प्रवास ...............!




प्रवास तसाही मला हवा हवासा वाटणारा जमेल तसं मी फिरत असतो. घरचे म्हणतात तू काय झोळी लावलीस कि निघालास पायाला भिंगरी लावल्यागत. उनाडक्या करायला तुला काय मुहुर्त लागत नाही. असो विषय आहे तो या प्रवासात भेटणाऱ्या माणसांचा काहीवेळा हि माणसं मनात कायमची घर करतात. तर काही अगदी डोक्यात जातात परवा अचानक गावी जायचा प्लान झाला . दापोलीच्या गाड्या नेहमी प्रमाणे फूल्ल . अखेर पनवेलवरून एका गाडीत जागा मिळाली. सकाळीच ब्याग भरून मी ऑफिसला आलो होतो. म्हणून थेट पनवेलला जायचं ठरवलं किमान ४ तास बाकी होते इतका वेळ माणूस वातानुकुलीत आणि तसही कम्फर्ट असलेल्या एअर पोर्ट वर बसून वैतागतो तर महामंडळाच्या डेपोत बसण्याची कल्पनाच न केलेली बरी….

काही दिवसांपूर्वी झालेला माझा नवीन मित्र पनवेलच्या जवळपास राहतो. त्याला फोन केला अतिशय उत्साही आणि दिलखुलास हा माझा FB friend . तो चक्क गाडी घेवून मला पनवेलला न्यायला आला. पनवेल पासून २ ५ मिनिटांच्या अंतरावर त्याचं खाडी लगतंच हे गाव. काही दिवसात चर्चेत येणार आहे कारण नवी मुंबईच आगामी विमानतळ याच्या घरा समोरच्या खारफुटीच्या दलदललिवर तयार होणार आहे . जागेचे भाव , इथल्या लोकांचा व्यवसाय,दनक्यात होणाऱ्या लग्नाच्या हळदी असे अनेक विषय चघळत असतानाच गाडी पाटील हाऊस समोर उभी राहिली मोजून हजार दोन हजार लोकवस्तीच हे गाव मागे बांधकामासाठी लागणाऱ्या खडी साठी पोखरलेले अर्ध्या जिर्ण अवस्थेतले राखाडी रंगाचे डोंगर, त्यावर खुरपटलेली काटेरी झुडपं , समोर विस्तीर्ण खारफुटीची खाडी ,त्याच्या अवती भवती नुकताच वसलेली मुंबईची उपनगरं आणि गावात उठून दिसणारी काही आलिशान घरं पाटील हाऊस त्यातलंच एक मी अगदी अचानक इथे आलोय आणि माझ्यामुळे यांची उडालेली तारंबळ उगाच मला काही क्षण अवघडल्या सारखं झालं त्यात हा पाटील बाजीरावा सारख्या ऑर्डर सोडत होता ये चहा ठेव , खायला काही तरी कर लगेच , हात पाय धुवायला पाणी काढ आणि घरचे निमुटपणे हुकुम पाळत लगबगीने सगळ्या व्यवस्था चोख करीत होते.

पाटील हाऊस मधले दोन तास आगरी पाहुणचार घेण्यात गेले . पाटीलने खास माझ्यासाठी फर्मान केलेला दुधाचा स्पेशल चहा , शेवयाची खीर आणि त्यावर कोल्ड ड्रिंक पाटलांच्या आईने जेवणाचा आग्रह केला चिकन -भाकरी आणि मच्छी असा मेनू होता. पण गाडीची वेळ होत आली होती निघणं भाग होतं निघताना पाटलांच्या आईने ब्यागेत खार ( फेण्या ,कुरड्या यांनी आगरी भाषेत खार म्हणतात ) दोन मोठ्या थंड पाण्याच्या बाटल्या आणि रस्त्यात भूक लागेल म्हणून दोन गरम गरम तांदळाच्या भाकऱ्या कागदात लपेटून दिल्या.मला इतकं काही अपेक्षित नव्हतं अगदी तासाभराची आमची ओळख पण वि स खांडेकर एका कादंबरीत म्हणतात आपलेपणा आपसूक येतो त्याला फक्त माणुसकीच्या काळीजाची आणि दिलदारपणाच्या हिमंतिची गरज असते.

दिवसभर धावपळीत उबलो होतो गाडीत बसल्या बसल्या डोळा लागला .थेट दापोलीत पोहचल्यावर जाग आली. पहाटेच्या गारव्यात रिक्षा घराच्या दिशेने धावत होती. घरचे तसेही लवकर उठतात बऱ्याच दिवसांनी हातावर मशेरी घेत दात घासले आईने चुलीतली राख काढली , हिरक्याच्या फाट्यावर रॉकेलची धार धरली आणि विस्तो पेटवला. चुलीवर काळ्या चाय चे आंदण ठेवून आई वाड्यात गेली. हातावरच्या मशेरीच बोट दातावर घासत धगधगणाऱ्या विस्तावाकडे पाहताना मनात विचार आला आयुष्यात पैसा गरजेला आहे . पण हि लाख मोलाची माणसं कायमची टिकून रहावीत अगदी शेवटच्या प्रवासापर्यंत ………

- संतोष टाकळे

No comments:

Post a Comment