तिचा नवीन ड्रेस ......!


मावशी काय हाय काय ?........ अशी तिची हाक दोन चार दिवस आली नाही तर चुकल्या चुकल्या गत होत .कधी एक दिवसा आड तर कधी अगदी रोज तिचा आर्जवी आवाज कानावर पडला कि कायम अस्वस्थ व्हायला होत .वाटत एकवेळ मरण पत्करल पण हे असं जगणं नको . इथं कुणाचं आयुष्य कस त्याच्या खरंतर नाना तऱ्हा .
यंदा दिवाळीत तिला फराळ काही जुने कपडे आणि थोडे पैसे दिले तर ती कसली खुश झाली . अगदी दोन मिनिटं दारातून हले ना .ताई माँ भडकली माझ्यावर खाऊ वैगरे ठीक पण पैसे नाही द्यायचे अशाना यांचे आई -बाप अस पोरांना भीक मागायला पाठवतात आणि स्वतः आयते बसून खातात तुला काय दयेचा पाझर फुटतोच कुणी जरा तोंड वाईट केल तरी .

तसे आमच्याकडे काही नियम आहेत (ते मी कायम मोडतोच म्हणा ) पण घरचे सगळे व्यवहार आम्ही ताई माँ कडे दिलेत म्हणजे अगदी कुणाला पाकीट भरण्यापासून ते इस्त्री वाल्याच्या महिना हिशोबा पर्यंत तीच बघते . त्यामुळं हे असले दान धर्म एक्स्ट्रा खर्च तिच्या परवानगी शिवाय आम्ही करूच शकत नाही . पण परवा चक्क तीनच एक नवीन ड्रेस आणला म्हणाली कसा आहे . म्हटलं मस्तय कुणासाठी आणलाय . अरे त्या पोरीला मागायला येते ना तिला . काय विशेष दिवाळीत तर तू कित्ती भडकलीस माझ्यावर मग आता हे काय ? अरे आपण आता हे घर सोडून जातोय ना वर्षभर ती पोरगी आपल्या दारात येतेय . चार दिवस आपण नसलो तर निमूट निघून जायची बाकी कुणाच्या दारात जायची नाही . मधे मी आजारी होते तर दोन वेळा येऊन विचारपूस करून गेली . मावशी तुला बरं नाय ना दे तुजा कचरा टाकायचा असेल तर टाकून येते . हि दारातली लादी पुसून देऊ काय . म्हणत दारात उभी होती कितीवेळ . काय पण असो तीन इतक्या प्रेमान विचारलं तरी .. तिला कुणी तरी सांगितलं आपण हे घर सोडून जातोय तर आता रोज आली कि म्हणते मावशी माझं एक घर कमी झालं तुझ्या दारातन कधी खाली हात गेले नाही मी आजवर......
तिकडं गेलीस आणि काय काम असल तर सांग मला मी नक्की येईन.
आज सकाळी तिला ताई माँ न पिशवी दिली तेंव्हा तिनं ती उघडून बघितली नाही नेहमीच्या गडबडीत रात्रीच्या शिळ्या भाताच्या वरणाच्या पिशव्या जमा करत ती घरी गेली सुद्धा आणि मग अर्ध्या तासांनी परत आली . म्हणाली मावशी तू चुकून नवीन ड्रेस दिलास जुना समजून . हा घे मी उघडून हात बित लावला नाय आहे तसाच आहे .
त्यावर हा तुझ्यासाठीच आहे आम्ही आता जाणार ना म्हणून तुला भेट . क्षणात तिच्या चेहऱ्या वर जे दिसलं ते शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. पण हे असले आनंदाचे क्षण कायम लक्षात राहण्या सारखे.

शेवटी माणसं पैशाने कितीही "अमीर" असली तरी मनाच्या "श्रीमंती" समोर नोटांच्या ढिगांचं मोल कायम चलनी रोकड इतकंच.

© Santo

No comments:

Post a Comment