तिच्या कडेवरच पोर सावरत गजऱ्याचा झुबका पुढं करत ती म्हणाली साहेब घ्या वो गजरा पोराला उन्हात घेऊन किती वेळ उभी आहे . दुधा साठी तहनालय तसाही मोगऱ्याचा गंध रेफ्रेशिंग आहे आणि मला आवडतोही. गावाकडे पावसात मोगरा फुलाला कि नुकताच पाऊस पडून गेल्यावर थेबांनी ओल्या जार झालेल्या काळ्याचा मंद सुगंध साऱ्या परसदारी गुंगत असे …. या लहान वयातल्या आई झालेल्या मुलीचं आयुष्य अगदी असाच आहे . मुंबईतल्या फुटपाथ वर झोपड्या करून राहणाऱ्या या वाघरी समाजाचं काम खरतर गजरे , फुलं ,वेण्या आणि दर शनिवारी विक्रमी खप होणारा लिंबू -मिर्ची - विकणं . जया बेन त्यातलीच एक गेली २ वर्ष आम्ही तिच्याकडूनच गजरे ,हार , फुलं आणत असू काही महिन्यांपूर्वी ती वारल्याच कळलं तिच्या जागी कुणी एक नवी बाई फुलं विकायला बसली होती. अतिशय फटकळ घ्या नाही तर नका घेऊ अशा उद्धट भाषेत बोलणारी हि नवी बाई कोण याची माहिती काढली तेंव्हा कळलं हि जया बेनच्या नवऱ्याची दुसरी बायको. जया बेन ला जावून मोजून १ महिना झाला नसेल . ह्या माणसाने एका दुसऱ्या बाईशी लग्न केलं कमाल आहे बाई या माणसाची माझी ताई पुटपुटत पुढे सरकली मी भाजीच्या पिशव्या घेऊन तिच्या मागे मागे सेक्रेटरी गिरी करत फिरत होतो. इतक्यात समोर चंदा दिसली. जया बेनची लास्ट नंबर ची मुलगी निळ्या रंगाची भडक साडी त्यावर झगमगीत ब्लावुज , गळ्यात दोन तीन प्रकारचे नेकलेस , हातात लाल चुडा , केसात सायलीचा गजरा , चेहऱ्यावर नेहमी पेक्षा एक वेगळं तेज , ताई तिला बघून म्हाणाली काय ग पोरी बापाने आणि तू काय एका मांडवात लग्न केलत कि काय ? ती जरा लाजली आणि म्हणाली नाय ताई तो मेला कसला करतोय माझं लग्न मीच केलं हा बघ माझा नव्हरा तिच्या मागे एक १ ७ - १ ८ वर्षांचा तरुण पोरगा गजरे गुंफत होता. चंदाला शोभेल असा अगदी हसऱ्या चेहऱ्याचा उंच गोरा आणि विशेष म्हणजे इतर मुलांप्रमाणे याच्या तोंडात तंबाकू किंवा गुटका कोंबलेला नव्हता. मी सहज विचारलं काय मग लग्नाची पार्टी कधी त्यावर तो म्हणाला साहेब तुम्ही अमुक अमुक ऑफिसात काम करता ना मी जरा उडालोच बाप रे याला कस माहित मी म्हणाला हो पण तुला कसं माहित रे तुम्ही दुपारी ……खाली उतरता तेव्हां बऱ्याच दा पाहिलंय तुम्हांला मी म्हटलं हो का ? वा मग आज काय बायकोला मदत का ? चंदा गजऱ्याची फिरकी घुमवत म्हणाली साहेब आमच्यात नवऱ्याचा भरोसा नसतो आज सोबत आहे उद्या सोडून जाईल …
मातृ सत्ताक असणारा हा समाज आणि या समाजातल्या स्त्रिया अधिक आक्रमक असतात. त्यांच्या बोलण्यात चालण्यात एक हुकमीपणा असतो. नवरा असो नसो पोरांची जबादारी या स्वतंत्रपणे पेलतात. मागे जयाबेन मार्गशीष महिन्यात दारावर हार वेण्या विकायला आली होती. डोक्यावरची टोपली उतरवून दारात बसली ताईने पाणी दिलं मी घरीच होतो . सकाळची वेळ होती चहा उकळत होता. ताईने कपभर चहा दिला. चहा पीत पीत तिनं खूप गोष्टी सांगितल्या. चंदा आणि तिची एकूण ५ मुलं पहिल्या नवऱ्याची २ आणि या नवऱ्याची ३ सगळ्यांची लग्न झालीत चंदाच दोन महिन्यात उरकून टाकते. कापाळावरचा घाम पुसत ती म्हणाली एव्हड्या लहान पोरीचं काय म्हणून लग्न करतेस मेले ताई ने प्रश्न केला … काय करू बाई पोरगी बाहेर बसायला लागली रात्री उघड्यावर झोपल्यावर कुणी बी हात टाकील तिच्यावर या काळजीने झोप लागत नाही मला. रात्री ढोसून आलं कि मेल्यानं बायको दिसत नाही का बहिण ……… या विदारक परिथितिची जाणीव मला नव्हती मी अधिक माहिती विचारणार इतक्यात ती उठली टोपलं डोक्यावर घेवून निघाली पण तिच्या कुणी बी हात टाकील या वाक्याने मला अस्वस्थ केलं ………….आणि मी या विषयाच्या अधिक सखोल माहितीच्या शोधत लागलो. माझ्या ओळखीच्या काही फुलवल्या बायांशी सहज गप्पा मारता मारता माहिती काढली. आणि काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्यापैकी अनेक इथ लिहिता येणार नाहीत ……… पण शारीरिक अत्याचार होणारा वयोगट ७ वर्षांच्या मुली पासून सुरु होतो. कित्तेक वेळा घरच्याच पुरुषाकडून हा केला जातो . बऱ्याचदा गुंगी देऊन तरुण पोरं मुलींशी संबंध ठेवतात … सरास मुलं व्यसन करतात त्यामुळे असे प्रकार करतांना त्यांना भान राहत नाही …… आमच्यात मुलगा किवां मुलगी कमवायला लागली कि ती स्वतंत्र होते त्यामुळे ते त्यांचा निर्णय स्वतः घेतात … नवऱ्याने बायकोला सोडणं हे आणि सोडलेल्या बाईने दुसरा नवरा करण हे फार नॉर्मल आहे. त्यामुळे वारसा हक्कावरून बऱ्याचदा वाद होतात. लहान वयात लग्न होतात आणि १ ५ - १ ६ वर्षाच्या पोरी गर्भार राहून त्यांना मुलं होतात . खूप वेळा ती मरतात आणि मग पोर जगे पर्यंत त्या पोरीच्या पोटाला विसंत नसते … काही वेळा वयाने जास्त असलेला माणूस कोवळ्या पोरीवर हात टाकतो . त्या पोरीला नाईलाज म्हणून त्याच्या गळ्यात बांधावी लागते ………
मुंबईत लोक पैशाचा पाठलाग करत अशा जगण्याला आयुष्य म्हणून स्वीकारतात फुटपाथच्या आडोशाला संसार थाटतात. परकर गुंडाळून लाज झाकत अंगावर दोन चार तांबे ओतत नव्या दिवसाची सुरुवात करतात , रात्रीच्या काळोखात अब्रूचे तांडव झेलून पदर पुन्हा खांद्यावर टाकत परिथिती स्वीकारतात , खेळायच्या वयात गर्भाच पोट सावरत आईपण अनुभवतात ……………
काय म्हणावं या जगण्याला आणि कडेवर पोर घेवून गजरे विकणाऱ्या त्या अर्धवट उमललेल्या आईला …
मातृ दिनाच्या शुभेछ्या !!
- संतोष टाकळे
फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे .

No comments:
Post a Comment