आषाढाचा दुसरा दिवस …………… पावसानेही विश्रांती नंतर जोर धरलाय ………. रानावनात हिरवळ अधिक गडद झालीय………याच आषाढात अकाड पावलीला नव्या नवऱ्या माहेरात येतात. आषाढात म्हणे सासूच तोंड पाहत नाहीत.( तसही सुनांना सासूच्या फटकळ तोंडात फार रस नसतोच म्हणा :p ) पूर्वी गावातल्या पाच बाया नव्या नव्हरीला आणायला तिच्या सासरी जात "आकाड पावली " या नावाने हा रिवाज आजही काही शहरा -गावात हवसेने निभावतात. चार भाकऱ्या किवां शेर भर पीठ घेऊन माघारी जायची पद्धत आहे.किमान ८ दिवसांची सुट्टी घेऊन सासरवार्शीन निघते. गावातल्या पारावरच्या देवाला नारळ ठेऊन ती सासर सोडते ………………वडाप नाही तर एसटीने प्रवास सुरु होतो. तिच्या मनात अनेक गोष्टी पिंगा घालतात. मधेच मनात येतं यांना करमेल का ८ दिवस माझ्या शिवाय ………. यांचा धीर ओढवेल का ?…………. चल काहीतरीच…………… गालावर गुंतनाऱ्या केसांची बट कानामागे सारत……………… हिरव्या माळावरच्या निळ्भोर पक्षागत उडाल्यागत होतं काहीवेळ …………. सोबतच्या बाया डोक्यावरचा पदर सावरत एकमेकीत बोलतात ………… काय ग भीमे सरूला बघ काय आनंन झालाय …. माहेराच्या वाटेवर लागलो कि बये मन आधी धावत जातंय घरा- आंगणात ………… साडीच्या काठावरून हळुवार हात फिरवत सरूही लाजते …………. एसटी फाट्यावर थांबते ……… माहेर जवळ आलं बये म्हणत एकच कालवा होतो. सरुही डोक्यावर पदर चढवते …… नाकातली नथ , गळ्यातलं मंगळसूत्र सरळ करते. मधल्या वाटेने एक उतार गेला कि घर दिसू लागतं …………. दारात बाया माणसं लांब नजर लावून उभी असतात . तांब्याभर पाणी अन मुठ भर तांदूळ पोरीवरून ववळून टाकून तिला घरात घेतलं जातं ……… माहेरात आल्यावर गांगरलेल्या तिला मैतरणी गराडा घालतात. तीही गालात हसत गमती जमतीत रमून जाते.
दिवस वाऱ्यासारखे उडतात आणि परत माघारी परतायचा दिवस उजाडतो. मन आईच्या कुशीत रमलेल असतं. रोज नवा पदार्थ खावू घालत आईने लेकीचं माघारपण पोटभर केलेलं असतं. पोर नांदायला लागली याचं समाधान असतंच म्हणा पण तरीही अजून एक दिवस राहावी म्हणून गळ घालावी असा विचार येतो. ………………इतक्यात फटफटी थांबण्याचा आवाज येतो. जावई आले. म्हणत कुणी तरी तांब्याभर पाणी घेवून पुढं होतं. सरूचा चेहरा क्षणार्धात खुलतो. चुलीवर चहाचा टोप चढवत. एकीकडे रवा खरपूस भाजून शिऱ्याची लगबग सुरु होते. नेहमी पेक्षा आजचा चहा कडक आणि खास दुधाचा ………. शिऱ्यातही काजू गर , मनुका असा सुका मेवा पडतो. सासू जावई आलाय या आनंदात काय करू आणि काय नको म्हणत माज घरात वावरत असते. उफाळणारा चहा आणि शिऱ्याची डिश घेऊन सरू माजघरात येते ………………. त्यांची नजरा - नजर होते. आणि ……………….काहीवेळ इकड तिकड च्या गप्पा रंगतात………मनगटातल्या घड्याळ्या कडे पाहत ……………. चला आता निघायला हवं म्हणत जावई आत निरोप पाठवतात ………सरू भरभर नवी साडी नेसते. शेजारची पम्मी तिची वेणी -फणी करते. लहान बहिणीने गुंफलेला परसातल्या ताज्या मोगऱ्याचा गजरा केसात माळला जातो. साडीच्या निऱ्या आणि पदर सरू दोन तीन दा पम्मी कडून सरळ करून घेते .लग्नानंतर फिरायला गेल्यावर त्याने त्याच्या आवडीने तिला घेतलेली ती साडी तिने नेसलेली पाहून तो मिशीत हसत भुवया उंचावून तिला दाद देतो. फटफटीला टांग मारून तो गाडी वळवून उभा राहतो. चल निघते आई म्हणताना सरूचा हुंदका फुटतो . पम्मी , सरू आणि आईच्या डोळ्यातही पाणी तरळत पण दिल्या घरी लेक परत जातेच कुणाला चुकलंय हे ……….म्हणत शेजारच्या बाया समजूत काढतात ………… जावयांच्या आधाराने सरू गाडीवर बसते ………गाडी डोळ्याची पापणी लवेस्तोवर …………. पिंपळाच्या पाराला वळसा घालून अंधुक होते.……………… शेवटी दारातली अबोली फुलली कि तिला कुंपण घालून ठेवता येत नाही. तिच्या साजेश्या धाग्यात ती बांधावी लागते.
- संतोष टाकळे

No comments:
Post a Comment