां कधीच अस वाटल नाही की भविष्यात लिखाणाचा इतका मोठा क्यानवास मिळेल जो किती रूपये डजन अस विचारायची वेळच येणार नाही.


- © Santo 

Photo Credit - Namita-sharvari Prabhu-sawant.