निमित्त …………. !



गेल्या आठवड्यात आमची हि कधी काळची ठेवणीतली साडी नेसून कुठल्याशा सामाजिक संथेचा चर्चासत्र उरकून येतांना दिसली. मी चमकलोच बाई आज चक्क काठा -जरीच्या साडीत श्रावणातल्या मंगळा गवरीला अजून  बराच वेळ आहे. ……………. बाहेरून आल्या आल्या तिला फार प्रश्न विचारलेलं चालत नाही.  अशी तंबी तिनं मला कित्तेकदा दिलीय  ……………… पण माझ कुतूहल  मी फार काळ दाबून ठेवू शकत नाही हो ………… तिला थंडगार माठातल्या पाण्याच्या ग्लास देत म्हटलं …………। बाई ( मी अदबीनं तिला बाई म्हणतो ) आज काय मंगळा गवरीवर चर्चा सत्र होतं का ? …………… पाण्याचा निम्मा ग्लास संपवून बाई जरा खाकसुन म्हणाल्या अहो बर्वे तुमचा प्रश्नांचा तास सुरु झाला का ?  टिपिकल कोकणस्थ शोभता हो !……………. . नुसत्या चवकाश्या करण्यात तुमचा हातखंडा………….  अगदी पूर्वजांपासूनच  ………… तस नाही हो पण तुमच्या आजच्या गेट उप वरून ………….मला मधेच तोडत बाई बेडरूममधल्या कपाटाकडे वळल्या ……………… मागून मीही त्याच दिशने सरकलो. लग्नात बाईच्या मामाने वरातीत नाचवलेली ती पत्र्याची ट्रंक उघडल्याचा किर्र … आवाज आला.  ………… आज बाई पुन्हा भूतकाळात हरवणार याची कल्पना आली. आणि तितक्यात बाई म्हणाल्या बर्वे हि पहा आबांनी घेतलेली हि इरकली जरी काठ ……………… इस्लामपूरच्या "मेनका" साडी भंडार मध्ये आम्ही जेंव्हा बस्ता बांधायला गेलो ना तेंव्हा काचेत लावली होती. बघताच क्षणी मला पसंत पडली.  ……………… त्याकाळात ४०० रुपये मोजले होते आबांनी………इतकी महाग नको म्हणून मी नकार दिला.  पण एकुलत्या एक पोरीचं लग्न कसर नको म्हणून जरा ज्यादा  पैसे मोडले आबांनी……… मला कि नाई पूर्वी साड्या नेसायची फार हवूस शाळेतल्या कार्यक्रमात म्हणू नका गावल्या पूजेत म्हणू नका मी साडी नेसायला एका पायावर तयार ………… बाई एव्हाना काही वर्ष मागे मायगरेट झाल्या होत्या . पदराची नक्षी जशी आत -आत अधिक खोलवर गुंतते तशा बाई भूतकाळाच्या विणीत खोलवर गुंतत होत्या. 

बाई म्हणजेच स्मिता देषस्थ आणि मी कोकणस्थ दोन सरळ आडव्या रेषा कधीच न जुळणाऱ्या…………………पण आमचं जुळलं ते राधाक्का मुळे हि जबरी बाई.  बोलेल ते करुन दाखवणारी . आबांची मानलेली बहिण मी कोल्हापूरच्या विद्यापीठात रुजू झालो. तेंव्हा हिच्याच खाणवळीत दोन वेळ जेवत असे ………… नुसती तोंड ओळख ……आणि काहीदिवसातच घरोबा…………… आई दोन तीन वेळा कोल्हापुरात आली. तेव्हा राधाक्का कडेच राहिली होती. एकदा स्मिता तिच्याकडे गेली असता  राधाक्काने आईला विचारलं माझ्या भावाच्या पोरीला सून करते का ?  हो म्हण ग बये उद्या पोर तुझ्या पदरात टाकते .आई राधाक्काडं पाहत राहिली ………………… आणि हो- नाही म्हणायचा उशीर बाशिंग बांधून लग्न उरकलं पण ………… लग्नात मिळालेल्या त्या सगळ्या भारी साड्या बाईनी आजही जशाच्या तशा  जपून ठेवल्यात . राधाक्काने दिलेलं पटवारी लुगडं ………कराडच्या मावशीने घेतलेला पदरला लाल गोंडे असलेला आकाशी कर्नाटकी शालू …………. आईने मांडवात "सूनमुख " पाहतांना दिलेली राणी कलरची पैठणी …………… बाईनी एव्हाना सुटकेस रिकामा करून सगळ्या साड्यांच्या घड्या पसरल्या होत्या. आणि त्यांच्या हातात पिवळ्या जर्द्र आणि हिरवा काठ असलेल्या साडीच्या घडीला ह्रीदयाशी कवटाळल होतं …………माईनी घेतलेली लग्न लागतानाची हि साडी. स्वतः माईनी तिला ब्राम्हण काष्टा पद्धतीत नेसवली होती.  माई जाऊन वर्ष लोटलं असेल पण आजही बाई अनेकदा  भावनिक होतात . बाईना आईपण अनुभवता आलं नाही याची खंत सतत त्यांच्या मनात दडून राहिलेय . आणि आई अशी आर्त हाक मारताच क्षणार्धात दत्त म्हणून उभ्या होणाऱ्या माई आज हयात नाहीत ……………

साड्या दागिने ठेवणीत गेले हि काही काळ ते बंद पेटीत अंधारून जातात.  पण कधी निमित्त म्हणून त्यांना बाहेर येता आलं कि तेही पुन्हा नव्याने तेच क्षण अनुभवण्यासाठी घुटमळतात. अगदी ६० वर्षांच्या आज्जीने लग्नाचा बनारसी शालू पुन्हा त्याच हवषेने नेसवा अगदी तसंच …………. 


- संतोष टाकळे 

अकाड पावली……………!




आषाढाचा दुसरा दिवस …………… पावसानेही विश्रांती नंतर जोर धरलाय ……….  रानावनात हिरवळ अधिक गडद झालीय………याच आषाढात  अकाड पावलीला नव्या नवऱ्या माहेरात येतात. आषाढात म्हणे सासूच तोंड पाहत नाहीत.( तसही सुनांना सासूच्या फटकळ तोंडात फार रस नसतोच म्हणा  :p ) पूर्वी गावातल्या पाच बाया नव्या नव्हरीला आणायला तिच्या सासरी जात "आकाड पावली " या नावाने हा रिवाज आजही काही शहरा -गावात हवसेने निभावतात. चार भाकऱ्या किवां  शेर भर पीठ घेऊन माघारी जायची पद्धत आहे.किमान ८ दिवसांची सुट्टी घेऊन सासरवार्शीन निघते. गावातल्या पारावरच्या देवाला नारळ ठेऊन ती सासर सोडते ………………वडाप नाही तर एसटीने प्रवास सुरु होतो. तिच्या मनात अनेक गोष्टी पिंगा घालतात.  मधेच मनात येतं यांना करमेल का ८ दिवस माझ्या शिवाय ………. यांचा धीर ओढवेल का ?…………. चल काहीतरीच……………  गालावर गुंतनाऱ्या केसांची बट कानामागे सारत………………  हिरव्या माळावरच्या निळ्भोर पक्षागत उडाल्यागत होतं काहीवेळ …………. सोबतच्या बाया डोक्यावरचा पदर सावरत एकमेकीत बोलतात ………… काय ग भीमे सरूला बघ काय आनंन  झालाय …. माहेराच्या वाटेवर लागलो कि बये मन आधी धावत जातंय  घरा- आंगणात ………… साडीच्या काठावरून हळुवार हात फिरवत सरूही लाजते …………. एसटी फाट्यावर थांबते ……… माहेर जवळ आलं बये म्हणत एकच कालवा होतो. सरुही डोक्यावर पदर चढवते …… नाकातली नथ , गळ्यातलं मंगळसूत्र सरळ करते. मधल्या वाटेने एक उतार गेला कि घर दिसू लागतं …………. दारात बाया माणसं लांब नजर लावून उभी असतात . तांब्याभर पाणी अन मुठ भर तांदूळ पोरीवरून ववळून टाकून तिला घरात घेतलं जातं ……… माहेरात आल्यावर गांगरलेल्या तिला मैतरणी गराडा घालतात. तीही गालात हसत गमती जमतीत रमून जाते. 

दिवस वाऱ्यासारखे उडतात आणि परत माघारी परतायचा दिवस उजाडतो. मन आईच्या कुशीत रमलेल असतं. रोज नवा पदार्थ खावू घालत आईने लेकीचं माघारपण पोटभर केलेलं असतं. पोर नांदायला लागली याचं समाधान असतंच म्हणा पण तरीही अजून एक दिवस राहावी म्हणून गळ घालावी असा विचार येतो. ………………इतक्यात फटफटी थांबण्याचा आवाज येतो. जावई आले. म्हणत कुणी तरी तांब्याभर पाणी घेवून पुढं होतं. सरूचा चेहरा क्षणार्धात खुलतो. चुलीवर चहाचा टोप चढवत. एकीकडे रवा खरपूस भाजून शिऱ्याची लगबग सुरु होते. नेहमी पेक्षा आजचा चहा कडक आणि खास दुधाचा ………. शिऱ्यातही काजू गर , मनुका असा सुका मेवा पडतो. सासू जावई आलाय या आनंदात काय करू आणि काय नको म्हणत माज घरात वावरत असते. उफाळणारा चहा आणि शिऱ्याची   डिश घेऊन सरू माजघरात येते ………………. त्यांची नजरा - नजर होते. आणि ……………….काहीवेळ इकड तिकड च्या गप्पा रंगतात………मनगटातल्या  घड्याळ्याकडे पाहत  …………….  चला आता निघायला हवं म्हणत जावई आत निरोप पाठवतात ………सरू भरभर नवी साडी नेसते. शेजारची पम्मी तिची वेणी -फणी करते. लहान बहिणीने गुंफलेला परसातल्या ताज्या मोगऱ्याचा गजरा केसात माळला जातो. साडीच्या निऱ्या आणि पदर सरू दोन तीन दा पम्मी कडून सरळ करून घेते .लग्नानंतर फिरायला गेल्यावर त्याने त्याच्या आवडीने तिला घेतलेली ती साडी तिने नेसलेली पाहून तो मिशीत हसत भुवया उंचावून तिला दाद देतो. फटफटीला टांग मारून तो गाडी वळवून उभा राहतो. चल निघते आई म्हणताना सरूचा हुंदका फुटतो . पम्मी , सरू आणि आईच्या डोळ्यातही पाणी तरळत पण दिल्या घरी लेक परत जातेच कुणाला चुकलंय हे ……….म्हणत शेजारच्या बाया समजूत काढतात ………… जावयांच्या आधाराने सरू गाडीवर बसते ………गाडी डोळ्याची पापणी लवेस्तोवर …………. पिंपळाच्या पाराला वळसा घालून अंधुक होते.……………… शेवटी दारातली अबोली फुलली कि तिला कुंपण घालून ठेवता येत नाही. तिच्या साजेश्या धाग्यात ती बांधावी लागते. 

- संतोष टाकळे 

मर्यादेची मानसिकता ………………… !





मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये रेप झाला ,किवां तो करण्याचा प्रयत्न झाला.अशी बातमी काल परवाच येवून गेली . मुळात हल्ली संवेदना इतक्या बोथट झाल्यात कि अगदी मोजून १० सेकंद वाईट वाटतं आणि आपण दुसऱ्या घटनेकडे वळतो. नॉन stop न्यूज च्या जमान्यात बातम्याहि डेलिसोप पहावा तशा पहिल्या जातायत हे दुर्देव ………… विषय आहे तो मर्यादेच्या मानसिकतेचा …………. असभ्य वर्तन किवां पाशवी मानसिकता याची अनेक करण आहेत ती कदाचित तुम्हा सर्वांनाच माहित असावीत. इथे त्यावर जास्त बोलत बसत नाही. एक प्रसंग शेअर काराचाय त्यावर तुमच मत काय?  हे नक्की कळवा.

त्यादिवशी ११. २० ची चर्चगेट लोकल पकडून मी बोरीवली वरून निघालो………. तसही रात्री उशिरा डबे खाली असतात. अर्थात विंडो पकडून बसलो इतर डब्यात थोडी वर्दळ होती मात्र ……फस्ट क्लास अगदीच ओसाड पडलेला. कांदिवली स्थानकावर एक जोडी डब्यात आली . कोपरा पकडून ते बसले. ................ नेहमी प्रमाणे मी गजल ऐकत बसलो ………. इतक्यात बाजूच्या डब्यातून आवाज आला ………………… अतिशय वल्गर वाक्य होतं ते आणि क्षणार्धात शिव्यांची खडाजंगी सुरु झाली. एकीकडे प्रादेशिक भाषेतल्या अर्वाच्य शिव्या तर दुसरीकडे सो कॉल इंग्लिश वर्जन किमान १५ मिनिटे हा खेळ सुरु होता. नेमक काय झालं हे कळेना अखेर बाजूच्या डब्यातल्या माणसाने सागितलं अहो हे दोघे इथ बसून घाणेरडे चाळे करत होते. त्यावर मी रोखलं तर हि पोरगी आम्हालाच इंग्लिश मधून शिव्या द्यायला लागली. माझ्या सोबत माझी बायको आहे. माझी दोन वयात आलेली मुलं आहेत. त्यांच्या सोमर हे असलं  काही पाहणं म्हणजे …………… मी एक नजर त्या दोघांकडे पाहीलं  त्यांचे branded कपडे , हातातले महागडे मोबाईल्स आणि एकंदरीत त्यांचा लूक तसा "श्री"मंती वाटला. 
एव्हाना त्यांना अधिक सुनावणारे अनेक जण उभे ठाकले होते. पुढच्या स्थानकावर ते दोघे उतरले ……………… पण हा विषय इथे संपला नाही डब्यात उलट सुलट चर्चेला उत आला . अनेक प्रसंगावर चर्चा झाली. असे कित्तेक उथळं परिसंवाद मी यापूर्वी ऐकले आहेत . म्हणून त्याकडे अधिक लक्ष न देता. या प्रसंगाच्या अनुषंगाने संधर्भ चाळत असतांना लक्षात आलं कि शेवटी "असभ्य वागणारी माणसचं आणि सभ्य वागणारीही माणसचं " .............  फरक वर्तनातला कि मानसिकतेतला ……………. ????? 

चोपाटी, पार्कात किवां अन्य सार्वजनिक ठिकाणी वयात आलेल्या तरुणाईने आणि इतर  भरात  आलेल्या जोडप्यांनी मर्यादेची मानसिकता पाळली तर कुठं बिघडतंय …………. पार्कातल्या झाडाखाली प्रीयसिला मिठीत ओढताना तुमच्या मनात नेमकं काय होतं ते तुम्हालाच ठाऊक मात्र इतरांना काय वाटेल याचा विचार केलात तर …………………… !


- संतोष टाकळे 

जगणं जिगरबाज ……………!




सिग्नलला गाडी थांबली आणि १ ० एक वर्षाची पोर गुलाबाच्या फुलांचा झुबका घेवून जवळ आली. साब लो ना ताजा फुल है ! पावसात भिजून गुलाब अधिक फ्रेश वाटत होते . एक क्षण ते घेण्याचा मोह झाला . पण इतक्यात ग्रीन सिग्नल लागला आणि गाडीने पुन्हा वेग घेतला. गेले काही दिवस रोज याच सिग्नलवर ती चिमुरडी दिसते. कधी गुलाब घेवून तर कधी निशिगंधाच्या पांढऱ्या शुभ्र काड्यांचा गठ्ठा घेऊन . प्रत्येक गाडीच्या काचेसोमर ती फुलांचा झुबका धरते आणि डोळ्यात करुण भाव आणत ते विकण्याचा प्रयत्न करते. विस्कटलेले केस,मळलेला झगा, काळवंडलेला चेहरा इतकं  असूनही तिच्या डोळ्यात मात्र एक वेगळी चमक दिसते . नहि चाहिये म्हणत कुणी तिला झिडकारल ……………कि काही सेकंद तिचा चेहरा कोमेजतो पण क्षणार्धात पुन्हा ती दुसऱ्या गाडीच्या काचेतून डोकावते……………….   हातातल्या गुलाबाच्या झुबाक्याकडे पाहत … आणि एकदा त्याची बोली लावते. कुणीतरी म्हणत ६ ० नाही ४ ० दुंगा बोल देना है ! साब ५ ० तो दो म्हणत ती तिची शेवटीची गळ घालते . पण हातच गीऱ्हाईक जातंय असं वाटलं तर लगेच लो साब ……… म्हणत तो झुबका काचेतून आत सरकवते . इतका वेळ सिग्नलला रेंगाळत असलेल्या त्या गुलाबांच्या नशिबी आलिशान गाडीत बसलेल्या madam च्या हातात जाण्याचं भाग्य मिळतं . आणि ती बापडी १ ० च्या चार नोटा नाचवत फुटपाथच्या दिशने धाव घेते. तिच्या कित्तेक तासांच्या प्रयत्नाला यश आलेलं असतं. फुलांचे गुच्चे बांधत बसलेली तिची आई लेकीला जवळ घेते. तिच्या गालावरून हलकासा हात फिरवत तिला शाबासी देते.ती कोवळी पोर या प्रेमाने भारावून जाते.  आईला घट्ट कवटाळून तिच्या मिठीत विसावातेय इतक्यात तिचा बाप पुन्हा एक गठ्ठा तिच्या हातात कोंबतो …………….  पदराने तिची आई लेकीच तोंड पुसते, केस निट करते, फडक्याखालच्या बाटलीतल दोन घोट पाणी पाजते. पुन्हा त्या पोरीला तरतरी येते. सिग्नल लाल होतो गाड्या थांबतात ………… धावत ती गाड्याच्या दिशेने पळते……. आणि पुन्हा साब लेलो ना म्हणत ती गाड्याच्या गर्दीत हरवून जाते ………एवढ्या तेवढ्या अपयशाने खच्चून जाणारे आपण हिला पाहून शरमलो नाही तर नवल…………तिची जिद्द , परिस्थिती आणि च्यालेंज स्वीकारण्याच जिगर पाहिलं कि वाटत.  आपण का रडतो नेमही .

सुखावणाऱ्या  AC कारच्या आत बसलेल्या माझ्या आणि पावसात भिजत फुलं विकणाऱ्या तिच्या जगण्यात नेमका काय फरक . …………. तिचं जगणं जिगरबाज आहे. बेधडक संघर्षाचं आणि माझ जगणं "शो"बाज आहे. diplomatic मुखवट्याच …………. ! 

- संतोष टाकळे

कामवाली ……!




इनिस्पेक्षण करतेय ………….  असं वाक्य कानावर पडतं आणि  चक्क माधुरी दीक्षित कामवाल्या बाईच्या क्यारेटर मध्ये दिसते . भुवया उंचावून लोक म्हणतात हिला काय भिक लागलेय अशी जाहिरात करायला ……… असो पण सध्या घरकाम करणारी बाई मिळणं कठीण झालंय …… working वुमनच्या जमान्यात यांचा भाव वधारलाय आणि डिमांडहि. 

कालच एका मित्राकडे जेवणाचं आमंत्रण होतं. साग्रसंगीत स्वयंपाक झाला होता. मोसमातल्या शेवटच्या आंब्यांचा आमरस, कुर्मा भाजी, पुरी , चटणी , कोशिंबीर , भरलेल्या मिरच्या, आणि साजूक तुपाची धार टाकून केलेला मसाले भात, कित्तेक दिवसांनी असं ब्राम्हणी जेवणाचा आस्वाद घेत होतो. अगदी तृप्त होऊन हातावर पाणी सोडताना म्हटलं वाहिनी मस्त झाला बेत "मसाले भात "तर अफलातून ………… त्यावर मित्राने लगेच चान्स मारला ……अरे तुझ्या वाहिनीने स्वयंपाक करून काळ लोटलाय   …………  त्यावर  - इति वाहिनी ……… Sunday ला पास्ता , पिझ्झा, बर्गर , हादडतोस ते काय तुझी ………… करते का ? मी मनात म्हटलं उगाच आगाऊपणा करायची काय गरज होती जेवण कुणी का करेत ना पोट भरलंय तर सरळ घरचा रस्ता पकडायचा सोडून मार तरीफा करत बसलाय …………. त्या दोघांची खडा जंगी अजून चालूच होती. मी जरा अव्ह्गडून म्हटलं बरं येतो मी बराच वेळ झालाय… ……… कदाचित त्यांना मी इथे आहे याच भान राहिलेलं नसावं. ………भानावर येत दोघेही शांत झाले. वाहिनी म्हणाल्या अहो हे नेहमीचंच आहे. जरा म्हणून कवतुक नाही माझं या माणसाला ………. ते जाऊदे अहो पण फालुदा केलाय तो खाल्या शिवाय मी बरी सोडेन तुम्हांला ……… वाहिनी किचनकडे वळल्या आणि मित्र म्हणाला हसतोस काय तुझ लग्न झालं कि हे सगळं तुलाही भोगावं लागणार आहे . 

 हाह्हाहः अरे पण हा स्वयंपाक कुणी केला ? ………. अरे कुणी म्हणजे काय आमच्या सुलभा काकूंनी ……… ओह्ह म्हणजे तुमच्या कामवाल्या का ? हो त्याच पण त्यांना आम्ही कधी कामवाली म्हणून वागवलं नाही अरे गेली ३ ० वर्ष त्या आमच्याकडे काम करता आहेत सगळं घर आम्ही त्याच्या हवाली करून जातो.  पण इथली वस्तू तिथे काय होयील …………. मी तर लहानपणा  पासून सुलभा काकूंच्या हातचं जेवतोय आई सरकारी नोकरीत बाबा शिक्षक ,सुलभा काकूंनी घर सावरलं …… आत्ता त्या पार थकल्यात काम जमत नाही त्यांना पण तरीही येतात.  अगदी मनापासून करतात सगळं सध्या त्यांची सून येते सोबत बाकी जड काम त्यांची सून उरकते पण जेवणाच्या फोडण्या मात्र सुलभा काकूच घालते अस्सल चव आहे तिच्या हाताला. कामात त्यांच्या सुनेने जरा धूसमुसळेपणा केला.  तर तिला तिथल्या तिथे झाडतात अगदी हक्काने ……… सकाळी आम्ही आज काय बनवायचं याची यादी ठेवतो त्यानुसार सगळे पदार्थ संध्याकाळी तयार असतात एकादी वस्तू कमी पडली तर सुलभा काकू तिच्या नऊवारीच्या पदराच्या कोपऱ्यात बांधलेल्या पैशाची मोड करून ती वस्तू घेवून येते आणि आठवड्याच्या शेवटला  हिशोब देते … आजतागायत आम्ही तिचा हिशोब कधी तपासाला नाही. कधी वेळच नाही आली तशी. सुलभा काकूंन  बद्दल बोलतांना मित्राच्या डोळ्यात आपलेपणाची चमक होती. आणि जिव्हाळा तर स्पष्ट जाणवत होता. 

समोर फालुद्याचा ग्लास होता. त्यातल्या तीन चार थरात भरलेला प्रत्येक पदार्थ वेगळा होता. वर दिसणारा सुका मेवा , आईस्क्रीम, सब्जा लाल रंग आणि इतर सगळं बाहेरून उठून दिसत होतं मात्र या फालुद्याची खरी मजा ज्या मलाई दुधामुळे येते तो मात्र या सगळ्या सजावटीत अनोळखी झाला होता. अगदी सुलाभा काकुं सारखा ……….

- संतोष टाकळे  

लग्न…………. !





अमोलचं लग्न आता अगदी ५ दिवसांवर येवून ठेपलंय . अजून बरीच तयारी बाकी आहे. या भर पावसात या पोराने आम्हाला मांडव घालायला लावला. आणि चक्क छत्री घेवून आम्ही कामाला लागलो. शेवटी घरातलं लग्न . बस्ता बांधायला गेलो तेव्हा मी पण चान्स मारला लगेच २ कुर्ते ohh sorry ईट्स शेरवानी घेवून टाकल्या. म्हणजे करवला म्हणून मी नको का उठून दिसायला मांडवात . तसही मलाच करायचं सगळं पुढारपण . ते जाऊदे हो पण या पावसात घोडा मिळेना वरातीला………… त्या खेडच्या खान घोडेवाल्याला फोन केला तर मेल्याने १ ० हजार सांगितले वर म्हणला जोरात पाऊस आला आणी घोडा उधळला तर आम्ही जबाबदार नाही . अमोलला म्हटलं नको रे बाबा त्या घोड्याच्या फंदात पडुस कशाला मुक्या जीवाला त्रास आणि तसही दापोलीत मुसळधार पाऊस पडतोय घोड्यावर मेनकापड घालून वरात काढावी लागेल…………. अनेक अडचणी लक्षात घेता घोड्याचा प्लान आम्ही drop केलाय …. तरीही वरात निघणार गावातली पोरं म्हणाली पावसात भिजून गारठलो तरी चालेल पण अमोल भाऊजी वरात आपण गाजवणार ( यांना काय जातंय गाजवायला चार बाटल्या पोटात गेल्या कि एक एक गडी धुमशान घालायला तयार पण च्या आ… ला आमच्या तोंडाला फेस येणार बहुतेक ) या पोरांचा हुरकतोय तोच शिंदे पाटलीनीचा फोन तिच्या खास टोन मध्ये ……… बालाणु कस हाव………. अव त्या बुरोंडकराच्या पोराचा लग्न दापोलीत कंच्या हाल वर हाय…. मी - आकाबाय त्या राधा क्रिष्ण हॉल मध्ये ………व्हय काय म्हणवा तुम्हाला जल्ल्ला पाऊस काय पडतोय……. मे महिना सुका गेला तवा उरकायचा तो आता घेत्लाव…… ता राहूदे सगला मना सांगा वाराडाला गाडी कोन्ची केलीव हाव . टरक बिरक नका बा करू हल्ली बाया काय टरकात बसत नायत .बाकी मी ठेव्हाता आता फोन या बंड्याच्या मोबिल मधी जास्त पैसं नायत.

एके काळी आम्ही ट्रकात बसून नवऱ्या मुलासोबत लग्नाला जात असू आडगावातल्या त्या नागमोडी वळणावर गाडी धावताना मागे हवदात होणाऱ्या गंमती जमती ……. घोगऱ्या आवाजात लग्नाची गाणी म्हणणाऱ्या बाया , धक्का लागला म्हणून केसात अबोलीचा गजरा घातलेल्या आणि हळुवार लाजणाऱ्या त्या पोरी … वांत्या करून बेजार झालेली बारीक पोरं ……गाडी खड्यात आपटली कि आईगं बायगं करणाऱ्या हव्शी म्हाताऱ्या , लग्नाच्या गावात पोचल्यावर होणारं नवऱ्या कडच्या लोकांचं जंगी स्वागत, सारवलेल्या मांडवात लागणाऱ्या पंगती त्यातही ठरलेली कोबी - हिरव्या वाट्याण्याची भाजी , गोडी डाळ , भात आणि बुंदीचा लाडू असा मेनू ………… मंगल अक्षदा सुरु झाल्या कि हुंदका देत डोळे भरून खाली मान घालून मांडवात येणारी ती सोजवळ नव्हरी ……… लग्न लागलं कि जोशात वाजणारा खालु बाजा नवरा नवरीला बघायला जमलेली गर्दी … अजूनही हे चित्र काही गावत टिकून आहे पण फार दुर्मिळ होत चाललंय हे सगळं .

या उलट सध्या सगळ्या गोष्टी कंत्राट दिलं कि हजर होतात. अहो पण मी काय बोलत बसलोय अजून बरीच कामं पडलीयत फोटो वाला येयील इतक्यात , डेकोरेशन वाल्याला advances द्यायचाय. लग्नात आम्ही return गिफ्ट म्हणून छत्र्या वाटणार आहोत त्याची डिलिवरी घ्याचीय. हा सावताचा गण्या कुठ उलटलाय काय माहित मेला नेमका कामाच्या टायमाला गायब असतो. अमोल च्या डोक्यावर अक्षदा पडल्या शिवाय आता काय मला फुरसत नाय ………अरे देवा अक्षदा वरन आठवलं त्या अजून रंगवायच्या बाकी आहेत………शेवटी काय हो जगणं रंगात डूबवल्या शिवाय आयुष्याचा इंद्रधनुष्य उमटत नाही . 


- संतोष टाकळे 

वडा मला पाव ………!



करवंदाचा वाटा कितीला ? फणस दोघीत घेवूया का ग ? मी बाई वडाची फांदी घरातच  पुजते एवड्या पावसात  कुठे शोधू वड.तुझी पहिलीच वटपौर्णिमा असेल ना तू बाई वडावरच  जा पुजायला आमचं काय वय झालं आता ………. लाजतेस काय नवऱ्या कडून चांगली साडी घे मागून.   मधेच……… फांदी कितीला दिलीस ……… १० रुपये झाडाच्या पानाला पण काय मेला भाव आलाय . काळे मनी तेव्हडे राहिले . ते काय शर्माच्या दुकानात भेटतील. ………… सकाळी बाजारात कानावर पडलेला  सवांद ऐकला आणि अरे उद्या पौर्णिमा अशी उशिराची ट्यूब पेटली. 

सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेवर आधारित हि पूजा ………… सुवासिनीच अमर वरदान ………. जन्मो जन्मी हाच नवरा मिळेल याचं conformation देणारं हे व्रत आमची हि वर्षांनी एकदा माझ्या पाया पडते तो माझ्या आयुष्यातला जागतिक सन्मान दिवस उद्या येणार आहे.  हि पण जाईल उद्या आमच्या सोसायटीच्या लेडीज  सोबत नाक्यावरच्या उघड्या मारुतीच्या देवळात . देवळाच्या पारावर भला मोठा वड आहे. तिथे होते हि पूजा अगदी साग्र संगीत. आमचं लग्न झालं त्या पहिल्या वर्षी मी पण गेलो होतो. स्मिता सोबत , पहिल्या वर्षी म्हणे नवरापण लागतो असल्या पूजेत . तिथे अजून ३ - ४ माझ्या सारखेच नवे कोरे नवरे आले होते. आम्ही सगळेच अवघडून उभे होतो. वडाभोवती गोल गोल फिरणाऱ्या आमच्या बायका मला सेल वर चालणाऱ्या बाहुल्या वाटल्या अगदी एका लयीत त्यांची पावलं पडत होती. अंगावरचे दागिने, जरीच्या साड्या, नाकातल्या नथी ,डोईवरचा पदर त्यातून डोकावणार गुलाबाचं फुल लटकणारे जुईचे गजरे, पार्लरचा उठून दिसणारा मेक उप इत्यादी आदी ……………… हल्लीच्या सणात ,व्रत वैकल्यात  show बाजी आलीय दागिने ,भारी साड्या ,जेवणावळी ,मोठाले मंडप , महागड्या वस्तू , असा भंपकपणा वाढला आहे. त्या मिसेस भंडारीनां बघा त्यांच्या नवऱ्याने ४ तोळ्याच्या श्रीमंत हार केलाय गेल्या दिवाळीत आणि तुम्हाला नुसती एक पैठणी आणायला सांगितली तर अजून मुहूर्त सापडत नाहीये  ( माझ्या सारख्या पेपरात बातम्या करणाऱ्या सामान्य पत्रकाराला १ ५ हजाराची पैठणी घ्यायची म्हणजे साला पुढचे ४ महिने चहा "पाणी" बंद करावी लागेल. ) 

मला काही क्षण आईची आठवण झाली. माळ रानावरच्या आमराईतल्या कित्तेक वर्ष जुन्या वडाखाली गावातल्या बाया जमत भारी नसल्या तरी ठेवणीतल्या साड्याचा काठ पदराची जरी चमचम चमकत असे. कपाळावरच्या ठसठशीत  कुंकवाचा अर्धा चंद्र , गळ्यातलं साध धग्यातल मंगळसूत्र सगळं अगदी खरं खुरं आजच्या रंगवलेल्या मेकउपच्या आड लपलेला खोटेपणा त्याकाळी नव्हता म्हणून तेंव्हा वटपौर्णिमा असो वा मंगळा गौर  चार जणी मनापासून एकत्र येत आजच्या सारख्या फक्त formality म्हणून नाही . कारण fashion म्हणून नऊवारी साडी नेसणं वेगळं आणि परंपरा म्हणून  नऊवारीचा पदर मानानं डोईवर चढवणं वेगळं . 

- संतोष टाकळे 

फेसबुक वाले……… !





फेसबुक म्हणजे फक्त times pass हा गैरसमज किमान माझ्यापुरता तरी दूर झालाय. …………. मागच्या आठवड्यात मित्राच्या लग्नात एक मध्यम वयीन गृहस्त भेटले. मी तुमचा fan आहे वगरे अशी त्यांनी फिल्मी सुरवात केली. मला काही कळेना मी म्हटलं अहो मी कुठल्याही मालिकेत काम करत नाही . तुम्हाला नक्की कुणाशी बोलायचं त्यावर ते थोडसं मोकळं हसत म्हणाले ते फेसबुक वाले संतोष टाकळे तुम्हीच ना ………(फेसबुक वाले हे खरतर जरा अति होतंय ) ………… मी उगाच जरासं हसून हो मीच तो बोला कि काय म्हणताय ………… तुम्ही ज्या पोस्ट केल्यात त्या फार आवडतात मला ……… हो का ? thank you so much …………मला ती तुमची साहेब ........पोस्ट खूपच आवडली. पवार साहेबांबद्दल तुम्ही किती उघड लिहिलंय त्यात …. सोबत वटपोर्णिमा , महिला दिन , मनसे आणि काल परवाच वाचलेली साडी घेताना उडालेली धम्माल तर काय विचारूच नका आमच्या madam ना पण आवडली ती ………… कुठे गेली म्हणत त्यांनी चक्क त्यांच्या madam ना लग्नातल्या रंगीबेरंगी गर्दीतून शोधून काढलं. त्याही अगदी सर हे छान लिहिलंय तुम्ही ……… ते तर मस्तच आहे . ………………………. तब्बल २ ० - २ ५ मिनिटे हा सोहळा चालला. मला उगाचच मोठा लेखक वेगरे झाल्याच्या गुदगुल्या झाल्या. तसही आज काल कुणीही भेटलं तरी FB च्या पोस्टचा विषय येतोच. अखेर निघतांना ते त्यांच्या १ ५ - १ ६ वर्षाच्या मुलाकडे पाहत म्हणाले सर याला तुमच्या सारखं पत्रकार बनवाचय मला ………बघतोस काय सरांच्या पाया पड तो पोरगा लगेच वाकला पण त्याने नमस्कार करावा इतका काही मी मोठा नाही. म्हणून मी त्याला थांबवलं . लिखाणातून व्यक्त झालेल्या विचारांनी मिळालेली हि ओळख आणि सन्मान भारावून टाकणारा असला तरी अधिक जबाबदारी देणारा आहे. याची जाणीव झाली.


या निमित्ताने सोशल नेटवर्किंग चा मिस युज करणाऱ्यांची आठवण झाली. मुलींचे प्रोफाईल हेरून त्यांना blackmail  करणारे , अश्लील फोटो उपलोड करून घाण करणारे, किवां अगदी उत्तराखंड मधे झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेत. मदतीचा हात देतो म्हणत फेक पेजेस open करून लोकांकडून पैसा गोळा करणारे सुशिक्षित चोर या साऱ्यांनीच सोशल नेटवर्किंगची इमेज खराब केलीय. जग जवळ आणणारं हे प्रभावी माध्यम आज तुमच्या सारख्या मित्रांना जोडणारा स्मार्ट वे ठरलाय. पण काहींना हे फक्त Time PASS करण्याचं उनाड ठिकाण वाटतंय ………लोकांची मानसिकता बदलणं कठीण आहे. आपला प्रयत्न चालू ठेवूयात पाहूयात कधी घडतोय बदल …


- संतोष






साडी...........!




काल हिला साडी घ्यायला दादरच्या एका शोरूम मध्ये गेलो. येत्या आठवड्यात मित्राचं लग्न आहे. त्याचीच तयारी ………… १ तास झाला किमान ढीगभर  साड्या समोर येवून पडल्या त्यातल्या दोन तीन आवडल्या बाईना पण त्यातही अनेक गोष्टी खटकत होत्या उदा … अय्या हि डाळिंबी कलरची मस्त आहे नाई पण हिचा काठ उठून नाही दिसत ………… हि मोरपिशी पण बरी आहे . पण पदर फारच साधा आहे. नक्षीकाम कमी वाटतंय …………खरतर मला ना हि शेवाळी कलरची बनारसी पट्टी फारच आवडलीय पण जड बघा किती आहे, मी साडीच्या काठाला आतल्या बाजूने लावलेला किंमतीचा ट्याग पहिला …………Rs - ७ , ८ ० ० /- only . एव्हाना मला आणि साडी दाखवणाऱ्यालाही घाम फुटला होता. माझी नेमकी reaction त्याला उमजली असावी …………… तो म्हणाला madam मला वाटतं हि डाळिंबी कलरचीच तुम्हाला जास्त सूट होईल. price tag पहिला तर …Rs - २ , ५  ० ० /- only माझा आनंदलेला चेहरा पाहून सेल्समन म्हणाला साहेबांनाही हीच साडी आवडलेय या वेळेस त्यांच्या पसंतीची घ्या …………………… साहेबांची पसंती ……………. अहो मागे दिवाळीला आणलेल्या साडीचा कलर एका धुण्यात गेला  गोणता झालाय त्या साडीचा …………त्यांची कसली डोंबल्याची choices ………….…………. तरीही माझ्याकडे पाहत ती म्हणाली अहो सांगाना कोणती घेऊ हि ……… कि………  ती  ७ , ८ ० ० ची साडी त्या ढिगाऱ्याच्या खाली कोंबत मी म्हटलं तुला डाळिंबी कलर काय खुलून दिसेल नाई .



 ७ , ८ ० ० ते  २ , ५  ० ०  हि लांब उडी अचूक मारल्याच्या निखळ आनंद सोबत घेऊन शोरूम मधून बाहेर पडताना नेमकं काय फील केलं ते असं शब्दात मांडण कठीण आहे. 


- संतोष टाकळे 

टोम्याटो....!



दिवसभर ऑफिसच्या फायली उलटवून संध्याकाळी घरी जायला निघालो तर पावसाची रिप रिप सुरु होतीच स्टेशनला उतरतोय इतक्यात हिचा फोन आला. अहो ऐकलत का ? येताना जरा भाजी आणता का ? एक वेळ बॉसला मी नाही म्हणेन पण हिला ……… अजून तरी तेव्हडी डेरिंग नाही आली माझ्यात ……… हे पाव किलो ते अर्धा किलो हिची यादी वाढत गेली. हातात ब्याग ,छत्री आणि स्टेशनची तोबा गर्दी साला वैताग आहे …… अग मला मेसेज कर …. दुसऱ्या मिनिटाला यादी आली … १ किलो कांदे ,हिरवी मिरची , आलं , कोतीम्बीर , टोम्याटो , भेंडी , वांगी …… स्टेशनच्या दुतर्फा भाजीवाल्यांची लाईन आहे . त्यात घुसलो … पावसाच्या पाण्याने रस्त्यावर चिखलाची चिक चिक झालेली पण पावसात भिजून भाज्या मात्र ताज्या तवान्या झालेल्या. निळीशार वांगी बघताच क्षणी पसंत पडली आई काय मस्त भरलं वांग करायची …. स्मिताला नाही जमत तितकंस ……… पण हे तिच्या तोंडावर बोललो तर उद्या डबा काय साधा चहा मिळणार नाही ………आणि उगाच गालात हसलो मी ……वांगी झाली . आणि लगोलग भेंडी , कांदे ,आलं, मिरची , घेतली एव्हाना १ ० ० ची नोट संपत आली होती. टोम्याटो च्या गाडीवर गेलो आणि भाव विचारला …. भैया कैसा दिया टमाटर … भैया गिराहिकांच्या गरड्यात होता. दोन वेळा विचारल्यावर त्याने उत्तर दिलं साब १ ५ रुपये पाव …. बाप रे इतना महेगा त्याने कुतूहलाने मला निरखून पाहिलं क्या साब दोन दिन से याही भाव है …. स्मिताने यादीत टोम्याटो च्या पुढे १ किलो लिहल होत ना इलाज फटक्यात ६ ० रुपये उडणार मी बराच वेळ रेंगाळतोय हे भैयाच्या लक्षात आलं आणि तो खेकसला साब लेना है तो लो खाली टायीम खोटी मत करो ……… तुझे क्या इतनी जल्दी पडी है ……. दे ना १ किलो माझा आवाज चढला आणि त्याचा उतरला.

भाजीपाला घेऊन घरी पोहचलो तर madam मालिका पाहत होत्या. ओह्ह शिट how रबिश लग्न झालंय तरी हिचा बॉय friend , माझ्या हातातल्या पिशव्या तशाच मी भिजून गार पडत आलो होतो. आणि हिचं त्या मालिकेच्या लफड्यात लक्ष काय म्हणावं ............. भाजीच्या पिशव्या किचन मध्ये नेऊन ठेवल्या आणि हात पाय धुवून मी change करून बाहेर आलो तरी madam सोफ्याला चिकटलेल्या . मी केसातल पावसाळी पाणी टिपत होतो. मी म्हटलं आज बाहेर जायचंय का ? जेवायला ………. जेवणा शिवाय तुम्हाला काय सुचतं का ? पोट बघा किती वाढलंय ……… जेवण तयार आहे . फक्त टोम्याटोची चटणी करायची बाकी आहे …. अग पण ……. मी काही बोलणार इतक्यात तिने चार टोम्याटो कापून तव्यावर घातलेच …. डेरिंग करून मी म्हटलं अग टोम्याटो ६ ० रुपये किलो आहेत …… काय ती जवळ जवळ किंचाळीच बंडल नका मारू परवाच आणले मी ३ ० रुपये किलो होते . या महागाईला सुमार नाही हो … बरं हे किती ते किती रुपये किलो याची उजळणी तिने घेतली सगळे भाव चढे होते शेवटी ५ रुपयाचा कडीपत्ता …………. हे ऐकून तिचा पारा चढला ………. एक काम धड करत नाहीत तुम्ही कडीपत्ता विकत आणत का कुणी तो complimentary असतो. एवढी भाजी घेतल्यावर, …………… हल्ली बार मध्ये पण चणे ,वाटणे , चकली complimentary म्हणून मिळत नाही आणि तू …………… बस करा तुमची पत्रकारिता लगेच दाखले नकोत मला …………बघत काय बसलाय ताटं घ्या लवकर आराधना लागेल एवढ्यात आज पूजाला संभव ओळखणार आहे … मी कपाळावर हात मारला आणि ताटं मांडली …………पण त्या ६ ० रुपये किलो टोम्याटोचा विषय डोक्यातून जात नव्हता ज्याला शक्य आहे तो १ ० ० रुपये किलो झाले तरीही घेणार ………… आज माझ्या ताटात टोम्याटोची चटणी होती पण मी १ किलो टोम्याटो घेताना जे भाव विचारून न घेता परत गेलेत त्यांच्या डाळीत चवीला पण टोम्याटोची एक फोड नसेल याची हुरहूर मात्र मनाला लागून राहिली .
आणि वाटलं राहुल गांधी , मोदि किवां अगदी अडवाणी प्रधानमंत्री होवोत नाही तर न होवोत आम्हाला त्याशाची देणं घेणं नाही पण जगण्यासाठी दोन घास खाण्याचे जिन्नस तरी किमान आमच्या आवाक्यात असावेत……


बाकी तो मेरा भारत महान है ! 

- संतोष टाकळे