रेशनिंग दिवाळी.

 


दिवाळी पंधरा एक दिवसांवर आली की रेशनिंग वर डाळ -साखर-पामतेल -रॉकेल आलय का याची चौकशी करायला आई एक दिवसाआड पाठवत असे . सोबत रेशनिंग कार्ड -चार पाच पिशव्या आणि रेशनच्या हिशोबाने पैसे  ..... कुणास ठाऊक आलंच असेल रेशन तर लगेच पावती करायच्या लायनीत नंबर लाव.नाहीतर पुन्हा घरी येवून पैसे घेऊन जाते पर्यंत लाईन पार चिंचेखाली पोहोचायची आणि  मग काय दुपार शिवाय आपला नंबर लागनार नाय.

एक तर सुट्टीच्या काळात  खेळाच्या  रंगात असतांना आता कुठ मरायला रेशन वर जायचं म्हणून थोड़ासा वैताग यायचा पण मग बाबांच्या शिव्या कोण खायील म्हणून ना इलाजास्तव सायकलला पिशव्या लटकवत जावच लागे. ......अशा सतत दोन चार हेलपाटे घातले  की मग रेशनिंग वालाही वैतागायचा आणि अंगावर येत म्हणायचा अरे गाड़ी आली नाही रे अजुन येईल उद्या -परवा......... की अस करू तूझी पावती करून घेतो आणि आधी ट्रक तुझ्या घरासमोर उभा करुन माल तुला देतो आणि मग गाड़ी दुकानाकडे फिरवतो ...........या अशा खोचक बोलण्याचा प्रचंड राग यायचा तेंव्हा वाटायच रॉकेलचा रिकामा कँन डोक्यात घालावा त्या म्हाताऱ्याच्या .....पण गरज आपल्याला आहे त्याला नाय म्हणून गप बसावं लागायचं ..........अशात एक दिवस वैतागत रेशन दुकानावर गेल्यावर ताड़पत्री मारलेला मोठा ट्रक रेशनदुकाना समोरून वळतांना दिसयचा आणि जीव भांड्यात पडायचा. सायकल धकाड्याला टेकून उभी करत पिशव्या काढीत एका दमात पावतीची लाईन धरायची . अजून अर्धा- एक तास लागेल पावत्या करून बाहेर बसा पोती लावून त्यांची नोंद करायला वेळ जाईल. टिपिकल ब्राम्हणी हेक्यातला तो आवाज ऐकून पावत्या करून घुटमळणारे बाहेर येत बोरीच्या सावलीत बसत. उन्हं  तशी वर येत असायचीत म्हणजे ११ वाजले असतील हा अंदाज तंतोतंत खरा निघायचा रस्त्यावरून जाणाऱ्याला विचारलं काका किती वाजले कि तो म्हणायचा ११ ला ५ कमी.  साडेअकराच्या सुमाराला  दुकानातला गडी बाहेर येत चला पावतीच्या नंबरांन लाईन लावा म्हणत दुकानाची झडपं उघडायचा . कि मग काहीकाळ विसावलेली गर्दी पुन्हा उसळत सळसळायची आणि रांग व्हायची . साखरेला आणलेली मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या , रॉकेलचे कँन, गहू -तांदळासाठीच्या सिमेंटच्या गोण्या भराभरा बाहेर निघत . तिकडं तागडीवर असलेला दिन्या उग्गाच भाव खायचा धान्य जोकतांना इतकी घाई करायचा कि ५० -१०० ग्रॅम कमीच जोकलं जाई . पिशवी अशीच धर, कँन असाच पकड अशा त्याच्या उद्धट ऑर्डरी ने डोक्यात जायचा तो . ..... वर्षभर पडीक असलेला हा दिवाळीत इतका डबल भावात का येतो याची चीड यायची. पण इथेही सालं तेच आपण गरजवंत . इतकी सगळी उलटा पालटी करून शेवटी हातात आलेल्या चार पिशव्या आणि पाच लिटर कँनच्या रॉकेल मध्ये दिवाळी आली हो चा सॉलिड फील येई . त्या ५०-६० रुपयांच्या रेशनमधे  सणासुदीचा आनंद खच्चून भरलेला असे .
काल कागदपत्र शोधताना फायलीत फोल्डर मध्ये अडकवलेला रेशनिंग कार्ड पाहिला आणि एकेकाळी याच्या बारीक चौकटीत युनिट मांडत सरकारी पावतीवर कित्तेकांच्या घरातल्या धान्याची नोंद होई तो त्याचा जुना काळ आठवला आजही अनेकांच्या आयुष्यात रेशनकार्डला तितकंच महत्व आहे. पण इतकी वर्ष उलटूनही आज देखील रेशनवरच्या धान्याचा दर्जा मात्र सुमारच आहे. सरकारी अनुदानात मिळणारं ह्या धान्याची किंमत लॉकडाऊन काळात अधिक अधोरेखित झाली आहे. या काळात सरकारने दिलेल्या मोफत धान्यांमुळे अनेक कुटूंबाना दिलासा मिळाला हे मान्य करावं लागेल.  
बाकी हल्ली सुपर मार्केट , बिग बझार , डी मार्ट च्या खरेदीत वस्तू घ्यायला नाही तर पैसे द्यायला लाईन लावावी लागते .आणि इथल्या शॉपिंगच्या फ्री होम डिलिवरी , discounts, स्पेशल ऑफर्स, बंपर सेल ,etc etc ने ट्रॉली कितीही फुल्ल झाली. तरी यार त्या सायकलवरच्या चार पिशव्या रेटत रेशन घेऊन घर गाठतानाची मज्जा काही औरच होती . अर्थात जुन्या दिवसात नुसतं गुंतायच नाहीये पण आठवणी इतक्या लक्ख प्रकाश देणाऱ्या असल्या कि भूतकाळ सहसा अंधारात ठेवता येत नाही .त्याला निमित्त मात्र लागतं फुलबाज्या तुड -तुडायला पणतीची पेटती वात लागवी अगदी तशी .
© संतोष टाकळे .

ट्रेण्ड ..!

हल्ली गावागावात आणि शहरातही तसा सार्वजनिक सत्यनारायण पूजेत स्पीकर लावण्याचा ट्रेण्ड थोडा कमीच होत आलाय आणि घरगुती पूजेतही हल्ली कुणी स्पीकरवाल्याला बोलवत नाही. पण म्हणतात ना हौसेला मोल नाही. समोरच्या बिल्डिंग मधे वास्तू शांत आणिक पूजा आहे. तर आज सकाळी ८ वाजल्यापासूनच अजित कडकडे ,सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल ,आशा बाई अशी दिग्गज मंडळी संगीत सेवेत येऊन गेलीत आणि आता भटजींकडे माईक देत ही मंडळी काहीशी विसवलेत बहुतेक एकंदरीत इतक्या दिग्गजांचा अदब मोडू नये म्हणून की काय भटजीं चक्क साऊथ च्या मोस्ट पॉप्युलर मंत्रपुष्पांजली त्यांच्या लईत म्हणण्याचा अट्टाहास करता आहेत.फार गंमतीशीर वाटतंय ऐकायला पण या निमित्ताने मला आसूदच्या जोशी भटजींची आठवण झाली.
गावातल्या सार्वजनिक पूजेपासून ते लोकांच्या घरगुती किंवा लग्नी पूजा, वास्तू शांती, देवाची उद्देपने,लग्नाचे मुहुर्त सगळं सगळं जोशी भटजींच्या हाती. त्यांनी मुहूर्त काढावा आणि लोकांनी आपल्या पोरांना बोहल्यावर उभं कराव इतक त्यांच प्रस्थ त्यांनी म्हटलेला शब्द शेवटचा. त्यांना कुणी प्रश्न केला तर ते हे होईल किंवा हे होणार नाही. यापलीकड अमूक- तमूक उपाय वैगरे भानगड सांगत नसत .ते हाताच्या बोटांवर योग तपासत वयोमानानुसार त्यांना तेंव्हा तितकंसं फिरणं जमत नसे पण फक्त पैशासाठी नव्हे तर आपल्या माणसांसाठी पायमोड करतोय हे त्यांचं ठरलेलं उत्तर,त्यांची ती खाकी कापडी पिशवी पाठीवर मारली की निघाले . भिक्षुक्याने कार्य सिद्धीस नेण्यास तत्पर असलं पाहिजे. असा त्यांचा दंडक त्यामुळे त्यांना गावो गावी बोलावणी येत. कुण्या गरीबा घरी शिध्यात १०० रुपये दिसले तरी ते डाफरत बयो काय ग इतके पैसे, काय पैशाच झाडं बीड उगावलाय का परसावात तू आपले ५१ दे उगाच मला नको ती सवय लागायची.
लग्नात तर मुहूर्त घटिका पाण्यात बुडण्याआधी लग्न उरकण्याची त्यांची लगबग बघण्याजोगी. नीट उभा रहा रे आता यापुढे ताठ उभं राहावं लागेल संसारात म्हणत ते नवऱ्याच्या पाठीवर एक थाप मारत.अंतरपाटावर त्यांनी काढलेला काहीसा तिरका स्वस्तिक, त्यांच्या बटव्यातल्या पानांनी बनवलेले लग्न लागतांना दाढेत धरायचे जिऱ्याचे विडे, आणि मंगलाष्टकांसाठी माईक हातात घेतांना तो चेक करण्याकरिता त्यांनी मारलेली एक फुंकर क्षणात अक्खा मांडव बोहल्याकडे बघायला लागे तात्काळ आणि हातातल्या अक्षता चिमटीत घेत लगेच सावधान होई. मग जोशी भटजींची ... स्वस्ति श्री गणनायकम गजमुखं ... अशी त्यांच्या घोगऱ्या पण तरीही स्पष्ट उच्चरातली अष्टकांची सुरवात अंगावर काटा येई इतका प्रभावी होता त्यांचा आवाज. वयोमानानुसार त्यांच्या आवाजात आणिक थरथरलेपणा येत गेला. तरीही ते लग्न कार्यात पहिली एक मंगल अष्टक म्हणायला उभे रहायचे ओळखीच्या आणि सवईची माणसं सोडली तर बाकी लोक त्यांचा आवाज ऐकून हशा पिकवीत. शेवटी कालांतराने जोशी गुरुजींनी भिक्षुकी थांबवली पण आजही त्यांचा आवाज कानात घुमतोय इतकी लग्न , कित्येक सत्यनारायण , कईक वास्तूशांत्या ,हजारोंच्या जन्मकुंडल्या ज्यांच्या हातांनी घडल्या त्यांनी मात्र आयुष्यभर सात्विकीपणा जपला श्रीमंताघरी जशा विधी अगदी तशाच गोरगरिबाच्या घरातही कुठेही झुकतेपणा नाही. किंवा कुठेही दक्षिणेचा वरखालीपणा नाही . सत्यनारायण घालतांना त्यांनी सांगितलेली साधुवाण्याची गोष्ट आजही आठवतेय सगळं कस अगदी सरळ आणि साधं , हल्ली नुसती वास्तुशांत म्हटली तरी पाच भटजी लागतात मग त्यांच्या त्या तांदळाच्या रंगीत रांगोळ्या, नक्षत्र पूजन वैगरे वैगेरे . दापोलीतल्या घराची वास्तुशांत एकट्या जोशी भटजींनी केली. काय विशेष त्यात ते म्हणत ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग काहींना सत्यनारायण घालूनही फळ मिळत नाही काहींना हे सगळं न करताच उदंड मिळत त्यामुळे मुळात वृत्ती निर्मळ हवी नुसत्या भौतिक संपत्तीचा काय भरोसा.
फार कमर्शियल झालाय हल्ली सगळं म्हणजे आजचाच प्रकार ते हेलकाव्यातली साऊथची मंत्रपुष्पांजली वैगेरे वैगेरे . पण तेंव्हा साइड A आणि साइड B कॅसेट मधल्या त्या प्रल्हाद शिंदेच्या आवाजातलं ते ऐक सत्यनारायणाची कथा , आता तरी देवा मला पावशील का ? , नुसतं कानावर पडलं तरी आम्ही विचारायचो आई कुणाकडं पूजा आहे . दुपारी तिकडंच यायचं का जेवायला , किती वाजता आटपेल पूजा ,मी शाळेतनं आलो कि लगेच येऊ ना ? आणि आपल्या जास्वदीं वरची फुल घेऊन जा जाशील तेंव्हा आज खूप फुलली आहेत . इतका उत्साह असायचा त्यावेळी कुणाच्याही शुभ कार्यात. पण हल्ली चार घरं सोडून सत्यनारायण असेल तरी आपला तो चुकतोच खूपवेळा . असो त्या निमित्ताने मागे गेलेले दिवस पुन्हा पुढे आले आणि उग्गाच चिकटून बसले काहीकाळ तीर्थ घेतल्यानंतरही किंचित पंचामृत कस लागून राहत तळहाताला अगदी तसच.
©संतोष टाकळे
फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा - क्रेडिट Samography

कॅलेंडरवाला गणपती…!

जून महिना संपत आला की, माळ्यावरून गणपतीचा पाट काढून तो पागोळीत भिजत ठेवायचा. सकाळी शाळेत जातांना पागोळीत टाकलेला पाट संध्याकाळी शाळेतून येईसतोवर चांगला धुपून निघालेला असायचा. मग त्याला नारळाच्या किशीने घासून लक्ख करायचा आणि मग सायकलच्या कॅरिअरला बांधून कुंभारवाड्यात गणपतीच्या कारखान्यात न्यायचा. सोबत यंदा गणपती कसा हवाय यासाठी घरातल्या जाहिरात कम क्यालेंडरवर छापून आलेला एखादा फोटो सोबत घेवून जायचा. पहिल्यांदा आंजर्लेकर काका पाटाच्या मागे नंबर टाकून त्याची नोंद त्यांच्या चोपडीत करायचे आणि मग सोबत नेलेल्या संदर्भासाठीच्या फोटोला निरखत दोन चारदा चष्मा वर खाली करत. डोक्यावरून हात फिरवत…आंजर्लेकर काका – ‘म्हंजे असा हवाय… याची सोंड डावी आहे तिला उजवी करावी लागंल… सिंहासन असा नाय होणार हा साच्यान करतात आपण हातानं करताव. असा शेम टू शेम नाय होनार आधीच सांगतोय मग उग्गाच तोंड फुगवून बसू नकोस आणि हातात हा त्रिशूल हवाय की, मोदक चालंल? त्रिशूल पण बनव आपण पण तो लोखंडी देवा लागंल आणि मेन म्हंजे कलर पण बदलंल. हे रंग मातीच्या मूर्तीवर बसत नायत. लय म्हागातला कलर हाय ह्या फोटोतल्या गणपतीला. तो उंदीर पण लागंल नय. फोटोत हाय तसा… बघता काय तो मी जमवता माझ्या हिशोबान पण बाबासना सांग यंदा जरा भाव वाढंल. लय काम हाय ह्या फोटोतला गणपती बनवायचा म्हणजे. का मी असा जरासा याच्यासारखा दिसणारा बनव त्याला काय जास्ती पैसं वाढणार नाय. बोल लवकर बरीच कामा पडलीत एका गणपतीला एवढा टाइम दिला तर कसा चालल. यात मी अजून दोन गणपती बनवीन. यंदाना गणपती वाढलेत आपल्याकडलं.’


मी – ‘बनवा मग याच्यासारखा जरासा दिसणारा.’



आंजर्लेकर काका – ‘तू कालजी नको करूस कसला बनवतो बघ भारी एकदम.



’पाट सोडून परत पायंडल मारत घरच्या दिशने येतांना उग्गाच मनाला लागून राहायचं आपण मोठं झालो आणि कामाला लागलो की, हवा तसा गणपती बनवून घेऊ. आता नको उगाच बाबांना वर शंभर- दोनशे टाकायला. जिन्नसालाच लय पैसे लागतात शिवाय डेकोरेशन, लायटिंग अजून बाकी आहे. नको राहूदे आणू मग जास्ती पैसे आले की त्या क्यालेंडरसारखा डिट्टो गणपती. मुंबई नाय तर पुण्यातनं.



पुढे मग ऑगस्ट महिन्यात शनिवारची शाळा सुटली की संदीप-अमित सोबत पुन्हा कारखाना गाठायचा. काका कुठला हो आमचा गणपती. तोंडाला रुमाल बांधून मूर्तीला पॉलिश करता करता ते बोटांन दखवीत. त्या लाईनमध्ये हुबेहूब तसे चार पाच गणपती असत मग त्यातला पाट ओळखत नेमका आपला गणपती शोधून काढायचा. त्याला निरखत तिथंच घुटमळत राहायचं काहीवेळ क्यालेंडरवाल्या आणि ह्या पाटावरच्या गणपतीत अगदीच किंचित साम्य. तेही आपल्या समाधानाखातर…



आंजर्लेकर काका – ‘मग बनवली की नाय तुझ्या मनासारखी. त्या क्यालेंडरवरच्या गणपतीला मागं काढील अशी मूर्ती हाय का नाय बोल?



’डोंबल. आमच्या चेहऱ्यावरचे बारा वाजलेले पाहून,’अरे अजून काम बाकी हाय पुढच्या रविवारी ये तेवा रंगवायला घेणार हाय’- काका.



मी- ‘अहो फक्त २० दिवस राहिलेत. लवकर करा जरा.’ त्यावर ते,’ अरे बाबा तुझ्यापेक्षा आम्हाला लय काळजी हाय. चला निघा आता.’



पुन्हा पुढचा रविवार जाऊन रंग लावून झाला की नाय याची खात्री करुन घ्यायचो आम्ही. अगदी गणपती बसायच्या आधी डेकोरेशनचं सामान आणायला बाजारात गेलो तरी चक्कर टाकायची. काका जरा इथ कलर मारा, मोदक अजून जरा पांढरा करा, ह्या मागच्या केसांना रंगच लागला नाय, पितांबराचा काठ अजून सोनेरी पाहिजे होता. आंजर्लेकर काका पार वैतागायचे. पण मग, लावतो बाबा. धीर धर. नायतर एक कर; हे कलर घे आणि तूच फास हवेत तशे. खरंतर त्यांना त्रास दयायचा उद्देश् नासायचा. पण यात भारी गंमत होती.



मागच्या वर्षी गणपती आणायला गेलो तेव्हा आंजर्लेकर कांकानी विचारलं, ‘काय मग आता मोबाईलमधल्या फोटोसारखा गणपती बनवून देऊ काय बोल पुढच्या वर्षी?’ त्यावर फक्त निव्वळ हश्या पिकला. त्या आठवणी, ते दिवस होतेच वेगळे. तेव्हा वेळ होता पण पैसे नव्हते. आज पैसे आहेत पण वेळ नाही. त्यातही कधी तेव्हा बाबांनी दिलेले पैसे कमी पडले तर ग़ुपचूप साठवलेल्या पैशाचा डबा फोडून आणिक साहित्य आणायचं. एक एक कागद नक्षीदार कापत रात्र रात्र जागून पताका, नक्षत्र, माळा लावीत आरास करण्याच्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. हल्ली कामामुळे गणपतीची तयारी सोडा, पण प्राणप्रतिष्ठापना करायाचाही मुहूर्त गाठता येत नाही. लहान भाऊ लवेश बाबांच्या मदतीनं सगळी आरास करतो. तशी त्याची हौस अजूनही तितकीच दांडगी आहे. म्हणून कुठं आमच्या गणपतीला घरगुती मखरात बसण्याचं भाग्य लाभतंय! नाहीतर आमच्या काळात कदाचित ऑर्डर देवून आरास करावी लागेल.मी मुंबईत आलो त्या २००४ ह्या मुंबईतल्या पहिल्याच वर्षी मला गावी गणपतीसाठी जाता आलं नाही. चाळीत शेजारीपाजारी गणपतीची तयारी चालू होती. म्हणजे चाळीतल्या १८०च्या एरियात कसा काय गणपती बसवत असतील याचं फारच कुतूहल होतं मला. कारण गावी माजघर, ओटी, पडवी इतकी जागाही कमी पडत असे आम्हाला, पै पाहुण्यांची गैरसोय नको म्हणून पडवीतली सगळी अडगळ काढून तिला मोकळं केलं जाई आणि इथं लोक इतकुश्या जागेत गणपती त्याचं डेकोरेशन, आरत्या, जेवणावळी सगळं सगळं निभावून नेत. पण मुंबईतले सार्वजनिक गणपती मात्र भव्यदिव्य आरासात असतात हे गावी असतांना अनेकदा टीव्हीवरल्या बातम्यात पाहिलं होतं. गणेश गल्लीचा गणपती, लालबागचा राजा, तेजुकायचा महाराजा वगैरेवगैरे. नुसते ऐकून होतो म्हटलं यंदा गावी नाही जाता येणार तर किमान इथले हे सगळे गणपती बघून घेऊ. म्हणून बाहेर पडलो तर जिथे तिथे गर्दीच्या कचाट्यात सापडल्याने आणिक गणपती बघण्याचा उत्साह पार चेंगरून गेला. असं घुसमटत गर्दीतून बाहेर पडण्याची तितकीशी अजून सवय नव्हती म्हणून अगदीच नको वाटलं अजून पुढे जाणं आणि पुन्हा घरी परताव लागलं. गावाहून तसाही रोज फोन येत होता. उद्या गौरी येतील. परवा अमुक वाजता ओवसा, विसर्जनला यंदा राजन दादाच्या गाडीत आपला गणपती न्ह्यायचं ठरलंय असले सगळे उपडेट ऐकून रडूच कोसळे. कारण इतक्या वर्षात कधी गणपती चुकला नव्हता. इथं मुंबईत असून सगळं लक्ष मात्र गावाकडे लागलेलं. पुन्हा पुढचा रविवार जाऊन रंग लावून झाला की नाय याची खात्री करुन घ्यायचो आम्ही. अगदी गणपती बसायच्या आधी डेकोरेशनचं सामान आणायला बाजारात गेलो तरी चक्कर टाकायची. काका जरा इथ कलर मारा, मोदक अजून जरा पांढरा करा, ह्या मागच्या केसांना रंगच लागला नाय, पितांबराचा काठ अजून सोनेरी पाहिजे होता. इत्यादी इत्यादी. आंजर्लेकर काका पार वैतागायचे. पण मग, लावतो बाबा. धीर धर. नायतर एक कर; हे कलर घे आणि तूच फास हवेत तशे. खरंतर त्यांना त्रास दयायचा उद्देश् नासायचा. पण यात भारी गंमत होती.मागच्या वर्षी गणपती आणायला गेलो तेव्हा आंजर्लेकर कांकानी विचारलं, ‘काय मग आता मोबाईलमधल्या फोटोसारखा गणपती बनवून देऊ काय बोल पुढच्या वर्षी?’ त्यावर फक्त निव्वळ हश्या पिकला. त्या आठवणी, ते दिवस होतेच वेगळे. तेव्हा वेळ होता पण पैसे नव्हते. आज पैसे आहेत पण वेळ नाही. त्यातही कधी तेव्हा बाबांनी दिलेले पैसे कमी पडले तर ग़ुपचूप साठवलेल्या पैशाचा डबा फोडून आणिक साहित्य आणायचं. एक एक कागद नक्षीदार कापत रात्र रात्र जागून पताका, नक्षत्र, माळा लावीत आरास करण्याच्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत. हल्ली कामामुळे गणपतीची तयारी सोडा, पण प्राणप्रतिष्ठापना करायाचाही मुहूर्त गाठता येत नाही. लहान भाऊ लवेश बाबांच्या मदतीनं सगळी आरास करतो. तशी त्याची हौस अजूनही तितकीच दांडगी आहे. म्हणून कुठं आमच्या गणपतीला घरगुती मखरात बसण्याचं भाग्य लाभतंय! नाहीतर आमच्या काळात कदाचित ऑर्डर देवून आरास करावी लागेल.मी मुंबईत आलो त्या २००४ ह्या मुंबईतल्या पहिल्याच वर्षी मला गावी गणपतीसाठी जाता आलं नाही.



चाळीत शेजारीपाजारी गणपतीची तयारी चालू होती. म्हणजे चाळीतल्या १८०च्या एरियात कसा काय गणपती बसवत असतील याचं फारच कुतूहल होतं मला. कारण गावी माजघर, ओटी, पडवी इतकी जागाही कमी पडत असे आम्हाला, पै पाहुण्यांची गैरसोय नको म्हणून पडवीतली सगळी अडगळ काढून तिला मोकळं केलं जाई आणि इथं लोक इतकुश्या जागेत गणपती त्याचं डेकोरेशन, आरत्या, जेवणावळी सगळं सगळं निभावून नेत. पण मुंबईतले सार्वजनिक गणपती मात्र भव्यदिव्य आरासात असतात हे गावी असतांना अनेकदा टीव्हीवरल्या बातम्यात पाहिलं होतं. गणेश गल्लीचा गणपती, लालबागचा राजा, तेजुकायचा महाराजा वगैरेवगैरे. नुसते ऐकून होतो म्हटलं यंदा गावी नाही जाता येणार तर किमान इथले हे सगळे गणपती बघून घेऊ. म्हणून बाहेर पडलो तर जिथे तिथे गर्दीच्या कचाट्यात सापडल्याने आणिक गणपती बघण्याचा उत्साह पार चेंगरून गेला.



असं घुसमटत गर्दीतून बाहेर पडण्याची तितकीशी अजून सवय नव्हती म्हणून अगदीच नको वाटलं अजून पुढे जाणं आणि पुन्हा घरी परताव लागलं. गावाहून तसाही रोज फोन येत होता. उद्या गौरी येतील. परवा अमुक वाजता ओवसा, विसर्जनला यंदा राजन दादाच्या गाडीत आपला गणपती न्ह्यायचं ठरलंय असले सगळे उपडेट ऐकून रडूच कोसळे. कारण इतक्या वर्षात कधी गणपती चुकला नव्हता. इथं मुंबईत असून सगळं लक्ष मात्र गावाकडे लागलेलं. तसं मुंबईत येऊन अगदी दोन चार वर्ष दोन्हीकडचा गणेशोत्सव साजरा करता आला. म्हणजे गावी ५ दिवसाचे गणपती गेले की, पुढचे बाकी दिवस मग मुंबईतले गणपती. लालबाग, परळचे मित्र आता जिगरी दोस्त झालेले. ते जिथे कार्यकर्ते म्हणून असंत तिथल्या गणपतीच दर्शन आपल्याला अगदी डायरेक. मध्यरात्री ते पहाटेपर्यंत आम्ही ह्या गणपतींच्या दर्शनात घालवत असू. तसे सगळेच हौशी होते ग्रुप मध्ये. पण मग कालांतराने आम्ही आपल्या आपल्या कामात अधिक गुंतत गेलो आणि मग ह्या सगळ्या अशा भटक्या गोष्टी बंद होत गेल्या. शिवाय पूर्वी ह्या सगळ्या ठिकाणी एक आपलेपणा होता. अगदी लालबागच्या राजाच्या दरबारीही धक्काबुक्की वगैरे असले प्रकार नसत.



पण हळूहळू चित्र बदलंत गेलं. जेव्हा ह्या २४ तास चालणाऱ्या वृत्त वाहिन्या सुरु झाल्या त्यानंतर तर मुंबईतल्या सगळ्याच उत्सवांना अधिक जास्त प्रमाणात कमर्शियल स्वरूप येत गेलं. त्यातही १० थराच्या दहीहंड्या, गरबे, गुढी पाडव्याच्या मिरवणुका, यांनी अमाप प्रसिद्धी खेचलीय. त्याचे यथासांग परिणाम आपण सध्या पाहतोच आहोत. म्हणजे आपण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई सबर्बमधून येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांचं कुतूहल करीत होतो. आता तर लोक परदेशातूनही नवस फेडायला येण्याच्या ब्रेकिंग न्यूज गेल्याच वर्षी जुन्या झाल्यात. सातत्याने बदल होणार आणि त्यात आणिक नवे लोक येत राहणार हे आजच्या उत्सवाचं वास्तव आहे आणि हे नुसतं सार्वजनिक उत्सवाचं नाही, घरगुती उत्सवातही हीच तऱ्हा. म्हणजे हल्ली कुणालाच तसा मोकळा वेळ नसतो आणि म्हणून पूर्वी घरीच आरास करणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं. थर्माकॉलचे जे रेडिमेड मखर यायला लागले त्यांनी तर काम अधिक सोप्पं केलं. मुंबईतल्या अगदी छोट्या छोट्या घरातही नीट बसतील असले आरास बाजारात उपलब्ध आहेत. एकतर अवघ्या अर्धा एक तासात सजावट होते आणि मग इतर तयारीला माणूस मोकळा होतो. सध्या तर लोक मोदकही ऑर्डरनेच मागवतात. इतकंच काय, अगदी त्या दिवशी नैवेद्यात खासकरून केली जाणारी डाळींब्याच्या भाजी करिता लागणारी सोललेली भीजही आयती बाजारातून आणतात. चटण्या-लोणची तर हव्या त्या फ्लेवरची मार्केटमध्ये उपलब्ध आहेतच. बाकी अगदीच शास्त्र पाळणारे आणि काही हौशी लोक मात्र सकाळीच खोबरं खवणायला घेतात. डाळींबे सोलायला लहानग्या पोरांना बसवतात. घरातल्या गृहिणी सगळं साग्रसंगीत उरकतात. पण यात मोदकाचं पीठ मात्र रेडिमेडच आणलं जातं. तसं गावातही हल्ली कुणी मोदकाच्या पिठाचे तांदुळ धुऊन श्रवणातल्या खेळत्या उन्हात वाळवतांना दिसत नाहीत. कारण गावाखेड्यातली माणसही सध्या त्यांच्या त्यांच्या व्यापात व्यस्त झालीत. आता इतके सारे बदल काळानुरूप झालेत तर उत्सवांचा माहोल देखील बदलणं ओघाने आलंच. म्हणजे त्याकाळी गणपती जवळ आलाच म्हणूनचा जो काय उत्साह आणि लगबग असे, तो उत्साह आताशी अजिबात जाणवत नाही. रात्री रात्री जागून मखरांसाठीच्या बनवलेल्या प्रत्येक नक्षत्रमाळीच्या कळीत जितकं चैतन्य ओसंडून वाहे; तितका तजेला हल्ली ऑर्डर नुसार फ्लोरिस्टन पीटमॉस मध्ये खोवलेला देशी परदेशी फुलांमध्ये जाणवत नाही.



बदलतंय वैगेरेची ओरड आपण सहज करतोय पण हे सगळं आपल्याच लाइफस्टाईलनं बदलतंय हे मात्र आपल्याकडून जाणूनबुजून स्वीकारलं जात नाही. म्हणजे नऊवारी गेली आणि बाई गाऊनपर्यंत पोहचली म्हणजे फार मोठी उलथापालथ झाली असं म्हणत संस्कृती लयास गेल्याची ओरड करणं आणि त्यावर संस्था चालवणं हे काहीतरी करीत राहावं वाटतंय त्यांचे उद्योग आहेत. कारण हल्ली फॅशन किंवा ट्रेंड म्हणून का होईना सणासुदीत-लग्न समारंभात पारंपरिक पेहराव पुन्हा डोकं वर करू पाहतोय. म्हणजे आता गणपती उत्सवाचं म्हणाल तर शाडूच्या मूर्तींची विशेष मार्केटिंग केली जातेय. शिवाय इको फ्रेंडली गणेशोत्सवाचं अव्हेरनेसही वाढत चाललंय. अत्यंत साध्या पद्धतीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करीत त्यातून उरणाऱ्या पैशातून समाजोपयोगी कामं करावीत हा वेगळा विचार आताशी कुठं लोकांना पटायला लागलाय पण याचं प्रमाण अजूनही अत्यल्प आहे. जे येत्या काळात आणिक वाढत जाईल अशी आशा ठेवायला हरकत नाही.



खरंतर ह्या सगळ्या बदलांचं एक मोठ्ठं रिंगण आहे, ज्यात आपण एका ठिकाणाहून निघतो आणि भिरभिरून पुन्हा तिथेच परत येतो.कोण म्हणतं हल्ली सण-उत्सव कॅलेंडरमध्ये आहेत म्हणून साजरे होतातयत. खरंतर असा प्रश्न पडण्याइतपत वाईट वेळ आलेली नाही. कारण आजही लोक उत्सवाच्या निमित्ताने का होईना एकत्र येतात. रीत-भात वैगैरेत बदल होत आहेत पण ते आता जनरेशनच्या नव्या विचारांवर, शिवाय ज्याच्यात्याच्या समजुतीवर अवलंबून आहे. म्हणजे यंदा वटपौर्णिमेला वडाला फेऱ्या मारीत बसण्यापेक्षा आणि फळाफुलांचे वाण लुटण्या पेक्षा किमान चार झाडं लावावीत, प्लास्टर ऑफ पॅरिसचा मोठा गणपती आणण्यापेक्षा शाडूची छोटी मूर्ती आणावी, घरातच बादलीत तिचं विसर्जन करावं, निर्माल्य सोसायटीच्या गार्डनमध्ये खड्डा करून त्यात जमा करीत त्याचं कंपोस्ट करावं हे सगळे आधुनिक काळातले बदल अजूनही लोक म्हणावे तसे स्वीकारत नाहीत. किंबहुना त्याबद्दलचा अव्हेरनेस आणि गांभीर्य यायला आणि काळ लागेल. शिवाय रूढी परंपरा, आपल्या धार्मिक समजुती यांचा प्रचंड मोठा पगडा आपल्या डोक्यावर बसला आहे तो इतक्या सहज उतरणं शक्य नाही. म्हणजे अगदी माझ्या घरातलं म्हणाल तर निर्माल्य नदीत टाकणं आम्ही बंद केलंय. शास्त्र म्हणून पाण्याला लावायचं म्हणून ताम्हणात पाणी घेऊन त्याला हे निर्माल्य लावीत मग ते थेट परस बागेच्या खड्डयात घातलं जातं. येत्या पुढच्या जनरेशनपर्यंत कदाचित गणपती घरगुती स्वरूपात विसर्जित केला जाईल असं वाटतंय. कारण अजून काही वर्षांनी परिस्थिती अधिक बदलेली असेल.




© संतोष टाकळे



http://www.rutugandha.com

आक्रोश


शेतात पेरलं आणि ते उगवलं नाही... जरी उगवलं तरी ते टिकलं नाही.... जरी टिकलं तरी ते विकलं नाही याची सल शेतकऱ्याशिवाय आणि कुणाला कळणार नाही .मराठीच्या पाठ्यपुस्तकात भास्कर चंदनशिव यांचा "लाल चिखल" नावाचा धडा आठवतोय का ? काल पासून सोशल नेटवर्किंग वरच्या पोस्टिंग्स मधून दिसणाऱ्या रक्ताळ पायांचे फोटो बघतांन हा धडा चंदनशिव यांनी आज लिहला असता तर त्यांना " रक्ताच चिखल " हे टायटल द्यावं लागलं असत बहुदा . पण हि सगळीच छायाचित्र मन हेलावून टाकणारी आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून तर ती वारंवार दाखवली जात आहेत .
पण अगदी genuinely अस वाटतंय हा मोर्चा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा आक्रोश असेल तर मग अन्य कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना या काफिल्यात उभं करण्याची गरज नव्हती. जे काल पक्षाची स्ट्रिप गळ्यात घालून मोर्चेकऱ्यांना जेवण वाटत होते त्यांनी त्याचं सरकार असताना शेतकऱ्यांचं काय भलं केलं या प्रश्नाचं उत्तर छाती ठोक पणे आम्ही ह्या १० गोष्टी केल्या हे सांगण्याची हिम्मत आहे का त्यांच्यात मग आता सत्तेवर आहेत यांच्यात आणि ज्यांची सत्ता गेलीय त्यांच्यात काय फरक आहे . ते खुर्च्यांन वर बसले होते तेंव्हा हे शेतकऱ्यांच्या बाजूने आज हे सत्तेत आहेत तर पुन्हा पायउतार झालेले शेतकऱ्यांचे कैवारी .
अजब-गजब खेळ आहे हा . सत्ता, राजकारण , समित्या , शिष्टमंडळ वैगरेंच्या भोवती रिंगण घालणारा. नव्या नेत्यांना एक्स्पोज करणारा , मीडिया माध्यमांना पेलणारा, मायलेज, TRP ला बूस्ट करणारा . पण अखेर ज्यांच्यासाठी हा अट्टाहास त्यांची मात्र कायम फसवणूक करणारा.
यांना चल म्हटलं कि यांनी चालू व्हावं ,बस म्हटलं कि बसावं, उठ म्हटलं कि उठाव ,अगदी ठेचा लागून रक्तबंबाळ होई पर्यंत यांचं भान निघून जावं आणि यांचं नेतृत्व करणाऱ्यांनी मोदी जॅकेटची कॅलर नीट करीत मीडियाला बाईट देत फेमस व्हावं.तिकडे सत्तेतल्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देत समिती नेमावी आणि मोर्चा पांगवून लावावा . हळूहळू मैदान मोकळं पडाव. माध्यमांच्या ओबी व्हॅन्सनी ऑफिसच्या दिशेने मार्गस्थ व्हावं. २०० एक शे किलोमीटर चालत आलेले पुन्हा परतीच्या रस्त्याला लागावेत. पुढारपणा करणाऱ्यांनी त्यांच्या करियर मधला एक मोठा मोर्चा सक्सेस केला म्हणून आतल्या आत खुश व्हावं.
टिचलेल्या जखमा भरतील काहीदिवसात.पुढे सरकार त्यांच्या गठन केलेल्या समित्या जुन्या होत जातील. काही ठोस उपाय योजना करतील कि फक्त सरकारी यंत्रणेला अहवाल देत बसतील. कोण जाणे
पण हंगाम आला कि त्याला- तिला शेतात उभं राहावं लागेल
पुन्हा पेरण्याचा हिमतीनं आणि पुन्हा उगवेल या उमेदीनं.

© Santo

दिवाळी १० एक दिवसांवर...!









वा ,डाळी, डालडा प्रत्येकी किलोभर सोबत वेलची सुका मेवा यांची घाऊक यादी करायला बसलं कि दिवाळी १० एक दिवसांवर आलेली असायची . जालगावातल्या गो. म.फाटक दुकानात तेंव्हा गर्दी म्हणजे यादी दिली कि अर्ध्या तासाने नंबर लागायचा डालड्या साठी आणलेला स्टीलचा डबा , तेलासाठीचा कॅन त्या गर्दीत मध्ये मध्ये कडमडत असायचा जाम राग यायचा आईचा तेंव्हा तेलाचा बंद कॅन आणि डालड्याची पॅक बरणी मिळते ना मग घरून कशाला आणायचे


हे डबे वैगरे . इतक्यात टाकळे चला जिन्नस घ्या म्हणून आप्पांची हाक यायची ज्याचं झालय घेऊन त्यांची जिन्नस पिशवीत भरायची घाई आणि आमची यादीच्या क्रमानुसार पिशव्या तयार करायची लगबग सगळ इतक्या ऐन टायमाला व्हायचं त्यात डालड्याचा डबा तागडी समोरच्या फळीवर दोन चार दा आदळायचा आप्पा पुन्हा खासकन ओरडत टाकळे अहो वनस्पती डालडा ५ व्या नंबरवर लिहलेला असला तरी तो आम्ही शेवटी देणार आहोत आधी तो डबा खाली ठेवा बघू नायतर डब्याला पोक बिक काढाल . आजू बाजूचे फ़िदीफिदी हसत . आणि माझ्या डोक्यात आणिक तिडीक जाई . आईकड डोळे वटारून बघायची सोय नव्हती पुन्हा आप्पांनी पाहिलं तर आणिक काहीतरी फटकन बोलून जायचे तसे ते फाटक्या तोंडाचे म्हणून परिचित होतेच. म्हणून फारस कुणी त्यांच्या फंदात पडत नसे. 
नुसता अंगाचा साबण म्हणजे कोणता . मैसूर वाला देऊ कि अजून भारी ...जास्त महागातला नको आप्पा पण जरा चांगल्या वासाचा द्या इतक्या गर्दीत तुझा साबण शोधायला वेळ नाही.देईन तो घ्यावा लागेल बदलून मिळणार नाही . यादी नुसार एक एक घट्ट दोरा गुंडालेल्या जिन्नसाच्या पुड्या आई तिन नेमलेल्या पिशवीत भरल्या जात . वहिनी उटण याद्या पूर्ण झाल्या की निघताना पावती टेबलावर न विसरता घ्या त्याचे पैसे लावले नाहियेत.
याद्या संपत आल्या की माझ सगळ लक्ष फटाक्यांच्या टेबलाकड़ असायच .कधी एकदाचा जिन्नस घेवुन होतोय आणि मी कधी फटाके घेतोय नुसती चुळबुळ वाढत जाई .आई आवर पटकन म्हणत पिशव्या धरतांना हातातला त्राण निघुन जाई .आणि परत आप्पा खेकसत काय रे फटाके काय संपणार नाहीयेत.आधी एक काम पूर्ण कराव मग दूसऱ्याकड़े वळाव बाळ.
वहिनी फार लाड बरे नव्हेत मुलांचे आजकाल ची पोरं म्हणजे . आता पुढची किमान 10 मिनिटे आप्पा यावरच बोलणार म्हणून मग काढता पाय घेत आपल्याला झेपणाऱ्या पिशव्या भराभर दुकाना बाहेर आणाव्यात म्हटल तर डालडा पोह्यांची पिशवी सोडली की सगळच कस जड़ काम पण तरीही आपली तडमड पाहून आईला दया येई .रुमालातल्या नोटि तपासून ती म्हणे जा तुळशीच्या लग्ना पर्यंत पुरतील तेव्हडे फटाके घे जास्त म्हागातले नको घेवुस बाबू अजुन पणत्या घ्यायच्या बाकि आहेत.मनात असूनही खुप सारे फटाके घेता येत नसत फार फार तर एक चक्र बॉक्स, अर्धा पाऊस बॉक्स ,अर्धा डजन फुलबाजा बॉक्स, चार लक्ष्मी बार चे प्याकेट, लवंगी बार ची अक्खी लड़ी ,दोन सुरसूऱ्या ,एक नागगोळी बॉक्स , एक सिंह बॉम्ब बॉक्स (हे शक्यतो दिवाळी च्या सकाळी जो पहिला उठेल त्यांनी लावण्याच्या मानाचे विक्रमी बार म्हणजे यांच्या आवाजाची दहशद असे) ,अर्धा बॉक्स सुरसुरी बाण इतक्यात टोटल शंभर च्या वर जाई आणि आई म्हणे खुप झाले. बस कर आता नाहीतर बाबा ओरड़तील ....बाबांच नाव घेतल म्हणजे चार सुतळी बॉम्ब एकत्र लावल्यागत वाटे त्यांचा दरारा म्हणजे चड्डी ओली व्ह्ययची त्याकाळी पुढे अजुन काय घ्याव वैगेरे धाडसच होतच नसे. 
जितक मिळाल ते पुरुन वापराव त्याउपर अपेक्षा करण्याच सोय नसे त्याकाळी .आणि आजकाल ची पोरं हजार दोन हजार चा चुराडा करूनही त्यांच समाधान होत नाही अर्थात काळ बदलालय आणि वेळही.सध्या फटाके बंदी चालू आहे त्या निमित्ताने आठवल म्हणून शेअर केल बाकि काळ कायम बदलत राहतो हे वास्तव स्विकारणे ओघात आलच आमच्या वेळी वैगेरे युक्ती वादाला तसहि काही महत्व नाहीच काळाअनुरूप.

© Santo

तिचा नवीन ड्रेस ......!


मावशी काय हाय काय ?........ अशी तिची हाक दोन चार दिवस आली नाही तर चुकल्या चुकल्या गत होत .कधी एक दिवसा आड तर कधी अगदी रोज तिचा आर्जवी आवाज कानावर पडला कि कायम अस्वस्थ व्हायला होत .वाटत एकवेळ मरण पत्करल पण हे असं जगणं नको . इथं कुणाचं आयुष्य कस त्याच्या खरंतर नाना तऱ्हा .
यंदा दिवाळीत तिला फराळ काही जुने कपडे आणि थोडे पैसे दिले तर ती कसली खुश झाली . अगदी दोन मिनिटं दारातून हले ना .ताई माँ भडकली माझ्यावर खाऊ वैगरे ठीक पण पैसे नाही द्यायचे अशाना यांचे आई -बाप अस पोरांना भीक मागायला पाठवतात आणि स्वतः आयते बसून खातात तुला काय दयेचा पाझर फुटतोच कुणी जरा तोंड वाईट केल तरी .

तसे आमच्याकडे काही नियम आहेत (ते मी कायम मोडतोच म्हणा ) पण घरचे सगळे व्यवहार आम्ही ताई माँ कडे दिलेत म्हणजे अगदी कुणाला पाकीट भरण्यापासून ते इस्त्री वाल्याच्या महिना हिशोबा पर्यंत तीच बघते . त्यामुळं हे असले दान धर्म एक्स्ट्रा खर्च तिच्या परवानगी शिवाय आम्ही करूच शकत नाही . पण परवा चक्क तीनच एक नवीन ड्रेस आणला म्हणाली कसा आहे . म्हटलं मस्तय कुणासाठी आणलाय . अरे त्या पोरीला मागायला येते ना तिला . काय विशेष दिवाळीत तर तू कित्ती भडकलीस माझ्यावर मग आता हे काय ? अरे आपण आता हे घर सोडून जातोय ना वर्षभर ती पोरगी आपल्या दारात येतेय . चार दिवस आपण नसलो तर निमूट निघून जायची बाकी कुणाच्या दारात जायची नाही . मधे मी आजारी होते तर दोन वेळा येऊन विचारपूस करून गेली . मावशी तुला बरं नाय ना दे तुजा कचरा टाकायचा असेल तर टाकून येते . हि दारातली लादी पुसून देऊ काय . म्हणत दारात उभी होती कितीवेळ . काय पण असो तीन इतक्या प्रेमान विचारलं तरी .. तिला कुणी तरी सांगितलं आपण हे घर सोडून जातोय तर आता रोज आली कि म्हणते मावशी माझं एक घर कमी झालं तुझ्या दारातन कधी खाली हात गेले नाही मी आजवर......
तिकडं गेलीस आणि काय काम असल तर सांग मला मी नक्की येईन.
आज सकाळी तिला ताई माँ न पिशवी दिली तेंव्हा तिनं ती उघडून बघितली नाही नेहमीच्या गडबडीत रात्रीच्या शिळ्या भाताच्या वरणाच्या पिशव्या जमा करत ती घरी गेली सुद्धा आणि मग अर्ध्या तासांनी परत आली . म्हणाली मावशी तू चुकून नवीन ड्रेस दिलास जुना समजून . हा घे मी उघडून हात बित लावला नाय आहे तसाच आहे .
त्यावर हा तुझ्यासाठीच आहे आम्ही आता जाणार ना म्हणून तुला भेट . क्षणात तिच्या चेहऱ्या वर जे दिसलं ते शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. पण हे असले आनंदाचे क्षण कायम लक्षात राहण्या सारखे.

शेवटी माणसं पैशाने कितीही "अमीर" असली तरी मनाच्या "श्रीमंती" समोर नोटांच्या ढिगांचं मोल कायम चलनी रोकड इतकंच.

© Santo

निमित्त मराठा क्रांती मोर्चा ......!



निमित्त मराठा क्रांती मोर्चा . ....!
गावात दोन एक वर्षा पूर्वी क्षत्रिय मराठा मंडळाची स्थापना झाली . आणि आम्ही मराठे एकत्र आलो .सभासद नोंदणी - वर्गण्या वैगेरे ओघाने आलच म्हणा पण या निमित्ताने इतके मराठे गाव पंचक्रोशीत आहेत हे पहिल्यांदा बघायला मिळाल तुडुंब भरलेला हॉल आणि कार्यक्रम सुरु झाला . पदाधिकारी यांची अपेक्षित भाषण झालीत . आणि मग आंमत्रित नेत्यांची एका पाठोपाठ भाषणांच्या फैरी कुणी म्हणे मराठ्यांन वर तसा कायम अन्यायच झालाय . त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे . आम्ही आजवर माती साठी लढलो आता जाती साठी लढणार . यातल्याच एका नेत्याने मराठा मुलां - मुलींनी दुसऱ्या जातीत लग्न करण्याला आक्षेप घेतला त्यांच्या मते म्हणे आपल्याच पोरी बाहेर गेल्या तर आपल्या पोरांनी काय करायचं इत्यादी इत्यादी तास भर वैचारिक कुटा कुटी झाली . लोकांच्या टाळ्या वैगेरे पडल्या. पण कुणा एकानेही मराठा समाजातल्या मुलांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला नाही .उलट आरक्षणामुळे मराठ्यांना नोकऱ्या कशा मिळत नाहीत हे अधिक रंजक पद्धतीने मांडण्यात आल. कार्यक्रमात सहभागी असलेल्या तरुण मुलांना यामुळे अधिक चेतवण्यात भर पडली .
हा आरक्षण एकजुट वैगेरेचा उत्साह मोजून सहा महीने टिकला आणि मग प्रकरण थंड पड़ल .मधल्या चार पाच मीटिंगा सोडल्या तर विशेष काही घडल नाही. पुन्हा वर्षभराने कर्यक्रमाच निमंत्रण आल म्हणाले तुम्हाला याव लागेल समाजाचा प्रश्न आहे. म्हटल सॉरी नाही जमणार गेल्या कार्यक्रमात आपण स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावे, लघुउद्योग कार्यशाळा ,करियर गाइडन्स, महिलांसाठी घरगुती उद्योग प्रशिक्षण शिबिर इत्यादि कार्यक्रम आखले होते .त्यापैकी एकही कार्यक्रम घ्यायला तुम्हाला टाइम नाही. उलट जाहिराती घेउन पदधिकाऱ्यांच्या फ़ोटो सहित दिनदर्शिका छापायला मात्र तुम्हाला वेळ मिळाला.
तरुणांना आश्वासक वाटाव म्हणून आमच्या तरुणांची भाषण ठेवत नुसता कार्यक्रम घेण्यात काय अर्थ आहे . त्यावर त्याच्याकडे उत्तर नसाव बहुतेक पण कार्यक्रम ठरल्या दिवशी झाला . पाहुणे आले त्यांच औक्षण झाल. नेत्यांची भाषण, गुणवंत मुलांचे सत्कार झाले आणि पुढ़ काहीच नाही याला आता दुरस वर्ष उलटल .
आज लाखोंच्या संखेत मराठा मोर्चे काढतोय हे चित्र जितक आश्वासक तितकच ते अनिश्चित वाटतय मराठ्यांना नेता नाही हे वास्तव या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झालय. फ़क्त आरक्षण हा एकमेव मुद्दा नाहिये ह्या उद्रेकाचा तर आजवर आपण का एकत्र आलो नाही ह्या संतापाची ही प्रतिक्रिया आहे .पण ह्या निमित्ताने तुम्ही प्रती काढलात तर आम्ही अति काढु ही तेढ़ हळूहळू अधिक वर येत राहणार आणि मग त्यातून मूळ उद्देश बाजूला राहून जाती जातीतल्या वादाच्या विकोप्याचा महासंग्राम उभा राहणार हे निश्चित .
विविध क्षेत्रताले आज एकत्र आलेले हे लाख मराठे एकवटुन शिक्षण ,रोजगार ,उद्योग, सामाजिक तिढा आणि अशा प्रश्ननांच्या मागे लागले तर किमान अंशी यातून तोडगा निघेल . आरक्षण मिळेल तेंव्हा मिळेल हो . ते काय नुसते मोर्चे काढून मिळणार नाही हे उघड आहे .
इतर समजातल्या संस्था संघटना यांचा गांभीर्याने अभ्यास व्ह्ययला हवाय. जैन समाजाच्या संघटनांच घ्या समाजासाठी हे लोक प्रमाणिक बांधिल आहे समाजातल्या आर्थिक दृष्टया दुर्बल असणाऱ्या समाजबांधवांसाठी यांच काम उल्लेखनीय आहे.शिक्षणा संधर्भात यांच काम बघाल तर पूर्वी फक्त व्यवसायात माहिर असलेला ह्या समाजातला तरुण वर्ग आज मोठ्या प्रमाणात IPS ,IRS ,प्रशासकीय अधिकारी ह्या बड्या हुद्यांवर कार्यरत आहे. अल्प संख्याक असूनही त्यांना कुठ आहे आरक्षण अर्थात आर्थिक दृष्ट्या हह्या समाजले बहुतांश लोक गर्भ श्रीमंत आहे हे वास्तव नकारता येणार नाही पण त्यांनी जे अचिव्ह केलय. कारण त्यामाग त्यांचा समाज खंबीर उभा आहे .
खरतर आरक्षण, विशेष सवलती वैगेरे ह्या गोष्टि तशा गौण आहेत मुळात आपली सकारात्मक मानसिकता,excellent educational power, helping comunity , achivment साठीच डेडिकेशन आणि सर्वात महत्वाच म्हणजे सामाजिक सौख्य ह्याने समाज उभा राहतो.
बाकि समाज धुमसत ठेवत राजकीय अजेंडा राबवायला वादग्रस्त प्रकरण अधिक चिघळवण हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी काही नविन नाही.


© Santo