अनिल न्हावी वाड़ीत आलेत अस नुसत कानावर आल तरी पळता भुई थोड़ी व्ह्ययची.... आईंन वाटित पाणी काढून धक्यावर ठेवल म्हणजे तर आज आपली हजामत नक्की ह्या भीतीन मुद्दाम लांब पळ काढायचा .....केस कापण म्हणजे जाम वैताग असायचा तेंव्हा.... त्यात अनिल कांकानी त्याकाळी मुंबईतन आणलेल केसांचा बारीक़ कट करणार दातेरी यंत्र (हल्ली ब्याटरी वर दाढ़ी कोरायला जे मिनि यंत्र येत ना तस ) केस जवळ जवळ उपटूण काढ़ी. अनिल काकांच्या सराईत हातात ते झपाझप चाले एकदा मान खाली घातली की केसांचा खच पडल्या शिवाय काय मान वर काढ़ायची सोय नसे मधीच काय रे हे बोकड़ा गत तुज़े केस ... ......केसांचा तुरा काढत गांव भटकायला काय उनाड पोरगा हायस काय तू .अवो दादा नको ती थेर करतात ही हल्लीची पोर .तो सुतारकोंड च्या मधुचा पोरगा बघा केस वाढवून झीपऱ्या उडवीत फिरि गावभर .... शेवटी काय झाला 8 वीत 2 विषय राहिल . बापांन साफ केस भादरुन घेतलांन माझ्याकडन त्या दिवशी.चांगली एक गंगावन बनल एव्हड़ी केसा पडली .पोराना धाक नाय हो आजकाल राहिला..... . ह्या केसा उड़ावण्यात टाइम घालवलान ..... शाळेत काय गेला नाय गेला सारखाच मास्तर तरी काय करणार असल्या पोराना....... त्यांना काय पगार भेटल्याशी मतलब........ हे असल काय ऐकल की बाबांच पित्त आणिक खवळे ......अनिल साफ़ बारीक़ कर भांग पाडायला तेव्हड़े चार केस ठेव पुढ़ .......हे बाबांनी नुस्त बोलायची खोटी की पुन्हा अनिल काका पुढ़ ओढीत कैचीचा अजुन एक हात मारी ...अहो काका बस झाले अस म्हटल की म्हणत दादानी एकदा सांगितल्याणी ना मग तसाच होणार तु गप बस्तोस की बोलव त्यांना हिकड ..... एक वेळ भोकाड़ पसरला की आई म्हणे अनिल भावु बस झाल जावुदे मग कापा पुढच्या टाइमाला उग्गाच दिवस भर जीव खाइल माज़ा...... पण बाबा म्हणजे पाठीत दोन धपाटे हाणीत. नखरे सूचलेत तुला अनिल जास्ती हालचाल केल्यान तर कान टाक उडवून जाउदे तिच्या आईला प्रत्येक वेळी ह्याला वाड़ीतन शोधून आणा बळे बळे केस कपायला बसवा दूसरा काय काम धंधा नाय काय आम्हाला .
पाठीतला जाळ सोशित हिसमसुन नाकातन अगदी शेम्बुड् येई पर्यंत आनिल काका सोडत नसत.अगदी मानेवरची लव कोरत असतांना .....दादा लय धाक हो तुमचा पोराना .... पोरगा जागचा हलला नाय ह्याला म्हणतात धाक .इकड़ जाम 1 नंबरला झालेली असायची शेवटी कधी एकदा अनिल काका ब्रशावर पावडर टाकत मानेवरन फिरवतोय अस होई. मग त्या रेकट्या रेकट्याच्या कापडाची नाड़ी सोडलन की डायरेट मागच्या दारातल्या कुडल्यात जावून मोकळ व्ह्ययच मनातल्या मनात अनिल काकाला दोन चार शिव्या घालायच्या आणि तोंड फुगवत पाथरी वर बादलित आईनी काढून ठेवलेल्या गरम पाण्याचे दोन तांबे डोक्यावर.घेऊन एकदाच यातून सुटल म्हणत अर्धी बादली भास्कन अंगावर ओतून घ्यायची.
आज खुप वर्षानी लुक चेंज वैगेरे कर म्हणून मित्रानी सजेस्ट केल म्हणून दिल खुश मधे गेलो तर त्यान पहिले केस धुवायला बसवल म्हटल बाबा कापून झाले केस की मग धुव काय ते तर तो म्हणे नो सर यु हॅव टू वॉश युवर हेयर फस्ट देन आय विल चेक few लुक्स फॉर यु .लेट्स सी विच वन विल सूट यु ....त्याला म्हटल झीपर्या काढू नकोस बाकि काय पण कर (ज़िपर्या काढाण्या इतपत केस डोक्यावर उरलेत नाहीच म्हणा )...मोजून 20 मिनिटांत त्यांन हा लूक दिलान आणि फिनिशिंग द्यायला ती दातेरी मशीन काढलांन तशी मला अनिल काकाची आठवण झाली.
*फोटो सौजन्य - गुगल
*फोटो सौजन्य - गुगल
© Santo
