किल्ला






लहानपणी अंजनवेलच्या किल्ल्यावर आणि लाइट हाउस म्हणजेच बत्तीवर दिवस दिवस आमची उनाडी असायची आजी सोबत मछी सुकवायला कातळावर जाताना आणि दोन हातने मच्ची उपसत वाळत घालताना जाम मज्जा यायची. या कामाच्या बदल्यात आजी एक रूपया हातावर ठेवायची आणि मग बादलितल्या पाण्यात रूपाया हातात घेवुनच नुसते हात बुचकळुन पुन्हा किल्ल्याच्या दिशेनं धूम ठोकायची ....... नित्या ,कुंदा ,समीर ,बोबड्या ,शोभा असा आमचा ग्रुप रोज नविन कारनामे करी त्यात कधी ओहळात पोहायला जा तर कधी पुळणीत शिवल्या टिपायला मोठी गोणी घेवून नित्याच्या माग धावत सुटा ......तसा मामा आमच्या पाळतीवर असायचा .बरेच दा मामाने चोपुन काढलय न सांगता समुद्रावर गेलो म्हणून पण मग स्व:ताच घेवून जायचा त्याच्या मित्रांच्या बोटिवरुन समुद्रात .........मग जवळपास पागवुन ( मछी पकड़न) मिळेल तो मासा घेवून समुद्राच्या मध्यातुन परत फ़िरायच .......धकधक आवाज करणारी ती डिजेलची होड़ी लाटांवर डचमळत धक्याला लागायच्या आत इकडे वाटण्या व्हायच्या तो बोटीवाला भंडारी मामा माझ्याकड बघत चार मासे जास्ती वाट्यात लावायचा म्हणायचा मामाकड़ आयलास ना खा मग पोटभरुंन म्हावरा ........ इतकी ताज़ी मछी कधी ताटात पडेल या कल्पनेने नुसती लाळ जमायाची तोंडात .

.......नुसत्या पाट्यावर खरगटलेल्या चार मिरच्या ,दोन लसनी आणि बोटभर ओल्या खोबऱ्याच्या तुकड्याच्या वाटनात केलेल्या कालवणासोबत टोपभर भाताचा फडश्या पडायचा. घासावर घास मारीत पुन्हा नुस्तं हातावर पाणी घेत पुन्हा बत्तिवर उन्नाडी सुरु . आजच्या किल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा मामाच्या गावात नेवुन सोडल तो समुद्राशी समांतर रस्ता ,मामाच माड़ीवजा घर ......नारळी फोफळीची बाग़ ....खाखी पैंट सफ़ेद शर्ट घालून जायची ती मराठी शाळा ........पेपर डोक्यावरून जाताना जयदीप कुलकर्णी किंवा शैलेश जोशी ने दाखवलेली किमान पासिंग पुरताची उत्त्तरं ......सुमार प्रगतीमुळे कायम गुरुजींच्या हिट लिस्ट वर असणारे आम्ही अगदी बऱ्याच अंगी हा चित्रपट बालपणाच्या तटबंदीत अलगत उतरवणारा ठरला .आणि म्हणून तो जास्ती अपील झाला.


किल्ला एकाअर्थाने तुमच्या आमच्या जगण्यात होऊन गेलेल्या घटनांच्या चिरेबंदी आठवणींचे बुरुज आहेत. जिथे कुठल्या कोपऱ्यात काय दडलय हे अनेकदा आपल्यालाही माहित नसत.

नोट -1. ओहरऑल गुड़ मुव्ही एकदातरी पाहवा असाच
       2.जबरदस्त फ्रेमींग इंटरनॅशनल दर्ज्याच संगीत उत्कृष्ट सवांद आणि त्याच परफेक्ट            टाईमिंग


© संतोष टाकळे .



फॅमिलीयर बायको............!

लग्ना नंतर सर्वात जास्ती धास्ती असते ती तुमचा जोड़ीदार नक्की कसा अट्जेस्ट होतो त्याची ..... तुमच्या लाइफ मधल्या इमोशनल, सेक्सशुअल आणि फॅमिलियर या तीन सेगमेंट मधे तो फिट बसला म्हणजे मग थोड़ हायस वाटत .कारण लग्न अरेंज असो वा love कम अरेंज येणाऱ्या नव्या माणसाने आपल आयुष्य सावरल पाहिजे .म्यारीड लाइफ मधल्या या नवेपणात ही अधिक जास्ती काळजी असते आणि ती साहजिक आहे .
तर विषय असा की सुप्रिया सोबत लग्न करून परवा दोन महीने होतील.इथल्या रोजच्या मानमोडि कामामुळे तिला मी जास्ती वेळ देवु शकलो नाही रादर देत नाही. दिवसातून फक्त एकदा बोलण होत तेहि अगदी जुजबी .....त्यातही तिच्या आणि माझ्या कामाच्या वेळा इतक्या ऑड आहेत की तिथेही टाइम मॅच होण मुश्किल पण तिची तशी कधीच तक्रार नसते . रोजच्या लेक्चरच्या नोट्स काढन आणि मग कॉलेजच्या तासांन मधे स्व:ताला गुंतवून घेण हा दिनक्रम सध्या नेहमीचाच शिवाय घरी आल्यावर चुली समोर रांधण वेगळच .......पाच बहिनी ,एक भाऊ आणि इतर ७-८ माणसांच्या ग़ोतावळयाला सांभाळण तस कठिन काम आहे .याउलट हल्लीच्या पोरी लग्न ठरतानां विचारतात घरी माणस किती सासरे- सासुबाई वर्किंग आहेत की घरबसे बर त्यांना काय आजार म्हणजे डायबेटीज वैगरे ......घरकामाला बाई आहे का ... तुमचा वेगळा फ्लॅट तुम्ही घेतलाय का ?.etc etc कारण सध्याच्या मुलींना नवरा- मी आणि माझं सेप्रेट घर अशी concept  हवी असते .सध्याची लाइफ स्टाइलच तशी झालिए म्हणा …………………सगळ्यावर एका मालकीचा अधिकार हवाय जे आहे ते आपल्या नवऱ्याचच असलं पाहिजे हा हव्यास वाढला आहे . अगदी नवऱ्याचा लहान शिकणारा भाऊ देखील सलतो हल्लीच्या पोरीना ………………सासू सासरे त्यांची काळजी घेणं वैगरे तर आजकाल अगदी नाईलाज म्हणून केलं जात असल्याचं चित्र सध्या समाजात दिसतं आहे . 


 पण काही मूली अजूनही अशा आहेत ज्यांना जाऊ-दिर -नणंद सासु- सासरे-अगदीच असली तर आजी सासुही घरात हवी असते .नवऱ्या सोबताच्या ह्या फूल पॅकेज फॅमीलीला स्विकारणाऱ्या ह्या मुलींच कौतुक असायलाच हव कारण अनेकदा बायको आली की तुमची हक्काची माणस हळूहळू लांब होत जातात.याच मुख़्य कारण म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या या माणसांमधे तुमच्या जोड़ीदाराला इंटरेस्ट नसतो . हल्ली टीवी वर असलेल्या अनेक मालिकेत एकत्र कुटुंब दाखवतात पण ती सीरियल बघणाऱ्या घरात मात्र नात्या नात्यां मधे अंधुक भिंती असतात .मग असल्या मालिका कितीही TRP उंचावणाऱ्या असल्या तरी आपल्या लेखी त्यांचा रिच अनसक्सेस फूल कारण त्यांन आपल्या जगण्यात काही फरक पडत नाही.

नोट :वरील पोस्ट दापोलीतून आलेल्या नव्या सुनेच्या कौतुकाच्या फोन कॉल्स ने भरावलेल्या समाधानावर आधारित. 



© संतोष टाकळे 



धुवाधार पावसात...............!










कोकणात असल्या धुवाधार पावसात तेंव्हा काय धम्माल यायची राव ………….चुलीवरच्या निखाऱ्यावर भाजलेल्या आठला ( फणसाच्या बिया ) …………… शिवाय अळूची उसरी , आंब्या फणसाचे साठे , पाकातली करवंद ,गोड कोकम अशा ठेवणीतल्या खाऊच्या बरण्या उघडून आवडेल ते मुठभर बचकी मारून पागोळ्या शिंतडणाऱ्या पडवीतल्या खिडकीत सरींच्या आडव्या उभ्या खेळाची गम्मत बघत बसावं …………मधेच ढग कडकले कि दचकत माजघरात पळत सुटावं …………तुडुंब वाहणाऱ्यापाटात पावसाळी चपला घालून पाणी अडवणी खेळत पऱ्या पर्यंत उंडगतांना बाबा शेतावरून नांगर सोडून येतांना दिसले कि लागलीच धूम ठोकत एका दमात घर गाठावं ………दप्तर उघडून अभ्यासाला बसावं …………मराठीतल्या पुस्तकातली सुर्वेची कविता काढून त्या चित्रात विरून जावं …………


रात्र किर्रर्र वातावरणात काळी कुट्ट होत असतांनाच ………….सुकटीच्या वतळीत ( सुक्या माश्यांच कालवण ) तांदळाच्या भाकरीचा तुकडा ओला करीत पोटभर दाबून हाणावं …………पाऊस तुफानी चालूच असतो .त्याला दमधर बाबा …………म्हणत आई विनवत असते …………पण तो गळक्या कवलाखाली लावलेल्या टोपात टप टप म्हणीत घरात शिरतो . हवेतला कमालीचा गारवा अंगाला सलतो ……………. काय मुसळा उपटलाय मेल्याला लावलेला शेत लोटून न्हेल कि काय अशी अनेक दुषण देत अंथरून घातलं जातं ……………सुती साडीच्या वळकटी गोधड्यात हळूहळू उबेचा संचार होतो . विजा तुटत असतात माळरानात अन डोळा लागतो . जाग येते तेंव्हा गाडी चर्चगेट स्टेशनात लागत असते . शेजारी कुणीतरी पुटपुटत ओह्ह इट्स टु मच रेनिंग इव्हन आय फर्गोट माय अम्ब्रेला.

© Santo

वागळे नावाचं वादळ …………….!




गिरणगाव रोजगार हक्क समितीचं कार्यालय एक दाढी वाला माणूस दत्ता ( गिरणी कामगार नेते - दत्ता इस्वलकर ) सरांशी बोलत बसलेला ……………त्याचा आवाज एव्हडा कि आम्ही जिन्यात असतानाही तो स्पष्ट ऐकू येत होता .आम्ही तेंव्हा गिरणगावात सर्वे करून पुन्हा ऑफिसात परतत होतो . योगिता ,ज्योती , रोशनी , पराग , आणि मी अशी आमची टीम तेंव्हा गिरणगाव रोजगार हक्क समितीच्या कामात पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करत असू ………………दत्ता हे बरोबर नाही अरे अशाने हा लढा इथेच संपेल वैगरे वैगरे तावातावात तो माणूस हातवारे करीत इस्वलकर सरांशी बोलतांना बघून आम्ही कार्यालयाच्या दारापाशीच थांबलो . तब्बल १ तास हा माणूस सखोल विश्लेषण करीत बोलत होता . आम्ही सर्वेत नोंद केलेले अनेक मुद्धे त्यांच्या  बोलण्यात येत होते . ज्या survey analysis ला आम्हाला किमान ५ ते ६ दिवस लागले असते ते या माणसाने एका तासात फिल्टर करून विस्तृत मांडले आणि लक्षात आल हि असामी साध काम दिसत नाहीये ………….एव्हाना आम्ही खूप वेळ बाहेर उभ असल्याचं दत्ता सर आणि त्या असामी पाहुण्यांच्या लक्षात आल असावं आणि आतून आवाज आला अरे आत या रे पोरांनो बाहेर कशाला थांबलाय ……………आणि मग एक एक करून सगळ्यांशी ओळख झाली . तेंव्हा कळल हि असामी म्हणजे पत्रकार निखिल वागळे ……………अगदी down to earth व्यक्तिमत्व प्रचंड अभ्यासू ………….सडेतोड वैगरे  वैगरे …………तेव्हा ते महानगर चे संपादक होते ……………पुढे ते अनेक कार्यक्रमात भेटत राहिले आणि तेंव्हा ते  आवर्जून ओळख देत……………हि आपल्या दत्ताची पोरं गिरणी कामगारांच्या लढ्यात हि  सगळी तळमळीन काम करतायत अशी तारीफ करीत ते अनेक नव्या लोकांशी आमची गाठ घालून देत आणि मग आमचाही उत्साह दोन हात अधिक वाढे. 

पुढे त्यांचा "आमने - सामने" हा TV शो आला. आणि निखिल वागळे महानगरच्या डेली पेजच्या ज्वलंत संपादकाच्या फ्रेम मधून बाहेर पडत थेट स्मॉल स्क्रीन वरचे तुफान anchor म्हणून प्रसिद्ध झाले . त्यांच्या या शो मध्ये यायला राजकीय नेते अनेकदा तयार नसत . कारण वागळे आयत्या वेळी काय विचारतील याचा नेम नव्हता . कितीदा बहुचर्चित नेत्यांनी वागळेना हा प्रश्न विचारू नका म्हणून गळ घातल्याचं आम्ही स्वतः पाहिलंय ……………इतका गाढा अभ्यास …………अचूक चकवा चकवी …………अलगत जाळ्यात अडकवण यात वागळेंचा हातखंडा होता आणि आजही तो टिकून आहे. काही दिवसांनी हा शो बंद पडला आणि वागळे पुन्हा महानगरकडे वळले पण इथेही पुन्हा नवा twist आला आणि वागळेना "IBN -लोकमत " च्या संपादक पदाची ऑफर आली . अर्थात ती त्यांनी लगेच स्वीकारली नाही त्यातही अनेक घडामोडी घडल्या आणि शेवट अखेर त्यांनी   "IBN -लोकमत " च संपादक पद स्वीकारलं …………… पुन्हा वागळे स्क्रीनवर आले आणि त्यांनी पुन्हा नव्याने धडाका सुरु केला . "आजचा सवाल "ने  तर प्राईम टाइम चा आजवरचा रेकॉर्ड मोडला . महाराष्ट्रातल्या घराघरात वागळेना लोकांनी डोक्यावर घेतलं ……………"आजचा सवाल" ची वेळ झाली कि लोक लोकमत लाव आता वागळे येतील म्हणत tv समोर ठाण मांडून बसत ……………भल्या भल्यांना हा माणूस चितगार करी याचं काय अप्रूप असे लोकांना एक सच्चा पत्रकार म्हणून देखील "निखिल वागळे" हे नाव लोकांच्या मनात घट्ट झालं . मी पत्रकारिता केलीय अस कुणाला कळल तर  लोक विचारीत त्या वागळेना कधी भेटलाय का तू …………नसशील भेटलास तर भेट ……………शिक काही तरी त्यांच्याकडून  ………………असा सल्ला ऐकताना खूपच भारी वाटायचं तेव्हा …………………

अन नेहमीप्रमाणे IBN - लोकमतच यशहि फार काळ टिकलं नाही . अखेर वागळे बाहेर झाले आणि "IBN -लोकमत " चा TRP घसरला वागळे पुन्हा या वाहिनीवर येणार नाहीत यावर अनेकांचा विश्वास बसेना . इतकं जबरदस्त गारुड या माणसाने प्रेक्षकांच्या नजरेवर घातलं होतं हे अधोरेखित करण्यासारखं आहे . पण प्रसिद्धीची चमक कायम राहण्यासाठी visibility च ताईद सतत गळ्यात असावं लागतं. आणि IBN -लोकमत सुटल्यापासून काहीदिवस वागळे पडद्याआड गेले . इथ आजच्या ब्रेकिंग उद्या विसरणारे लोक कुणा कुणाला लक्षात ठेवणार . अर्थात वागळेंच तेच झालं .काही दिवसांनी ते "मी मराठी" या नव्या वृत्तवाहिनीवर दिसल्याचं कुणा कुणा कडून कळल तेंव्हा लोकांनी पुन्हा या नव्या channel चा शोध घेत वागळेना पुन्हा एकदा  TRP बहाल केला . जो आजही काही प्रमाणत वर खाली होतो आहे . 

आज वागळेंन बद्दल लिहण्याच निमित्त म्हणजे सध्या ते सोशल मिडीयावर जे तथाकथित प्रक्षोभक लिहितायत त्यांमुळे ते अधिक negative शेड मध्ये गुंतत जाता आहेत . आणि त्यांच्या या नव्या इनिंगमुळे  त्यांची खरी इमेज अधिक पुसट होते आहे . मान्य आहे वागळे जरा अधिक भडक शब्दात आणि संकुचित मानसिकतेत व्यक्त होतायत म्हणून त्यांच्यातल्या आजवरच्या अनुभवी आणिक अभ्यासू पत्रकाराच्या प्रतिभेला इतक्या खालच्या भाषेत टीका टिपणी  करण्याची सध्याच्या नवोदित नवविचारवंताची आणि स्वयं घोषित समाजसुधारकांची लायकी नाही . हे वायफळ बडबड करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि आधी अभ्यासाला सुरवात करावी मुळात विषय समजून घ्यावा त्यावर सखोल माहिती गोळा करावी मग त्याचं विश्लेषण करावं थोडा अनुभव गाठीशी जमवावा आणि मग तोंड उघडावं . 

कारण पत्रकारिता हि काही मानद पदवी नाही त्यासाठी प्रचंड मोठी मेहनत आहे . स्वतःची ओळख निर्माण करणं तुम्हाला वाटत तेव्हड सोप्पं काम नाही . शब्दांची किमया प्रत्येकालाच जमते अस नाही . आम्हा पत्रकारांना  पत्रकारितेची डिग्री घेतांना जी प्रतीज्ञा  दिली जाते ( दिली जात असे ) त्यात म्हटलंय -  . 

"समाजातल्या हरएक अन्याया विरोधात मी माझ्या लेखणीतून प्रखर विरोध करीन" .
 "लोकांना न्याय देण्यासाठी मी कायम प्रामाणिक पत्रकारिता करीन " 
 " मी माझ्या पेशाचा कधीही गैरवापर करणार नाही ."
 "या पदवीचा सन्मान ठेवण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे ."

 वागळे सरांना हि प्रतीज्ञा ज्ञात असेल यात शंकाच नाही . पण' निखिल वागळे' नावाचं वादळ  काहीसं भरकटतय हे मात्र खरय …………………



© संतोष टाकळे 


श्यामची आई ".....................!




आठवीत होतो तेंव्हा "श्यामची आई " वाचलं होतं . शाळेतल्या ग्रंथालयातलं कोडींग असलेलं आणि काहीसं जीर्ण पुस्तक दमा दमान वाचून काढलं तेंव्हा त्या फक्त गोष्टी होत्या . त्यातला अपेक्षित सारांश खरतर आत्ता कळतोय . काळीज पिळवटून टाकणारी श्यामच्या जीवाची तडफड. ,आई आणि श्यामच भावविश्व …………हळवा श्याम ,जगण्यातला प्रेरणादायी संघर्ष अस आणिक बरंच काही ………………अख्खं पुस्तकं जगण्याच्या अंकुराला फुलवणार टॉनिकच …………यातले मनाला भिडणारे प्रसंग……… 

विशेषतः घराच्या जप्तीच आणि श्यामच्या आईच्या अखेरच्या श्वासाच साने गुरुजींनी मांडलेल वर्णन वाचलं कि आपसूक डोळ्याच्या कडा पाणावतात .
मागे एका आदिवासी पाड्यावरच्या कार्यक्रमात या पुस्तकाची आठवण निघाली आणि समीर हरड या आपल्या तद रसिक चाणाक्ष्य मित्राने लागलीच पुस्तक विकत आणून हातात ठेवलं. मुळात या असल्या जिवलग मित्रांची आणि जोडलेल्या तुमच्या सारख्या माणसांची कधिच कमतरता नव्हतीच आणि नसेलही . कारण ज्या श्यामच्या ह्रिदयात माणुसकीचा अथांग सागर होता त्या श्यामच्या दापोलीत जन्म घेण्याचं भाग्य मला लाभलंय.

© संतोष टाकळे 




हळदी कुंकवाच फ्याड...........!





का जोरदार टी . आर . पी असणाऱ्या सिरियल मधला सीन……………… सहनायिका नायिकेला म्हणते येकलस का ………… मी बाजारात जातीये संक्रांतिला हळदी कुंकवात काय वाण लुटावं याचा अंदाज घेऊन येते मग आपण सगळ्या ठरवूयात काय आणायचंय ते ……………इकडे TV बाहेर अय्या आपलं पण अजून काही ठरलं नाहीये बरी आठवण झाली. आज दुपारी डन करून टाकते - इति ताईमां ……………….गेल्या वर्षी कृषी ग्रामीण मधून आणलेले ऑरग्यानिक कडधान्याचे पाउच वाटतानाप्रत्येकीला सांगून झालं ……नैर्सगिक खाण्याचं महत्व काय ……………गावाकडे आमची किती शेतीवाडी …………अजूनही शेणखताचा होणारा वापर …………दुभत्या गाई …………etc etc ……………यंदा काय तर पनवेल नजीकच्या एका गावातल्या बचत गटाने केलेले काही प्रोडक्स लुटायचं आय मीन वाटायचं ठरतंय …………….आता हे सगळं तिथून आणण्याची जबाबदारी ओघाने आमच्या खांद्यावर येणार ……………विशेष म्हणजे पूर्वी ताईमां अगदी टिपिकल हळदी कुंकू करे पण गेल्या काही वर्षापासून ती काहीतरी युनिक करायचा प्रयत्न करते …………अगदी थोडक्यात पण तरीही पारंपारिक ………………कधी तरी विषय निघाला आणि तिला म्हटलं काय हे कसले हळदी कुंकू उग्गाच पैशाचा खेळ त्यावर तिचं विस्तृत स्पष्टीकरण ऐकूण आक्षेप घेणारा अखेर स्वतः म्हणेल मी काय मदत करू का तुम्हाला ………………पण आधी तुमच्या या संवेदनशील भावनांना आवर घाला बघू ......................
                 तसही हे

हळदी कुंकवाचे फ्याड फार पूर्वीच गावाशिवात पसरलंय …………गावातली महिला मंडळे संक्रात ते २६ जानेवारी च्या दरम्यान आजही हा सोपस्कार पार पाडतात ………….आम्ही लहान असतांनाहि आईचे चार-पाच हळदी कुंकू असत त्यात वाडीच महिला मंडळ ………वार्षिक महिला बचत फंड …………………. मराठा समाज महिला हितवर्धिनी ………….आणि घरातला हळदी कुंकू वेगळाच ……तेव्हा सेम कलरच्या साड्या …….………प्लास्टिकच्या वस्तू ………….घरगुती वापराचा जिन्नस वैगरे लुटला जाई ………………… आईची जरी काठाची साडी …………तिच्या केसातली अस्टरची रंगीबेरंगी फ़ुल ……………तिनं आमच्यासाठी रुमालात बांधून आणलेले तिळाचे लाडू …………हळदी कुंकवाने भरलेलं तिचं कपाळ …………मोत्याची थोरली नथ ……………जसच्या तस आठवतंय ………………. विशेष म्हणजे याच दरम्यान फंड फुटे …………वर्षभर पदरमोड करीत हफ्ते भरणाऱ्या तिच्या झिजणाऱ्या हातात दुमडून आणलेल्या घडीतल्या नोटा मोजतांना क्षणाक्षणात तिचा आनंद वाढे …………किती झाले बाबू मुद्दल इतकी असल आणि व्याज इतकं अशा तिच्या अचूक तोंडी हिशेबाने पैशाची खरी किंमत तेव्हाच शिकवलोय आम्ही सगळी भावंड त्यामुळे आजच्या व्यवहारात तितकंसं आम्हाला कधी काही कमी पडत नाही ………………

© संतोष टाकळे .

गुढी ............!







इथ शहरात आम्ही लिविंग रूमच्या टीपॉयवर मिनी गुढी उभारतो ………… सकाळी ठेवणीतल्या भरजरी साड्या- सदरे घालून शोभा यात्राहि एन्जॉय करून येतो . whats up - फेसबुकवर……… शुभेछ्या …सेल्फी - traditional लूकच्या picture चे नोटीफ़िकेशन चालू असतात …………… दुपारी जेवणात चांदोरकर स्वीटच्या मऊशार पुरणपोळ्या किंवा श्रीखंडाचा बेत ठरलेला…………………अगदीच नाहीतर विथ family मराठ मोळ्या हॉटेलात लंचला जाण्याचं आयत्या वेळी प्लनिंगहि करतो आम्ही . पुन्हा संध्याकाळी डिनर झालं कि संपतो शहरातला पाडवा …………….
आणि गावात
पहाटे उठून आईने अंगणात टाकलेली सडा -रांगोळी …………….देव्हारातले चांदीचे देव लक्ख घासून बाबां सोबत केलेली साग्रसंगीत पूजा ……… अगरबत्ती आणि चाफ्याच्या मंद गंधाने दरवळणारं देवघर …….… तुपाचा दिवा ………दारावरच झेंडूच तोरण ………एकंदरीत प्रसन्न वातावरणात गुढीची केलेली तयारी त्यातही खास गुढीसाठी काढलेली आईची नवी कोरी काठपदरी साडी ……… ………. माचाच्या काठीला अभिषेक करीत त्यावर तांब्याच्या लोट्याखाली साडी- साखरमाळ -चाफेतोरण बांधून दिमाखात उभी राहणारी उंच गुढी …… लागलीच कडुलिंबीपान आणि खोबऱ्याचा एका दमात चाऊन खायचा प्रसाद ………………दुपारी आईने रांधलेला पंचपक्वान्नाचा पुरणपोळी बेत …………नारळाच्या दुधासोबत फस्त केलेल्या गावठी तूप लावलेल्या पोळ्या ……………….वर ग्लासभर ताक …………मग दुपारी ताणून देत पुन्हा संध्याकाळी गुढी उतरवायची ती लगबग ………………
काळ फक्त आठवणीत रीकॅप होतो हि आपली समजूत……. पण खरतर आजही तोच आनंद मिळवता येणं शक्य आहे
अर्थात हे तुमच्या फिलिंग वर डिपेंड
टीप :- कुणाशीही कुणाची तुलना नाही काळ बदलतोय पण आठवणी मात्र त्याच असतात ……सुचलं ते उतरवलं 


बाकी तुम्हां सगळ्यांना
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछ्या ……………!



© Sannto