१ ५ वर्षाची आई ……… !



तिच्या कडेवरच पोर सावरत गजऱ्याचा झुबका पुढं करत ती म्हणाली साहेब घ्या वो गजरा पोराला उन्हात घेऊन किती वेळ उभी आहे . दुधा साठी तहनालय तसाही मोगऱ्याचा गंध रेफ्रेशिंग आहे आणि मला आवडतोही. गावाकडे पावसात मोगरा फुलाला कि नुकताच पाऊस पडून गेल्यावर थेबांनी ओल्या जार झालेल्या काळ्याचा मंद सुगंध साऱ्या परसदारी गुंगत असे …. या लहान वयातल्या आई झालेल्या मुलीचं आयुष्य अगदी असाच आहे . मुंबईतल्या फुटपाथ वर झोपड्या करून राहणाऱ्या या वाघरी समाजाचं काम खरतर गजरे , फुलं ,वेण्या आणि दर शनिवारी विक्रमी खप होणारा लिंबू -मिर्ची - विकणं . जया बेन त्यातलीच एक गेली २ वर्ष आम्ही तिच्याकडूनच गजरे ,हार , फुलं आणत असू काही महिन्यांपूर्वी ती वारल्याच कळलं तिच्या जागी कुणी एक नवी बाई फुलं विकायला बसली होती. अतिशय फटकळ घ्या नाही तर नका घेऊ अशा उद्धट भाषेत बोलणारी हि नवी बाई कोण याची माहिती काढली तेंव्हा कळलं हि जया बेनच्या नवऱ्याची दुसरी बायको. जया बेन ला जावून मोजून १ महिना झाला नसेल . ह्या माणसाने एका दुसऱ्या बाईशी लग्न केलं कमाल आहे बाई या माणसाची माझी ताई पुटपुटत पुढे सरकली मी भाजीच्या पिशव्या घेऊन तिच्या मागे मागे सेक्रेटरी गिरी करत फिरत होतो. इतक्यात समोर चंदा दिसली. जया बेनची लास्ट नंबर ची मुलगी निळ्या रंगाची भडक साडी त्यावर झगमगीत ब्लावुज , गळ्यात दोन तीन प्रकारचे नेकलेस , हातात लाल चुडा , केसात सायलीचा गजरा , चेहऱ्यावर नेहमी पेक्षा एक वेगळं तेज , ताई तिला बघून म्हाणाली काय ग पोरी बापाने आणि तू काय एका मांडवात लग्न केलत कि काय ? ती जरा लाजली आणि म्हणाली नाय ताई तो मेला कसला करतोय माझं लग्न मीच केलं हा बघ माझा नव्हरा तिच्या मागे एक १ ७ - १ ८ वर्षांचा तरुण पोरगा गजरे गुंफत होता. चंदाला शोभेल असा अगदी हसऱ्या चेहऱ्याचा उंच गोरा आणि विशेष म्हणजे इतर मुलांप्रमाणे याच्या तोंडात तंबाकू किंवा गुटका कोंबलेला नव्हता. मी सहज विचारलं काय मग लग्नाची पार्टी कधी त्यावर तो म्हणाला साहेब तुम्ही अमुक अमुक ऑफिसात काम करता ना मी जरा उडालोच बाप रे याला कस माहित मी म्हणाला हो पण तुला कसं माहित रे तुम्ही दुपारी ……खाली उतरता तेव्हां बऱ्याच दा पाहिलंय तुम्हांला मी म्हटलं हो का ? वा मग आज काय बायकोला मदत का ? चंदा गजऱ्याची फिरकी घुमवत म्हणाली साहेब आमच्यात नवऱ्याचा भरोसा नसतो आज सोबत आहे उद्या सोडून जाईल …

मातृ सत्ताक असणारा हा समाज आणि या समाजातल्या स्त्रिया अधिक आक्रमक असतात. त्यांच्या बोलण्यात चालण्यात एक हुकमीपणा असतो. नवरा असो नसो पोरांची जबादारी या स्वतंत्रपणे पेलतात. मागे जयाबेन मार्गशीष महिन्यात दारावर हार वेण्या विकायला आली होती. डोक्यावरची टोपली उतरवून दारात बसली ताईने पाणी दिलं मी घरीच होतो . सकाळची वेळ होती चहा उकळत होता. ताईने कपभर चहा दिला. चहा पीत पीत तिनं खूप गोष्टी सांगितल्या. चंदा आणि तिची एकूण ५ मुलं पहिल्या नवऱ्याची २ आणि या नवऱ्याची ३ सगळ्यांची लग्न झालीत चंदाच दोन महिन्यात उरकून टाकते. कापाळावरचा घाम पुसत ती म्हणाली एव्हड्या लहान पोरीचं काय म्हणून लग्न करतेस मेले ताई ने प्रश्न केला … काय करू बाई पोरगी बाहेर बसायला लागली रात्री उघड्यावर झोपल्यावर कुणी बी हात टाकील तिच्यावर या काळजीने झोप लागत नाही मला. रात्री ढोसून आलं कि मेल्यानं बायको दिसत नाही का बहिण ……… या विदारक परिथितिची जाणीव मला नव्हती मी अधिक माहिती विचारणार इतक्यात ती उठली टोपलं डोक्यावर घेवून निघाली पण तिच्या कुणी बी हात टाकील या वाक्याने मला अस्वस्थ केलं ………….आणि मी या विषयाच्या अधिक सखोल माहितीच्या शोधत लागलो. माझ्या ओळखीच्या काही फुलवल्या बायांशी सहज गप्पा मारता मारता माहिती काढली. आणि काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्यापैकी अनेक इथ लिहिता येणार नाहीत ……… पण शारीरिक अत्याचार होणारा वयोगट ७ वर्षांच्या मुली पासून सुरु होतो. कित्तेक वेळा घरच्याच पुरुषाकडून हा केला जातो . बऱ्याचदा गुंगी देऊन तरुण पोरं मुलींशी संबंध ठेवतात … सरास मुलं व्यसन करतात त्यामुळे असे प्रकार करतांना त्यांना भान राहत नाही …… आमच्यात मुलगा किवां मुलगी कमवायला लागली कि ती स्वतंत्र होते त्यामुळे ते त्यांचा निर्णय स्वतः घेतात … नवऱ्याने बायकोला सोडणं हे आणि सोडलेल्या बाईने दुसरा नवरा करण हे फार नॉर्मल आहे. त्यामुळे वारसा हक्कावरून बऱ्याचदा वाद होतात. लहान वयात लग्न होतात आणि १ ५ - १ ६ वर्षाच्या पोरी गर्भार राहून त्यांना मुलं होतात . खूप वेळा ती मरतात आणि मग पोर जगे पर्यंत त्या पोरीच्या पोटाला विसंत नसते … काही वेळा वयाने जास्त असलेला माणूस कोवळ्या पोरीवर हात टाकतो . त्या पोरीला नाईलाज म्हणून त्याच्या गळ्यात बांधावी लागते ………

मुंबईत लोक पैशाचा पाठलाग करत अशा जगण्याला आयुष्य म्हणून स्वीकारतात फुटपाथच्या आडोशाला संसार थाटतात. परकर गुंडाळून लाज झाकत अंगावर दोन चार तांबे ओतत नव्या दिवसाची सुरुवात करतात , रात्रीच्या काळोखात अब्रूचे तांडव झेलून पदर पुन्हा खांद्यावर टाकत परिथिती स्वीकारतात , खेळायच्या वयात गर्भाच पोट सावरत आईपण अनुभवतात ……………
काय म्हणावं या जगण्याला आणि कडेवर पोर घेवून गजरे विकणाऱ्या त्या अर्धवट उमललेल्या आईला …

मातृ दिनाच्या शुभेछ्या !!

- संतोष टाकळे

फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे .

प्रवास ...............!




प्रवास तसाही मला हवा हवासा वाटणारा जमेल तसं मी फिरत असतो. घरचे म्हणतात तू काय झोळी लावलीस कि निघालास पायाला भिंगरी लावल्यागत. उनाडक्या करायला तुला काय मुहुर्त लागत नाही. असो विषय आहे तो या प्रवासात भेटणाऱ्या माणसांचा काहीवेळा हि माणसं मनात कायमची घर करतात. तर काही अगदी डोक्यात जातात परवा अचानक गावी जायचा प्लान झाला . दापोलीच्या गाड्या नेहमी प्रमाणे फूल्ल . अखेर पनवेलवरून एका गाडीत जागा मिळाली. सकाळीच ब्याग भरून मी ऑफिसला आलो होतो. म्हणून थेट पनवेलला जायचं ठरवलं किमान ४ तास बाकी होते इतका वेळ माणूस वातानुकुलीत आणि तसही कम्फर्ट असलेल्या एअर पोर्ट वर बसून वैतागतो तर महामंडळाच्या डेपोत बसण्याची कल्पनाच न केलेली बरी….

काही दिवसांपूर्वी झालेला माझा नवीन मित्र पनवेलच्या जवळपास राहतो. त्याला फोन केला अतिशय उत्साही आणि दिलखुलास हा माझा FB friend . तो चक्क गाडी घेवून मला पनवेलला न्यायला आला. पनवेल पासून २ ५ मिनिटांच्या अंतरावर त्याचं खाडी लगतंच हे गाव. काही दिवसात चर्चेत येणार आहे कारण नवी मुंबईच आगामी विमानतळ याच्या घरा समोरच्या खारफुटीच्या दलदललिवर तयार होणार आहे . जागेचे भाव , इथल्या लोकांचा व्यवसाय,दनक्यात होणाऱ्या लग्नाच्या हळदी असे अनेक विषय चघळत असतानाच गाडी पाटील हाऊस समोर उभी राहिली मोजून हजार दोन हजार लोकवस्तीच हे गाव मागे बांधकामासाठी लागणाऱ्या खडी साठी पोखरलेले अर्ध्या जिर्ण अवस्थेतले राखाडी रंगाचे डोंगर, त्यावर खुरपटलेली काटेरी झुडपं , समोर विस्तीर्ण खारफुटीची खाडी ,त्याच्या अवती भवती नुकताच वसलेली मुंबईची उपनगरं आणि गावात उठून दिसणारी काही आलिशान घरं पाटील हाऊस त्यातलंच एक मी अगदी अचानक इथे आलोय आणि माझ्यामुळे यांची उडालेली तारंबळ उगाच मला काही क्षण अवघडल्या सारखं झालं त्यात हा पाटील बाजीरावा सारख्या ऑर्डर सोडत होता ये चहा ठेव , खायला काही तरी कर लगेच , हात पाय धुवायला पाणी काढ आणि घरचे निमुटपणे हुकुम पाळत लगबगीने सगळ्या व्यवस्था चोख करीत होते.

पाटील हाऊस मधले दोन तास आगरी पाहुणचार घेण्यात गेले . पाटीलने खास माझ्यासाठी फर्मान केलेला दुधाचा स्पेशल चहा , शेवयाची खीर आणि त्यावर कोल्ड ड्रिंक पाटलांच्या आईने जेवणाचा आग्रह केला चिकन -भाकरी आणि मच्छी असा मेनू होता. पण गाडीची वेळ होत आली होती निघणं भाग होतं निघताना पाटलांच्या आईने ब्यागेत खार ( फेण्या ,कुरड्या यांनी आगरी भाषेत खार म्हणतात ) दोन मोठ्या थंड पाण्याच्या बाटल्या आणि रस्त्यात भूक लागेल म्हणून दोन गरम गरम तांदळाच्या भाकऱ्या कागदात लपेटून दिल्या.मला इतकं काही अपेक्षित नव्हतं अगदी तासाभराची आमची ओळख पण वि स खांडेकर एका कादंबरीत म्हणतात आपलेपणा आपसूक येतो त्याला फक्त माणुसकीच्या काळीजाची आणि दिलदारपणाच्या हिमंतिची गरज असते.

दिवसभर धावपळीत उबलो होतो गाडीत बसल्या बसल्या डोळा लागला .थेट दापोलीत पोहचल्यावर जाग आली. पहाटेच्या गारव्यात रिक्षा घराच्या दिशेने धावत होती. घरचे तसेही लवकर उठतात बऱ्याच दिवसांनी हातावर मशेरी घेत दात घासले आईने चुलीतली राख काढली , हिरक्याच्या फाट्यावर रॉकेलची धार धरली आणि विस्तो पेटवला. चुलीवर काळ्या चाय चे आंदण ठेवून आई वाड्यात गेली. हातावरच्या मशेरीच बोट दातावर घासत धगधगणाऱ्या विस्तावाकडे पाहताना मनात विचार आला आयुष्यात पैसा गरजेला आहे . पण हि लाख मोलाची माणसं कायमची टिकून रहावीत अगदी शेवटच्या प्रवासापर्यंत ………

- संतोष टाकळे

बहर मोसमी .........!



संध्याकाळ तशीही रम्य असते . या उन्हाळ्यातला सूर्य तळपून मावळताना वाऱ्याची हलकीशी थंड झुळूक अंगाला शिवून जावी आणि सोबत कुणी तरी खास असावं काल्पनिक नव्हे अगदी खरं खुर पार्कातल्या गिरीकंदाच्या झाडा खाली पिवळ्या धम्मक फुलांचा सडा पडलेला. बाकड्या वरची धूळ एका फुंकरीत उडवत तो म्हणतो बस ना ती म्हणते आधी तू बस .......
साफ केलेल्या जागेच्या जवळपास हा पठ्या बसतो आणि ती जरा मंद हसत अलगद बाकावर बसते केसांचा डोळ्यावर आलेला झुबका मागे सारत ती म्हणते फेसबुक वर कित्ती फोटो टाकतोस काम करतोस कि नुसता भटकत असतोस तो दिलखुलास हसतो आणि तिच्या लायनर ने कोरलेल्या डोळ्यात पाहत म्हणतो I love photogharphy and you too ........... ती चेहऱ्यावर असंक्य प्रश्नार्थी expresition
आणून अस आज पर्यंत किती मुलींना म्हणालास …. तुझ्या frindlist मधल्या काही मुली माझ्या ओळखीच्या आहेत सो खरं उत्तर दे … तू आता माझी CID चोकशी करणार का ? नाही रे chill यार जस्ट किडिंग …. चल डोक्याला शॉट घेवू नकोस लेट्स have coffee at CCD ….

शहरातल्या या उलट आमच्या गावातली भेट लय भारी तिच्या मैत्रिणीला गाठून सेटिंग लावायची मग वेळ आलीच तर तिला बहिण मानून तिला गळ घालायची आई शपथ माझ प्रेम आहे तिच्यावर आज तिला घेवून ये ना महालक्ष्मी मंदिराच्या सोमारच्या डोंगरावर संध्याकाळी ५ नंतर ये मी आणि अवि येतो तू मंदिरात पाया पडून डायरेक्ट टेकडीवर ये मागच्या बाजून ये बाई देवळाच्या समोरून नको साला लफडा होयिल नाही तर …………अव्या ४ वाजताच हजर होतो . काय रे तुझी गाडी आणायला सांगितली होती ना हलकटा तो नेमहीप्रमाणे रडतो नाही रे बाबा नाही म्हणाले मग सायकल घेवून बाहेर पडलो. आवर लवकर हेमा आणि वृषाली अत्ताच गेल्या महालक्ष्मी रोडवर दिसल्या मला इकडे हा बाजीराव तोंडाला खाकी पावडर हळुवार हात फिरवत फासून घेतो . अत्तराचा बोळा कानात खोवतो ठेवणीतला मस्त पिस्ता कलरचा शर्ट कडक इस्त्री मारून प्यांटच्या आत कोंबतो . दोन तीन वेळा शर्टाची इन नीट बसवतो. आणि मग अव्याच्या सायकलीवर बसून टेकडीच्या दिशेने हवेत विरघळत मनात उकळ्या फुटणारी प्रेम गीतं गुणगुणत शेवटी ठरलेल्या ठिकाणी पोहचतो. हेमाला नी तीला म्हसोबाच्या जाळीच्या कोपऱ्यात पाहून हुश्ह्ह करत दबकत चार पावलं पुढं सरकतो अव्याच्या खांद्यावरचा हात काढत त्याला डोळ्याने खुणावतो आणि अव्या हेमाला घेवून बाजूला जातो आज हिला फायनलच विचारतो म्हणत हा थेट विषयाला हात घालणार इतक्यात … तिच्या कपाळावर लावलेलं देवीच्या मंदिरातलं कुंकू त्याला काहीक्षण भुरळ घालतो माझ्या नावाचं लावशील का ग कुंकू हे न ठरवलेले वाक्य तोंडातून बाहेर पडत आणि ती काहीशी बावरते तिच्या गोऱ्या रंगाच्या गालावर थोडी लाली चढते हा पुन्हा भानावर येत ये तू मला अगदी मनापासून आवडतेस तात्यांना सांगून मी रीतसर मागणी घालीन तुला बोल तू काय उत्तर …… बोटात ओढणीचा काठ ताणून ती फक्त हसते आणि हेमाच्या मागे लपते याला त्याचं उत्तर मिळालेलं असतं हा गावरान आंबा मोहरतो अगदी पानोपानी त्यालाला कितीतरी मोहर गळतो करपतो पण यातूनही टिकलेल्या मोहरला कैऱ्या लागतात आणि मग त्याचाच आंबा होतो .
पण या शहरातल्या गिरीकंदाच्या झाडाचा बहर मोसमी असतो नुसता डोळ्यांना सुखावणारा show बाज …………. अगदी बोन्साय सारखा …


- संतोष टाकळे