महाराजांचा प्रभाव ...................!



काल एका महाराजांच्या दर्शनार्थ भगव्या साड्या परिधान केलेल्या मध्यम वयीन महिलांचा मोठ्ठा जत्था पाहिला रात्रीचे १० सव्वा १० वाजले असतील.  सकाळी ऑफिसला जाताना देखील हि रांग गच्च भरलेली होती. तरुण मुल -मुली- लहान पोरं - बापे बाया असा हरएक वयातला भाविक बाबांच्या चरणस्पर्शच्या आशीर्वादासाठी ताटकळत असतांना दिसला यातले काही महाराजांच्या नावाने जयघोष करीत होते . तरुण कार्यकर्ते (मुली - भगव्या सलवार कमीज ...) मुलं - भडक भगवा शर्ट /कुर्ता / टी शर्ट ) त्यावर महाराजांचा फोटो असलेला ब्याच कपाळी केशरी टिळा गळ्यात लखलखती पांढऱ्या मण्यांची माळ असा सात्विक पेहराव करून भाविकांना कंट्रोल करण्याचं काम करतांना दिसलीत. या प्रत्येकाच्या हातात विभागवार भक्तांच्या याद्या होत्या. आता विक्रोळी मंडळ जाईल , त्यापाठोपाठ मालाड मंडळ मग वडाळा ,आणि मग कळवा मंडळ ……………… नंबर जवळ आलेल्या मंडळांची चुळबुळ वाढे यात नवीन आलेल्या साधकाला जुना साधक दर्शनाचे नियम पुन्हा पुन्हा समजावून सांगे तिथ गेल्यावर अस कर ………तस कर………… हे करू नको ………. इत्यादी इत्यादी ………………
आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात माणूस अशा बाबांच्या प्रभावात नक्की काय शोधतोय ? …………… जिवंत बाबाच्या पादुका आणून त्या पूजेला लावणं ………………त्या कुण्या तरुण स्वयंघोषित मां ला उचलून घेण्यासाठी बोली लागणं ………….शिन्दुराच्या डब्या …………पुस्तकं ………….फोटो ………. लॉकेट ………दोरे ………….मानाच्या पूजा …………या उलाढालीतून मग महारांजाना चांदींच सिंहासन ……………विमान प्रवास ………….प्रसंगी private jet ची सोय ………….एकराच्या जागेत पसरलेले मठ ………………मर्जीतल्या भक्तांची चंगळ हे सगळं उघड असतांनाही बाबा बुवाच्या मागे पाळणाऱ्या अशा लोकांना पाहिलं कि वाटतं आजही आपल्या आयुष्यात जगण्याच्या विश्वासाची असुरक्षितता ठासून भरलीय…………प्रत्येकाला सुखाचं जगणं हवंय ………आपण परिस्थिती स्वीकारण्या पेक्षा तिच्या पासून लांब पाळण्याचे अनेक मार्ग शोधतो आहोत . 'मग मुलीचं लग्न ठरत नाही '………….'पोराला नोकरी नाही ' …………नवऱ्याची दारू …………जागा जमिनीचे वाद ………असाध्य आजार …………मानसिक तणाव …………या सगळ्यावर हे स्वयंभू बाबा लोक अध्यात्मिक उपायांची मलम पट्टी करीत मानसिक गुंता घालीत कधी अडकवतात हे कळतही नाही आणि तोवर आपण त्या गोतावळ्यात आपसूक मिसळतो . अनोळखी चेहरे ओळखीचे होतात . एव्हाना डोक्यात महाराजांची हवा काटोकाट भरलेली असते . एक वेगळाच हुरूप येतो . मरगळ निघून जाते . नामस्मरणाच्या एकाग्रतेने चेहऱ्यावर वेगळच तेज येत . आणि आत्मविश्वास अधिक प्रबळ होतो. पूर्वी अनेक प्रयत्नात ज्याला नोकरी मिळाली नाही त्याला आता एकाच मुलाखतीत जॉब मिळतो . जिच्या लग्नाची आशा जवळ जवळ सगळ्यांनी सोडलेली असते तिच्या यावेळच्या प्रयत्नात थेट साखरपुडाच ठरण्याचा चमत्कार होतो. बस्स महाराजांवरच्या श्रद्धेत आणिक वाढ होते. शेजारी -पाजारी - नातेवाईक गावा- शिवात त्यांची महती पसरते …………अडचणीत असलेले असे आणि काही जण या दिशेने आकर्षित होतात . साधना वाढत जाते . दरम्यान महाराज मठाधिपती होतात . पूर्वी डोक्यावर हात ठेवत पर्सनल आशीर्वाद देणाऱ्या महाराजांचं आता फक्त मुखदर्शन दिलं जातं . प्रस्थ - महाप्रस्थ होत ………………… उच्छाद वाढतो. अहंकार -गर्वाच्या लाटा उसळत असतात .एकेकाळच्या सच्या भक्तांमध्ये मतभेत होतात आणि एक ना एक दिवस याही महाराजांचा प्रभाव मावळतो ………….आणि मग पुन्हा नवे महाराज ……………….नवे साधक ………………. नवी भरभराट.
* भावना दुखावण्याचा मानस नाही
© Santo

महाराष्ट्र साहित्य परिषद........!

 
महाराष्ट्र साहित्य परिषदेच निमंत्रण ……………दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर.......!

संमेलनाची दोन दिवसीय कार्यक्रम पञिका....

दि. २९ नोव्हेबर २०१४, वार- शनिवार....

सकाळी ९:०० ते ११:०० ग्रंथदिंडी.
सकाळी ११:००ते १:०० उद्घाटन.
उद्घाटक- मा.डाँ. नागनाथजी कोत्तापल्ले
संमेलनाध्यक्ष- मा.प्रा.अशोकजी बागवे.

दुपारी १:००ते ३:०० मध्यंतर व भोजन.
३:०० ते४:०० पुस्तकांचा प्रकाशन सोहळा.
सांय.४:००ते५:०० 'सागरगाज' कविसंमेलन.
सहभाग- संतोष टाकळे, ममता विचारे, अशोक पाटील व इतर.

सांय.५:००ते ६:०० 'आईच्या कविता'
सादरकर्ते- कवी प्रा. प्रशांत मोरे (मुंबई)
राञी.७:०० नंतर 'कोकणची लोकपरंपरा'
हा सांस्कृतिक कार्यक्रम.

दि. ३० नोव्हेंबर २०१४ वार- रविवार.

९:००ते१०:३० पाट्यपुस्तकातील कवी,लेखक
विद्यार्थ्यांच्या भेटीला.
१०:३० ते ११:३०, 'परिसंवाद'- गुहागरचा
सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा'
मा. महेश तेंडूलकर, (पुणे)
मा. भालचंद्र दिवाडकर,(संपादक, दै. सागर)
मा. प्रकाश देशपांडे (चिपळून)
मा.प्रा. रश्मी आडेकर (गुहागर)

११:३०ते१२:३० मा.श्री. इंद्रजित भालेराव यांची प्रकट मुलाखत, मुलाखतकार- श्री.अरुण इंगवले.

१२:३० ते २:०० मध्यंतर व भोजन.
०२:०० ते ३:३० कथाकथन.
मा. श्रीराम दुर्गे, सञाध्यक्ष (चिपळून)
मा. डाँ. भास्कर बडे (लातूर)
मा. रुपाली अवचरे (पुणे)

३:३०ते ५:०० निमंञितांचे कविसंमेलन.
सांय. ५:०० नंतर समारोप...

गुहागरसारख्या निसर्गरम्य नगरीत होणाऱ्या साहित्य मेळ्यासाठी आपले स्वागत करण्यास इथले माड-पोफळी, सागर-सूरू उत्सूक आहेत...
स्थळ- भंडारी भवन परिसर, गुहागर.

श्री. राजेंद्र आरेकर- अध्यक्ष,
श्री. ईश्वरचंद्र हलगरे- कार्यवाह,
सर्व सन्माननीय सदस्य,
म.सा.प.शाखा- गुहागर, जि. रत्नागिरी.

बदलती दिवाळी ............!



रवा केतकरांच्या घरातून बेसन लाडवांचा" खमंग "प्यासेज मध्ये पसरला आणि दिवाळी आलीच इतक्यात याची आठवण आम्हा सुस्त शेजाऱ्यांना झाली. म्याडम बघा याला म्हणतात अस्सल फराळ………….नुसत्या वासाने मन तृप्त झालंय. ………………ग्राहक पेठेतला आयता माल खाणाऱ्या आपल्याला काय कळणार हे साजूकपण ……………दाराच सेन्ट्रल लॉक उघडत …………स्मिता - तू मदत करतोस का ? तर करूया यंदा फराळ माज्या एकटीने ते शक्य ...नाही . आणि साजूक नाजूक फराळ करणाऱया त्या केतकर वहिनी गृहिणी आहेत . आमच्या सारखं घर ऑफिस अशी कुतरओढ नाही त्यांना…………… शिवाय मिस्टर केतकर सरकारी बँकेत चांगल्या पोस्टवर आहेत. त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा आहे . सो त्यांची फराळाची लगबग असणारच ना ……………… आपल्याकडे कोण तू -मी आणि मीना मावशी …………आणि तसही मीना मावशी दिवाळीत सुट्टी घेतात गेल्या वर्षी त्यांना राखून ठेवलेला फराळ अखेर खराब झाला . मग चामुंडा वाल्याकडून मिठाई आणून दिली त्यांना ……………म्हणून नाही करत राजा फराळ ……………मला पण वाटतंच कि आपल्या घरातल्या किचन मधून चकली - शंकरपाळी - चिवडा - करंज्यांचा खमंग परसरावा अख्ख घर फराळाच्या तयारीत घमघमुन जावं………पण त्यासाठी घरात माणस असावी लागतात . सगळ्यांनी मिळून या लगबगीत उतरण्यात जी मज्जा आहे ती एकट्या दुकट्याने तडफडत सगळा घाट उरकण्यात नसते ना ……………तरीही अगदीच यंदाचा सण रिता नाही घालवणार कडक पोह्याचा चिवडा करते …………आणि थोड्याश्या बेडेकर भाजणीच्या चकल्या ……………बाकी लाडू बीडू …………सालाबाद प्रमाणे ग्राहक पेठेतुनच …………स्मिताच्या अशा नेहमीच्या समजूतदारपणामुळे बहुदा आमच्यात मतभेत झाले तरी ते फार काळ टिकत नाही.

साहेब यादी करायला घ्यायची का ? अग आत्ताचं किचन आवरून झालाय यादी काय करू कि उद्या …………उद्या परवा तेरवा अस ढकलीत दिवाळी उद्यावर येईल आणि आपली दिवाळी बाजारातच रहायची ते काही नाही आता घ्या लिहायला मी सांगते ……………एकूण दोन याद्या करा एक तुमची एक माझी …………दोन याद्या कशाला तू ऑफिस मधून निघालीस कि आपण दादरला भेटू आणि करू कि शॉपिंग ……………तुमच राहूद्या मला सांगाल १० मिनिटात पोहचतो आणि १ तासाने उगवाल शिवाय हे नको जरा महाग वाटतंय ………. पणत्या कशाला गेल्यावर्षीच्याच पुसून वापरता येतील …………………अनारसे इतके महाग असतांना १ किलो का घेतलेस असा वाद घालत दोन चार तास घालवत बसण्या पेक्षा तुम्ही फक्त पूजेचं समान आणा बाकी मी बघते काय आणायचं ते वाघमारे म्हणालीय तिला पण शॉपिंग करायचीय सो आम्हा बायकांमध्ये तुमची लुडबुड नको ……………वाण्याच्या यादीत मोती साबण आणि राम बंधू चिवडा मसाला लिहायला विसरू नका ………नाही तर अंघोळीला बसल्यावर आठवण यायची मोती साबण राहिला …………….आणि उटण पण लिहू ना …………….किचन मधून उत्तर आल. उटण नको हो हल्ली हरएक राजकीय पक्षवाले उटण्याची पाकिटं वाटतात. …………बरं तुला किती कॅश लागेल.कि कार्ड देऊ …………कार्डच द्या ते बरं पडतं पाकिटात नोटा घेऊन हल्ली कोण फिरतय ……………आणि हो तुम्हाला सागायचं राहीलच……यावेळी मीना मावशी सोबत तिच्या सुनेलापण एक साडी घेईन म्हणते तिचा दिवाळसण आहे . आणि मीना मावशी किती करते हो ह्या घरासाठी ………देण्या घेण्यात स्मिताला सगळीच नावाजतात तशी माणसं जोडलीत तिनं ……………………

दिवाळीच्या आदल्या दिवशीपर्यंत रोज संध्याकाळी घरी येतांना हातात दोन चार पिशव्या ठरलेल्या ज्या वस्तू घेवून झाल्यात त्यावर फुल्या करीत पुढच्या जिन्नसाची ठिकाणं ठरवीत दुसऱ्या दिवशीचा प्लान करीत करीत अखेर शॉपिंग संपते दिवाळीच्या पूर्व संध्येला लगबगीनं सगळ आवरीत त्यातल्या त्यात मांडा मांड करीत . पणत्या- रांगोळ्या दराच तोरणं खास फराळ द्यायला आणलेल्या प्लेट वाट्या …………सोप्याची कव्हरं ………बेडशिट …… उटण ……………दिवाळी पहाटच्या मुहूर्तावर करायच्या पूजेची तयारी अशा अनेक गोष्टींची तयारी करून पुन्हा सकाळी लवकर उठायला हवंच लहानपणा पासून अंधारल्या पहाटेच पहिली अंघोळ करायचा जुना रिवाज आजही टिकून आहे.

मुंबईतल्या बंद दाराच्या घरात विकतचा फराळ चाखताना मात्र राहून राहून गावी आईने केलेल्या चकल्या , करंज्या , लाडू ,आणी चिवड्याने भरलेले लक्ख घासलेले पितळी डबे डोळ्यासमोर उभे राहतात. याच दरम्यान कोकणात शेतीची कापणीच्या कामांची लगबग असे दिवसा शेतात राबूनही ती एक हाती रात्री उशिरा जागून त्या दिवशी ठरलेला पदार्थ पूर्ण करी सणासुदीच्या दिवसात माझ्या पोरांना लोकांच्या तोंडाकडे बघत बसावं लागू नये हा तिचा त्यामागचा उद्देश ……………………… दिवाळीतला आणखी एक महत्वाचा दिवस तो म्हणजे भाऊबीज मला एकूण ५ बहिणी त्याकाळात गृहपयोगी वस्तू घेण्याची पद्धत होती. नेमक काय घ्यायचं हे आई ठरवी. ………. यांस कडून ………यांस भाऊबीज सप्रेम भेट. अशी नावं घातलेली पाण्याची टाकी, मांडणी, परात , ग्लास, ताटं, डिश , वाट्या अशी भांडी ,यातली कोणतीही वस्तू आजही कधी नजरेत आली तर तेंव्हाचे ते क्षण सस्निल आठवतात. ………… काळानुसार त्या त्यांच्या सासरी गेल्या आणि आम्हा भावंडांनी भरलेलं घर काहीसं सुनं झालं. शेवटी वेळ आणि माणसाचं आयुष्य कायम बदलत असत. .पण आठवणी कधीच न बदलणाऱ्या असतात.

रांगोळीत जितके जास्ती ठिपके तितकी ती कठीण आपलं जगणंहि अशाच असंख्य ठिपक्यांनी विभागालय ………………… गरज आहे. यांना जोडणाऱ्या नात्यांची आणि मैत्रीच्या अंधुक रेश्यांची ……………………बाकी रंग तर आपसूकच भरले जातील

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा ………… !

!! शुभ दिपावली !!

© संतोष टाकळे

गौरी - गणपतीचे सणाला …………!








कोकणात गौरी - गणपतीच्या सणाच्या तयारीची लगबग अगदी शेवटच्या टप्यात येऊन पोहचली आहे . घर - पोटमाळा झाडून झालाय…… ………मांडणीतली सगळी भांडी  लख्ख घासून काढलीयत…………. गणपतीचा पाट तर दोन महिन्या अगोदरच कारखान्यात पोचलाय .भिंतीना नवीन कलर चढलाय ………… बेड्या पासून थेट अंगणापर्यंत पावसात वाढलेलं गवत काढून वाट मोकळी करण्यात आलीय ………राहिलेल्या कामांपैकी ………………… मोदकासाठी घरगुती तांदूळ धुवून -वाळवून त्याचं दळण काढणं बाकी आहे . ……….  जिन्नस आणायचाय ………गवर आणणाऱ्या काकूला माघारपणासाठी शेरभर पीठ आणि बांगड्या भरायला पैसे द्यायचेत. गौरीची साडी ………….तिचा बसण्याचा  पाट यावर्षी बदलून घ्यायचाय ………मखर बांधणाऱ्या राजूला दोन दिवस अगोदर ये म्हणून  निरोप पाठवायचाय  ………. करमरकर गुरुजींन कडून  प्रतिष्ठापनेचा , गौरी आणण्याचा आणि ओवश्याचा मुहूर्त काढून आणायचाय……………अशी बरीच बारीक सारीक कामं बाकी आहेत सकाळीच आईने थेट दापोलीहून दिलेले हे लेटेस्ट update's ……………

नोकरी - व्यवसायासाठी गाव सोडून शहरात आलेल्या आम्हा कोकण्यांच गणपती जवळ आला कि मन आपसूकच गावाकडच्या रस्त्याने धावत सुटतं ……… आणि  त्यातही ज्याचं लहानपण कोकणात गेलंय त्याला तर या सणात आणिक बैचेन व्हायला होतं…………  कारण सध्या सगळ्या गोष्टी माणसं बोलावून कराव्या लागतात …………आणि आम्ही फक्त गणपती बसवायला पोहचतो ……………………  पण एकेकाळी याच सणात जो धुडगूस घातला होता तो सारा काळ पुन्हा डोळ्यासमोर उभा राहिला . त्याकाळात आम्ही शाळेतून आलो कि लागलीच या उत्सवाच्या कामात रुजू होत असू …………….आमच्या जुन्या मातीच्या घराच्या भिंती डिसटेंबर ने रंगवण्या आधी त्या मातीन लिपून घ्यावा लागत त्यासाठी खास शेतावरून मुरमाची माती घेऊन ये ……………तिचा गारा करीत ती भिजव ………….मग जिथे खड्डे पडलेत तिथे हलक्या हाताने हा चिखल चेपीत वर ओला हात फिरवत भिंती जशाश्या तश्या वाटतील इतकं शार्प काम करावं लागे …………जरा कुठे उंचवटा दिसला कि पाठीत रट्टा पडे साधी भिंत लिपता येत नाय ………….आयुष्यात पोटाची खळगी कशी भरणार……………… इति बाबा . ……………… मग एखाद्या रविवारी माळा झाडायचा मुहूर्त असे………… त्या दिवशी सकाळी अंघोळ नाही दात घासून चहा बटर खाल्ला आणि  डोक्यावर फडकं बांधून माळ्यावर चढलं कि डायरेक दुपारी जेवायला खाली उतरायचं …………कोपरान कोपरा नीट झाडून काढायचा एकही जळ्मट दिसता कामा नये …………माळ्यावरची वाजवी अडगळ यावेळी कमी केली जाई . त्या अडगळीत बरेच दा अनेक interesting गोष्टी मिळत एखादी जुनी वही ज्यात गणिताचा अभ्यास लिहिलेला असे  ………. कायिक दिवस सापडत नसलेला शर्ट …………जुनी खेळणी …………पण त्या हरएक गोष्टीत तमाम आठवणी नव्याने मोकळ्या होत .  आमच्या चार भावंडा पैकी प्रत्येकाला एक जबादारी दिलेली असे ………….दोघांनी पितांबरी लावून भांडी घासायची. …………एकाने भिंती सारवयाच्या तर उरलेल्या  एकाने दुपारच्या जेवणाची सोय करायची  ………….एक अख्खा  दिवस मोडला कि हे काम संध्याकाळपर्यंत पूर्ण होई . तत्काळ पुन्हा दुसऱ्या कामाची वाटणी ………… यात मी बाबांना कलर काढायला ………… मखर बांधायला मदत करायची. आईसोबत जाऊन फाटक दुकानातून जिन्नस आणायचा ( गणपतीत त्याकाळी आम्ही २-३ हजाराचा जिन्नस आणात असू हे विशेष ) ……………  अर्चू ताईने पताकांचा कागद कापून त्याच्या माळा करायच्या ……………आणि  सुबक डेकोरेशन करावं …………… अर्पणाने देवाच्या पुजेची सगळी तयारी करायची शिवाय सकाळचा पहिला प्रसादही तिनेच करावा …………कल्पना तशी लहान म्हणून तिला पूजेच्या दुर्वा -फुलं . गंध-  माळा - दुध -दही - गोमुत्र आणि अजून असलच काहीबाई किरकोळ काम अलॉट होई . अखेर उद्या गणपती येणार म्हणीत  लगबगीचा वेग कमालीचा वाढे जिकडे तिकडे एकच गडबड उद्यावर आला गणपती आणि आमचं अजून हे बाकी आहे आणि ते आणायचंय …………कधी उरकू हे सगळं देवच जाणे ………………दरम्यान एक दिवस अगोदर घर-माजघर शेणाने सारवून घेतलं जाई त्यावर अर्चू ताई चुन्याने बोटांची रांगोळी काढी ………………आणि अखेर गणेश चतुर्थीला सकाळी लवकर उठून गणपती आणायला जायची तयारी होत असे …………….रिक्ष्या वाला आला कि धावत रिक्ष्यात जाऊन बसायचं आणि मग डायरेक्ट कारखाना गाठायचा ……………कुंभारवाड्याच्या वेशीवर असलेल्या या कारखान्यासमोर तोबा गर्दी असे जो तो त्याचा बाप्पा न्यायला आलेला …………काही हवशी लोक खास खालू बाजा घेऊन गणपतीला माघारी आलेले असतात . इकडे गणपती डोक्यावर चढवला कि तिकडे विडी फुकत बसलेला सनई वाला विडी फेकत ……… सूर ओढी ट्याssss आणि आणि मग खालू बाजा जो दुमदुमायाचा तो घर येई पर्यंत अनेक गाण्यांवर बाप्पा डोलत मिरवत असे . ………………आम्ही गणपती घेऊन येईसतोवर …………….गणपतीची पावलं ………स्वागताची आरती ………पुजेची तयारी …………झालेली असे ………मे . काणे बुक डेपो पुणे यांच्या "गणेश प्रतिष्ठापना" आणि पूजा विधी या पुस्तकाच्या आधारावर  …………गणपती एकदाचा मखरात विराजमान होई …………बस ……………उरकली एकदाची पूजा म्हणीत उसासा टाकतोय इतक्यात …………. आमची  फौज माजघरातून चुलीकड वळवण्यात येई ………….या दिवशी म्हणे  पडवळ घालून केलेल्या बिरड्याच्या भाजीला विशेष महत्व आहे. म्हणून रात्री मोठ्या टोपात भिजत घातलेले पावटे सोलणे हे लंय कंटाळवाण  काम कसबसं उरकण्यात येई .( बरेचदा खूप वैताग आला तर बचकीभर पावटे सालांच्या कचऱ्यात टाकीत काम कमी करण्याची शक्कल आम्ही अंमलात आणायचो :p  )  …………त्या दिवशी गणपतीच्या नैवेद्याचा ताट भरे पर्यंत उसंत  नसे …………… चुलीवरच्या वाफेवरचे उकडीचे मोदक ……….गोडी डाळ ………भरलेली मिर्ची …………… पालाभाजी ………. भजी ………पापड ……लोणचं ……दही ………. साजूक तूप ……….ओली चटणी ………………आहां बाप्पा एकदम खुश . 

दोन दिवसांनी लगेच गवरीची तयारी ………….मुहूर्तावर गवरी आणायला आजूबाजूच्या सगळ्या सवासनी जमत ………… पारंपारिक गाणी म्हणत ………रानात गवरी आणायला जाणाऱ्या बायकांची यावेळी एकच झुंबड उडते ………….नव्या कोऱ्या काठपदरी  साड्या …………केसात मळलेल्या वेण्या ………….गजरे ………… असतील नसतील तेव्हडे घातलेले दागिने ……………….नाकातली पारंपारिक नथ …………….गवरी पेक्षा यांचाच थाट बघण्यालायक असायचा  ………….आणि त्यातही त्या घरात नवीन सून आली असेल तर तिचा मान काही वेगळाच …………अशावेळी तिला खास लग्नाचा भारी शालू नेसावयाची पद्धत आहे . सांजवायच्या आत गवरी घरी आणायची रीत आहे मग नव्या सुनेसाहित सगळ्या इतर बायका उखाण्यात नावं घेत लाजत मुरडत घरात प्रवेश करतात.  मग गवर नेसवणं ( रानातून आणलेल्या तिर्ड्याना बांधून त्यावर साडी नेसवणं )  अतिशय स्किल असणारं हे काम आहे . जाणकाराला मात्र काही वेळात हे शक्य आहे . याच दिवशी रात्री गवरीला भाजी भाकरी चा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे . ऐकून २०-२५ प्रकारच्या पाले आणि फळभाज्या एकत्रित करून हि भाजी तयार केली जाते सोबत तांदळाची भाकरी ……………गवरीचे दोन दिवस मात्र फुल ऑन धम्माल असते . सध्या TV वर मंगळागौरी चा इपिसोड दाखवतात ना तसले सगळे खेळ जागरणाच्या रात्री खेळले जातात ………………….  या दोन रात्री जागवणं याची मजा काही ऒरच …………त्यात गावभर आरत्या आणि बाल्या नाच करीत फिरणं वेगळंच ……………अर्थात वेळ वाऱ्यागत उडतो आणि विर्सर्जनाचा दिवस उजाडतो ……………ज्या रस्त्याने बाप्पा आनंदाची पर्वणी घेऊन आला त्याच वाटेने पुढच्या वर्षी लवकर येईन म्हणत माघारी निघतांना त्याचाही उर भरून येत असेल कदाचित ………………… ! 


© Santo

यंदा "नो बाल गोविंदा" ..............!




हवेत कशाला ११ थर 
"गिनीच" बुकात नोंदवायला . असा रेकॉर्ड केला कि ते "गिनीच" बुकवाले थरातल्या प्रत्येकाला सरकारी नोकरी देतात का ? मुळात तुम्हां तमाम मंडळाच्या पोरांनी गेल्या काही वर्षात स्वतःच्या जीवावर बेतून ……………राजकीय भाऊ - दादांना करोडपती बनवलंय हे लक्षात घ्या …. …………. लाखात बक्षिसं देणारे हे भामटे या उत्सवात करोडोंची उलाढाल करून आपली बोचकी बांधतात हे कधी कळणार आपल्याला ………. भाऊनसाठी आपण काय पण करून यंदा ९ थर लावणारच असा संकल्प करणारा दुसऱ्या दिवशी KEM च्या खाटेवर आडवा असतो . ……………………… त्याला लीलावती किंवा हिंदुजात का बरं उपचार मिळत नाहीत . ………………. दिवसभर किमान ५-६ वेळा कपडे बदलत भाऊ जेंव्हा मोठाल्या स्टेज वर सेलिब्रिटीसोबत ठुमकत असतो . तेंव्हा त्याचा घाम पुसायलाहि ब्रांडडेड टिशू ………आणि आपण मात्र चिखलात लोळत इतक्या थराला तितके रुपये देणाऱ्या हांडी च्या शोधत फिरत असतो. ……………. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करीत तिच्या आईला बघतोच आता कोण आडवंतय आम्हाला हा नेमका कशाचा माज …………………तर काहींनी यावरहि डोकं लावीत दही हांडी साहसी खेळ म्हणून जाहीर करा अशी मागणी केली . अर्थात बसल्या जागेवर एका दिवसात रग्गड कमवून देणारं दुकान बंद पडायची वेळ आली तर एव्हडी फडफड होणारच ……………नाहीतर दहीहांडी वर बहिष्कार टाका अशी गोविंदा पथकांची टाळकी फिरवणारे काही राजकीय नेतेच मुख्य आयोजक आहेत / होते (काहींनी आजच आपला ठेला उचललाय ) . अरे पण ते कोवळं पोर जेंव्हा इतक्या उंचीहून खाली निसटत तेंव्हा त्याच्या आईच्या काळजात कसली उसळी भरत असेल याचा वेध कुणी घेतलाय का ? …………एकीकडे आपण कृष्णजन्माचा गोपाळकाळा करीत उत्सव घालतो आणि दुसरीकडे त्याच बाळकृष्ण स्वरूपाला जिंदगी- मौत के खेलमैं दावावर लावतो. विकृत आहे हे सारं ……………………अरे मान्य आहे ना हा आपला मराठमोळा सण आहे. पण याच सणाला पॉलीटिकल भाऊंनी हाय ज्याक केलंय आणि दिवसभर LIVE कव्हरेज देणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी त्याला लोकप्रियतेच्या hype वर नेलंय . आता सामाजिक भान आल्यागत घसा फोडून कोकलणाऱ्या माध्यमांनीच या गल्लीतल्या भाऊच्या हांडीला एक्ट्रा स्पेस देत international BIG NEWS केलंय हे Ignore करता येणार नाही. .

पूर्वी चाळी - वळीत खेळला जाणऱ्या गोविंदाच्या टोळीत अपघात होतंच नव्हते असा युक्तिवाद कोणी केला नाही आणि करणार देखील नाही . पण त्यावेळेस हा निव्वळ सण होता . नाक्यावर लटकणारी मटकी फोडण्याचा निखळ आनंद घेण्याचा …………एकमेकांच्या कंबरेत हात घालीत खालू बाज्यावर बेधुंद होत नाचण्याचा . तेव्हाच्या लोकांना बेभान व्हयला आता सारखा ओह्ह एस कमॉन म्हणीत उड्या मारणारा हनी सिंग लागत नव्हता . त्यांच्या रक्तातच तो जोश सळसळत असे . …………………काही असो पण यंदा "नो बाल गोविंदा" हि मोहीम फत्ते झालीच पाहिजे . ढाकू -माकूम बाज्यावर यावर्षी चाळीसमोरच कल्ला करूया कि …………दह्या दुधानी भरलेल्या हंड्या दोन तीन थर रचित आपल्या आपणच फोडूया ना भावा………………. आपल्या मंडळाच्याच पोरांनी वर्गणी काढून एकत्रच जेवण मागवूया कि ……………लय धम्माल घालू ………………आपल्याच घरासमोर …………………त्या ५ -१० हजारच पाकीट घ्यायला भिकाऱ्या सारखं कशाला कुणाच्या दारात जायचं ……साला आपली बी काय लेवल हाय का नाय …………बाकी संस्कृतीच्या नावावर अर्निंगइवेंट करणाऱ्यांना बसुद्यात बोंबलत आपल्या बापाचं काय जातंय .


© संतोष टाकळे

वैभुच डीलीट केलेलं सारं आकाश.................!

वैभुच डीलीट केलेलं सारं आकाश प्रकाशित झालंय ……………सुनील दादांनी क्षणाक्षणा चे उपडेट्स FB वर पोस्ट केले आणि प्रकाशन सोहळ्याच्या दिशेने असणाऱ्या माझ्या सारख्या अनेकांना हा कार्यक्रम online पाहता आला . मनात असूनही वेळेत न पोहचता आल्याने काही वेळ स्वतः वर संताप आला . पण work come first या कॉर्पोरेट तंत्रात अडकलेल्या आम्हा नोकरदारांना इथ वाजवी बोलायला अजिबात वाव नसतो हि आमची गोची कित्तेकदा कुणाला पटवूनहि पटत नाही . हे वेगळच ……………… फोर्ट ते दादर या १ तासाच्या प्रवासात तिकडे नक्की काय चालू असेल याची उस्तुकता अधिक उपसेट करणारी होती . आणि अखेर एकदाचं दादर माटुंगा कल्चरल सेंटर आलं …………सभागृह कटोकाट भरलेला . समोर वैभव त्याचं मनोगत व्यक्त करीत होता . सोहळा अंतिम टप्यात पोहचलेला. वैभव नामदेवदादा ढसाळांची आठवण सांगत होता . एकंदरीत मोजून १० मिनिटात सांगता झाली .……फार लागून गेलं मनाला कारण युवराज सर , कविता ताई , एकनाथ आव्हाड सर , संभाजी दादा सगळेच फेवरेट वक्ते ऐकता आले नाहीत. शिवाय सिद्धूच निवेदन आणि डॉक्टर अभिराम दीक्षित ने वाचलेली कविताहि ………

वैभव भडकलाच होता टाकळ्या लवकर आलास आणि असे बरच काही शेलकी उद्धार पार पाडीत . शेवटी त्यानं मिठी मारली . वैभु खरचं आज आनंदाचा सोहळा माझ्याकडून हुकलाय माफ कर मित्रा …………पण त्याचं क्षणाला अगदी भरून आलं इतके अडथळे मोडीत अखेर वैभव च पुस्तक प्रकाशित झालंच…………. त्यासाठी कीर्तीकुमारच्या नवता प्रकाशनाचे मनपुर्वक आभार ………….तसे वैभव सोबत माझे असंख्य मतभेत आहेत . अनेकदा आमच्यात शाब्दिक चकमकीहि झाल्यात . तो जाम वैतागलाय देखील माझ्यावर . पण त्यांनी लिहिलेलं बरच काही मला अतोनात भावलय………… डीलीट केलेलं सारं आकाश परवाच रात्री एका दमात वाचून काढलं यातल्या बऱ्याच कवितांचा अर्थ उमगलेला नाही . आता हे त्याला सागितलं तर तो म्हणेल टाकळ्या थांब तुझा क्लासच घेतो तू भेट मग बघ तुला कसं चोपून काढतो ते ;) :P ....................आणि हा माझ्यावरचा अन्याय आहे . मला मुद्दामून टार्गेट केलं जातंय …………असा मी कांगावा करायचा यात आमची वेगळी मज्जा आहे. . ……… मागे कोकण दौऱ्यात वैभव त्याच्या पायाच्या दुखापतीमुळे दापोलीत असूनही घरी येऊ शकला नाही. याची हळहळ आजही लागून राहिलीय . पण त्यानं मटण -वड्यांना दिलेली मनमुराद दाद आजही लक्षात आहे . मुळात तो माणूसवेडा आहे . कुठल्या कानाकोपऱ्यात याची मित्रावळ असेल याचा नेम देता येत नाही . 

काही महिन्यांपूर्वी मी आमच्या मास्तरांना ( राकेश शिर्के ) विचारलं होतं कोण हा वैभव छाया …………तेंव्हा मास्तर म्हणाले होते . कळेल जाड्या येत्या काही दिवसात धीर धर आज तोच अनोळखी वैभव माझ्यासाठी वैभु झालाय यात आलच कि सगळं ……………………

बस लिखते राहो हमेशा दोस्त 
हर वक्त के उस बेजुबान लम्हो को 
उठने दो …. जजबातोंका तुफान 
क्यो कि अब अनजाना काफिला भी 
इस तरफ मुड़ रहा है !

© Santo


Photo Courtesy - Rani Salunke

रमजान स्पेशल @ मोहमद अली रोड ……….!


इईsss मोहमद अली रोड तिथ जाऊन काय खाणार ? घरी चांगले मटन वडे केलेत ते घश्याखाली उतरत नाहीत का ? काही गरज नाही तिकडं रस्त्यावर जाऊन खायची त्या धोत्रेला पण नको ते प्लान सुचतात वर्षाचा सण (गटारी ) आमच्या सोबत घालवायचा टाकून का म्हणून घाणीत जायची तुला हुक्की आलीय ………चार बुकं जास्ती शिकलास काय तर शिंग फुटलीत का तुला ………… कसलं मटन मिळतं तिथ माहित आहे का तुला ………….धोत्रेला फोन लावून दे मीच घेते त्याचा क्लास आज ………… इति आमच्या ताईमां ………. कशीबशी समजूत काढून बाहेर पडलो तर निल्या बुलेटीन मध्ये अडकलेला १० वाजून गेलेले …………एकदा वाटलं मरोत रद्द करावा आजचा प्लान पण परत निल्याचा मूड ऑफ ………… सव्वा दहा वाजता साहेब आले एकदाचे ………आल्या आल्या सुरवात अरे यार अस झालं आणि तसं झालं म्हणून दीड तासाचा उशीर …………. शेवटी तू प्रोडुसर तुला एपिसोड बनवायला आता आम्ही शिकवणं म्हणजे …………एकच हश्या :) :) ………….साब कहा उतरना है ………….वो शालीमार हॉटेल के सामने ………… उतरल्या उतरल्या निल्या दोन मिनिटात सराईतपणे नेमक्या गल्लीत शिरला …………इथ मालपोहा खायचा …… फिरनी आणि अफलातून त्या दुकानात सोबत त्या पदार्थाची इन detail इन्फो ……… निलेशचा तसा अनेक विषयात सॉलिड तगडा अभ्यास आहे . अनेकदा अडलं -नडलं आणि त्याला फोन केला कि समाधानकारक निरसन होणार हे ठरलेलं . 

गच्च भरलेल्या दोन गल्ल्या आर -पार फिरत जे स्पेशल त्याचा फडश्या पाडीत २ तास खादाडी झाली . पोट जवळ जवळ भरलच होतं पण अजून शालीमारची बिर्याणी आणि टिक्के बाकी आहेत . निल्लू बस कि रे आता अस बोलण्याची सोय नाही कारण तो भेटला कि तो म्हणेल ती पूर्वदिशा हा दंडक असतो. आणि तसही तो हल्ली अमावश्या - पौर्णिमेलाच भेटतो सो नो टोका -टोकि शालीमारच्या प्रतीक्षालयात तासभर बसल्यावर आला एकदाचा नंबर पुन्हा बिर्याणी आणि टिक्क्याचा निक्काल लावीत ढेकर येणार इतक्यात संत्या फालुदा १ नंबर मिळतो इथे दोघात एक होऊन जावूदे ………… बडीशेपलाहि पोटात जागा नाही आता फालुदा पुढच्या वर्षी बघू हे माझा चेहरा बघून त्याच्या लक्षात आलेलं असावं कदाचित …………… फिंगर बाऊल मधला लिंबू पिळीत हा एपिसोड इथेच संपला पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात एका नवीन ठिकाणी मस्त खा आणि स्वस्थ राहा …………अशी anchor line द्यावीशी वाटत होतं कारण दस्तूर खुद्द प्रोडुसर सोबत होते . 

मुळात काय खाल्लं आणि किती खाल्लं यापेक्षा निल्या सोबत जो मस्त वेळ घालवता आला . असा योग हल्ली फार कमी वेळा येतो . सध्या स्मार्ट फोनच्या फ़ूल्ल रेंजने निखळ मैत्रीचं नेटवर्क जाम केलंय. फिलिंगस डिजिटल झाल्यात पण wahts up वर आपल्या मित्राच्या डोळ्यात तुमच्यासाठीच्या आत्मीय भावना पाहता येत नाही त्यासाठी आपल्या दोस्ताच्या खांद्यावर हात टाकून अस मोकाट हिंडावं लागतं …………मस्तपैकी उनाड वेळ काढून. 

© Santo

आजोळी रविवार ……………!




आमचं आजोळ तिकडे कोकणात दाभोळ खाडी पलीकडच्या अंजनवेल गावात …………………. पण आजी जाऊन आता १० एक वर्ष झालीत . आणि आजोळ तुटलं ती असतांना वरचे वर जाणं होई तिचा आमच्या उन्हाळी सुट्टीच्या दिवसात पोरांना पाठव असा आईसाठीचा  निरोप घेऊनच मामा येत असे आणि मग आमची रवानगी त्याच्या सोबत होई ती २० एक दिवस धुडगूस घालण्यासाठीच ………….रानटी बोरं ………. कलमी आंबे …… …सकाळी बकरीच्या दुधाचा घट्ट चहा आणि बटर ………….दुपारच्या जेवणात खाडीची ताजी मासळी ……….आज्जीने चुलीवर थापलेल्या भाकऱ्या ………… संध्याकाळी परत बाजार आणायला आज्जी निघाली कि तिच्या सोबत कापडी पिशवी हलवत गेलं कि अगदी खिसा गच्च भरेस तोवर खाऊ मिळे ………वासंती तुझा नातू काय ग असं विचारणाऱ्या कोळणी गालगुच्छ घेत हातावर आठ आणे ठेवीत. खाऊ घे म्हणत पुन्हा गाल ओढीत. ………………बस्स सध्या या फक्त आठवणीच आहेत . 

पण कालच्या रविवारी पुन्हा आजोळी गेल्याची अनुभूती घेता आली . निमित्त होतं VasantAjoba's Stage Opening Ceremony च ………………अगदीच अनपेक्षित पणे या कार्यक्रमाला जाण झालं ………… इतक्या पावसातही २० - २५ जण उपस्थित होते .  विशेष म्हणजे आजी -आजोबांनी स्वतः जेवू घातलं ………पानात आग्रह करीत भात वाढनाऱ्या  आजोबांना पाहताना डोळे आपसूक पाणावले अर्थात सध्या आजी -आजोबा नसणाऱ्या प्रत्येकाला हे अनवट प्रेम गहिवरून टाकेल यात शंकाच नाही .
विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी इथ येणं केलं होतं ते फक्त वसंत आजोबांच्या प्रेमाखातर ………१२ वर्षाच्या मयुर पासून ते थेट ६५ वर्षीय माने आज्जीपर्यंत सगळ्याचं हेच  "आजोळ " असल्यागत सगळा थाट होता . ………………. इंगळे  बंधूनी सितार आणि तबल्याची केलेली जुगल बंदी …………….पुनम ताईनी त्यावर केलेलं क्लासिकल नृत्य ……………पुण्याच्या आमच्या विनायक वाड या  परम लाडक्या मित्राने उलघडलेल्या फिल्मी संगीताच्या ऑफ रेकोर्ड नोंदी ……………. माने मावशीने म्हटलेली कान्हाची ठुमरी …………लचके काकांचे भन्नाट विनोद ………….राज कंदलगावकर ची गणेशा क्यालीग्राफी आणि अस बरच काही …………… भिन्न विचारांची आणि प्रवृत्तीची माणसं एका व्यासपीठावर आल्याचा कालचा सुवर्णयोग म्हणावा लागेल . एकंदरीत कालचा रविवार या नव्या आजोळी साजरा करतांना एक नव्हे तर चार -चार आज्जा भेटल्या ………आता आजोळ नाही अस तर म्हणता येणार नाहीच पण सोबत आजीच्या त्या आठवणी आसू नव्हे तर हासू घेऊन पुन्हा जागवता येतील . या आनंदाच्या फिलिंग्स काही वेगळ्याच सुखाच्या पायवाटेने  ओढीत नेतायत   कदाचित नव्या मामाच्या गावाची हद्द आता यापुढे सुरु होतीय . 


 Santo ©

बाजार ..............!






ऑफिस सुटलं कि सरळ बिग बाजारात ये …………whats up वरच्या हिच्या मेसेज न धडकी भरली आज पुन्हा खिश्याला खड्डा पडणार कालच पगार जमा झालाय . त्यातले तसेही १५ एक हजार येत्या दोन दिवसात automatic उडतीलच. बँकेचा हप्ता - गावी बाबांच्या account मध्ये direct transfer , पॉलिसी चे प्रिमियम अस सगळं प्रत्येक महिन्याचं ठरलेलं अचूक गणित. बाकी सगळा घरखर्च आमच्या ह्याच सांभाळतात.  पण अशी अधून मधून शॉपिंगची हुक्की आली कि अर्थात माझं कार्ड सपासप ओढीत बाई तुफान सुटतात. अशा वेळी तिला आवरणं अशक्य …………………….अय्या हे बघ ना अस म्हणत ती जेंव्हा एखादी वस्तू उचलते तेव्हा माझी नजर पहिल्यांदा price tag च्या आकड्यावर जाते.  त्यावर बऱ्याचदा मी ठरवतो हि वस्तू चांगली कि वाईट …………… स्मिता आवर लवकर ९ वाजत आले . पायांचा तुकडा पडेल आता एका एका लेन मध्ये किमान दोनदा फेऱ्या झाल्यात………. यादी करून यायला काय होतं तुला ………… घरी जाऊन अजून स्वयंपाक व्हायचा असेल. अगदीच कसं मिस म्यानेज करतेस तू ………………त्यावर बाई हातातल्या सुपर कडक डस्ट चहा च्या पाकीटावरची ऑफर पाहत गरजल्या  झाली का तुझी कीटकीट सुरु अजिबात म्यानर्स नसल्यागत वागतोस कधी कधी ……………. अरे महिनाभराचा  बाजार घ्यायला वेळ लागणारच.  आणि आज जेवण नाही जाता जाता MAC -D मध्ये काहीतरी खाऊ ………. हवेत कशाला रोजचे डाळ भाताचे चोचले. अधून मधून चेंज नको का ? अशा वेळेस इतर नवरे जसे गप्प बसतात तस मलाही गप्प बसणं भाग होत. हम्बरी -तुम्भरी करीत वाद घालणं आपल्या तत्वात बसत नाही. अजून एक अर्धा तास हे घे ते घे करीत चकरा मारीत. अखेर बिलिंग कांउंटर च्या दिशेने म्याडम सरकल्या  आणि  मी सुटकेचा निश्वास सोडला. …………… भराभर जिन्नस पालथा घालीत त्या कांउंटर वरच्यापोरानं बील मांडल bag चाहिये मी नाही म्हणणार इतक्यात yes म्हणत बाईनी कार्ड पुढं केलं. instant ढोकला , इडली , डोसा , सूप ,खीर मिक्स , अर्थ ग्रीन ची कडधान्य , चाट - फुलाव -तंदुरी -बिर्याणी -सांबर - मटण -चिकन अशा बऱ्याच प्रकारच्या मसाल्यांची पाकिटं , कोलेस्टोल फ्री रिफ़ाइन्ड ऑइल , साबण , श्याम्पो , आणि अस बरच काही याची पावती पिशव्यांचे २० रुपये अधिक लावत  आणि मेंबरशीप कार्ड ने त्यावर डिस्ककाऊंट देत अखेर एक लांब लचक रसीद हातात देत . पिशव्या handover करीत त्याने next म्हटलंहि …………बाईंचा मूड अजूनही ऑफच होता. तसही या बायकांचा मूड मिनिटा मिनिटाला रंग बदलतो त्याला आपल्यासारख्या सोशिक नवऱ्यानी फार भाव देऊ नये . विजय पाटील चा हा सल्ला अनेकदा उपयोगात आणावा लागतो . 

काल या बाजाराच्या निमित्ताने मात्र पुन्हा काही काळ मागं नेल. गावात महिन्याचा बाजार आणण्याची मजेशीर आठवण आहे . आमचं एकूण ६ जणांच कुटुंब आई -बाबा आणि आम्ही चार भावंड महिन्याला लागणाऱ्या जिन्नसाची रीतसर यादी केली जाई . बाबांचा पगार झाला कि यादीत लिहिलेल्या जिन्नसा प्रमाणे अंदाजे अकडा ठरवला जायचा . आदल्या दिवशी बाजारासाठी मोठ्या कापडी पिशव्या , तेला साठी किटली , डालड्याचा डब्बा , खोबरेल तेलाची बाटली , गहू  बाजरी साठी मोठ्या गोण्या यांची आटोपशीर तयारी करून ठेवली जात असे . दुसऱ्या दिवशी आई दुकानात निघाली कि तिच्या सोबत आमच्या पैकी दोन जणांची वर्दी लागे . बाजारहटाची  समज आलीच पाहिजे म्हणजे पुढे स्वतः च स्वतः करतांना गोंधळ उडणार नाही अशी आईची समजूत . ……………… पुला जवळचे घाऊक विक्रेते  फाटक यांच्या दुकानात त्याकाळी तासान तास उभं राहावं लागे .पहिल्यांदा अप्पांकडे पावती करायची.  गो . म.  फाटक आणि कं अस लिहिलेल्या पावतीवर एका मागोमाग अप्पा सगळा जिन्नस उतरवत त्यासमोर भाव मांडीत त्याची तिथल्या तिथ बेरीज करीत . कुठलाही क्याल्सी बिल्सी न वापरता . अप्पा १०० रुपये कमी पडतायत अस मोकळेपणानं सागितलं कि त्यांचं उत्तर ठरलेलं मांडून ठेवतो उद्या परवा द्या सवडीनं बरं यात भागतंय कि आणि काय घ्यायचं राहिलंय . डॉट डॉट मारून जोडलेली पावती टरदिशि फाडत गाड्याला बोलावून एव्हडं टाकळेंच जिन्नस घे भरायला म्हणत अप्पाची पुढच्या यादीची नोंद घेत पुन्हा नवी अकडेमोड सुरु होई. इकडे गडी यादीत लिहिलेल्या जीन्नसाच्या पुड्या बांधीत तासाभरात सगळा जिन्नस देऊन मोकळा करी . घावूक माल तळाला आणि इतर नाजूक माल वर अशा पिशव्या भरल्या जात आणि  एकूण ५ - ६ पिशव्यांचा बाजार सायकलच्या मागे पुढे अडकवत घराकडे आणताना दमछाक होई .श्रीखंडाच्या गोळ्या , तळलेले मसाला केळा वेफर , अप्पांनी दिलेले दहा -बारा अक्रोड अशा खाऊनी गच्च भरलेला खिसा. कधी एकदा घरी जाऊन फस्त करतोय अस होई .  ……………… शिवाय आईच्या डोक्यावरच्या दोन पिशव्या आपण हलक्या करीत नेतोय याचं समाधान आणि घरातल्या जबाबदारीच्या कामात आपला सहभाग याच अप्रूप वाटे …………….सणासुदीला मात्र रिक्श्या साठी वेगळे पैसे मिळत. अर्थात दिवाळी -गणपतीच्या सणाला जिन्नस दुप्पट आणावा लागे . विशेष म्हणजे सध्या दापोलीत सुपर मार्केट उपलब्ध असूनही आजही किराणा त्याच दुकानातून घरी येतो . आणि तेही रीतसर यादी करून . 

लक्ष कुठाय तुझं मी काय विचारतेय वेज आलू टिक्की कि स्पायसी चिकन …………अंह वेज वेज ……….असा मधेच ट्रान्समध्ये कसा काय जातोस तू कठीण आहे बाबा तुझं ……………आता घरी पोहचलो कि लगेच समान भरून घेऊ उद्या मलाहि लवकर निघायचं ऑफिसला …………आणि उद्या डब्बा नाही. instant इडल्या करते तोच नाश्ता आणि उरल्याच तर चार डब्यात पण घेऊन जा …………चल आवर पटापट किती रमत गमत खातोस …………मी दोन पिशव्या घेऊन पुढे जाऊन कॅब थांबवते तू या चार ब्यागस घेवून लगेच ये …………… …………. नको रे तुला नाही जमणार तू हि एक पिशवी लाव सायकलला बाकी मी घेते डोक्यावर तशीही तुला सायकल अजून नीट जमत नाही रे बाबू……….  उन्ह बघ किती वाढलंय तुला भूक पण लागली असेल ना हो पुढं अर्चू ताईला जेवायला वाढायला सांग मी आलेच तुझ्या मागोमाग ……………………….इति आई ………अनेकदा सुपर मार्केटमधून आणलेल्या वेल प्याक्ड शुगरच्या तुलनेत वाण्याकडून कागदात बांधून आणलेल्या साखरेत जास्ती गोडवा असतो. कारण वाण्याकडची पुडी सहज परत करता येते मॉल च्या सो कॉल कल्चर मध्ये ती सोय नाही . 

© संतोष टाकळे 

* फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा .

© Santo

बयो ……………. !





बयो बरेच दिवस आली नाही तर फार चुकल्या चुकल्या सारखं वाटे. तिच्या लगबगीनं वाडा नुसता गजबजून जाई. मजुरी करणाऱ्या गडी आणि बाया माणसांची बयो मेन म्होरकी  …………काम कोणतही असो तिनं एकदा मनावर घेतलं म्हणजे ते झालंच म्हणून समजा ………… वर्षभराच्या नियोजित कामांची यादी बयो समोर ठेवली कि त्यातली जमतील तेव्हड्या कामांची निवड बयो करी आणि बयाना (advances) म्हणून शे - दोनशे घेऊन जाई ती थेट ठरल्या दिवशी न चुकता पहिल्या पहरि बयो तिच्या गडी माणसांसोबत अंगणात हजर झाल्याची आरोळी स्वतःच देत . पाण्याचा तांब्या मागित ओसरीवर बस्तान मांडी . हातातल्या कापडी पिशवीत भाकरीच गाठोडं, उन्हात डोक्यावर बांधायला सुती फडका , कोयती -विळा आणि इतर वस्तू भरलेल्या . बयो आली हो आवरा पटपट म्हणत घरची कारभारीण चुलीवर चहाचा टोप चढवीत . विस्तो पुढे सारी.  बुकी -साखरेला उकळी येईस तोवर बायो  इकड -तिकड च्या गोष्टी कारभारणीच्या कानावर घाली . त्यात यंदा पाऊस कसा लांबणार - रानात चंदन चोर पिसळेत ते , त्या अमक्याच्या पोरीनं तमक्याच्या पोराशी पळून लग्न केल. असे काही खरपूस अपडेट देत देत काळ्या चहाचे दोन चार भुरके मारीत अखेर आजच्या कामाच्या विषयावर येई . मी हाय ना तुम्ही कशाला घाबरताव आज पुरा करून देते जबान हाय आपली काय समजलाव  ………… तिच्या या धीर वजा खात्रीलायक विश्वासाला घरमालक दुजोरा देत बयोला पानसुपारीचा बटवा देई . मग चंचीतल्या पानाला डबीतला  चुना खरडवून लावीत त्यावर सुपारीची खंड ठेवीत. हातावर चिमुटभर तंबाकू मळत एकदाचा तोंडात बार भरला जाई . चला मागच्या परसावातला  वाडा दुपार पर्यंत उडवू मग दुपार नंतरचा काय तो मग बगू . म्हणत बयो उठली कि तिच्या मागून सगळेच मार्गस्थ होत . सपसप चालणाऱ्या हात सोबत  बयोचं तोंडही चालत असे . अगदी स्वतःच्या घरचं काम असल्यागत बयो गड्यांमागे जातीन उभं राहून सगळं नीट करून घेई.  मजूर बायाहि तिला टरकून असत. 

गावात  काही घरात बयोचा घरोबा असे अडीनडीला तिला याच घरांचा आधार असे . ज्या घरात इतरांना माजघरातहि प्रवेश वर्ज आहे . त्या घरात बयोला  चुली पर्यंत वावर मिळे . आजारपणात गावठी अवषद आणि मुळ्या -वेली शोधून आणायची जबादारी बयोचीच तिनं सुचवलेला उपाय हमखास केला जाई. अनेकदा बागायतदारांच्या बागा बयोच्या ताब्यात असत इथ तीची हुकुमत चाले . तिला न विचारता इकडची काडी तिकडं होत नसे . एकेकाळी कोकणात अशी बरीच कामं  बयोच्या भरवश्यावर होत. अजूनही काही ठिकाणी विरळ का होईना बयोचं अस्तित्व टिकून आहे . आज तिच्यावर लिहिण्याचं निमित्त केवळ तिची आठवण नाही.  तर नुकताच तिची दापोलीत झालेली भेट. एक काळ लोटून गेला असेल तरीही तिनं मला ओळखलं ………. गालावरून मायेन फिरणाऱ्या तिच्या हातात. निखळ प्रेमाची अनुभूती जाणवत होतीच. सोबत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद भरभरून ओसंडत होता. एव्हडासा होतास तेव्हा बघितलं होतं तुला आणि आता किती मोठा झालास बावा ………लग्न बिग्न केलास काय ………. या आणि अशा अनेक गोष्टींची विचारपूस झाली. आणि ती निघते म्हणत वळली  ………….  पान सुपारीला तिच्या हातात ठेवलेल्या २ नोटा ती पुन्हा पुन्हा नाकारत म्हणत होती पैसे नको बावा तू भेटलास त्यांनच पोट भरलाय .अखेर जास्ती हुज्जत न करता तिनं  नोटा बटव्यात कोंबल्या आणि डोक्यावरच्या टोपलीत हात घातला  . बाजारात आंबे -करवंद- गरे आणि अस बरच काही विकून रिकाम्या झालेल्या टोपलीत एका सुती कपड्या खाली तिच्या नातवंडासाठी घेतलेल्या  खाऊच्या पुड्यातली  एक पुडी हातावर ठेवत ती म्हणाली  आधी भेटला असतास तर चार आंबे दिले असते . पण सगळा बाजार संपला तसही मी तुला काय देणार पण हि खाऊची पुडी गोड मानून घे लेका . निशब्द : करून रस्त्याच्या कडेने जाणारी बयो आजही माणसात माणुसकी कायम टिकून आहे हे पटवून देणारं एक जागृत उदारहण म्हणायला लागेल. 

पोटा - पाण्यासाठी गावठिकाण सोडून शहरात आलेल्या आपल्या सगळ्यांनाच इथल्या गर्दीन गुदमरून टाकलंय , पैसा -प्रतिष्ठा- status आणि दिखाव्याच्या जगण्यात आपल्या  सच्चेपणाच बियाणं पोचट झालंय. अलिशान घरांच्या भिंतींना सवय झालीय ती standard आणि हाय क्लास ल्याविश जगण्याची म्हणून बयो सारखी माणसं  शहरात येत नाहीत  आणि आलीच तरी फार काळ टिकत नाहीत ………… एके काळी मजुरी करून आणि बाजारात काय -बाय विकून जिन पोराला शिकवला आज तो लेक कमावता झालाय . तस बघायला गेलं तर आता बयोचे बसून खाण्याचे दिवस पण तरीही बयो आजही टोपलीत किडूक मिडूक घेऊन बाजारात बसते ………… ती म्हणते ज्या टोपलील्या रुपयाने पोराला हजारो कमवायची ताकद दिली.  ती टोपली झेपेल तोवर बाजारात आणीन ……….पुढंच कुणी बघितलंय बाबा ……… अखेर काळची किमया कोण टाळणार ……….अगदी खर आहे तिचं आणि तसही  फिल्टरच्या पाण्यात कितीही मिनिलर्स असले तरी झऱ्याच्या एका ओंझळीत जी तरतरी येते . तिची तोड कुठला ब्रांड देणार तुम्हाला. . 

बयो सारखी माणसं  टिकून राहोत हीच सदिछ्या !!!



© संतोष टाकळे
  


* फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा .

मिर्ची म"सला"………….!



घरात मसाले ,पापड , लोणची यांची रेलचेल सुरु झाली कि उन्हाळा सरत आल्याचं अगदी जाणवायला लागतं . पण हल्ली लोकांकडे पैसा आलाय शिवाय इतकी झंझटमारी करीत बसण्यापेक्षा आयत बाजारात मिळतंय कि असा कितीसा फरक पडतोय १०० -२०० शेचा उन्हातान्हात मरमर करण्यापेक्षा दोन पैसे गेलेले काय वाईट असा नवा फंडा सध्या अनेकांनी स्वीकारलाय .पूर्वी बाया घरीच मसाले ,पापड ,लोणची करत धम्माल असायची यावेळी अंगणात कडक उन्हात मिरच्या सुकावायाच्या त्या मोडायच्या डंकिनवर नेऊन दळायाच्या इथे येणाऱ्या प्रत्येकीच्या मसाल्यात अनेक परी असत कुणाचा कांदा खोबरं घालून केलेला घाटी मसाला ,खडे मसाले घालून केलेला मालवणी मसाला , नुसती मिरची मीठ घालून केलेला तेली मासला , लाल भडक कलरची मिर्ची पिसून केलेला करी मसाला इत्यादी मसाल्याचा कडक ताजा दर्प डंकीनच्या वातावरणात पसरलेला असे .डंकीनवाली मसाला मारील म्हणून आई ५ किलोच्या मिरच्यांचा भुगा पडून त्याचा मासला डब्यात भरे पर्यंत तिथ बस्थान मांडून बसत असे . ठसका जाणारा दर्प आणि धण्या जिऱ्याचा खमंग हवेत रंजी घालत लांबवर पसरत असे .यंदा कलर जरा जास्त भडक आलाय नाई - तिखट पण जबरी झालाय . मिरच्या चांगल्या मिळाल्या बाई अशी कवतुकाची गोडावी ऐकत मासला अखेर ठेवणीच्या बरण्यात बंद होतो. पापडाचं ही असंच काहीसं आज हिच्याकडे तर उद्या तिच्याकडे पापड बनवायचा बेत असे .पोळपाट लाटणी घेवून पोरी एकमेकिंच्या दारात बसून पापड लाटायच्या , लोणच्याच म्हणाल तर वैशालीच्या हातच्या लोणच्याला टिकाव आणि पुरवठा पण आहे म्हणून तिला लोणचं बनवायचं आमंत्रण द्यायल . तिच्या घरी दोन चार वेळा खेटे घालायचे. हे सगळं आत्ता हळूहळू विरळ झालंय सध्याचा बायका कुणाकडे पापड लाटायला जायचं याला so down market म्हणत नाक मुरडत सोफ्यावर लांब होत. diplomatic डेली सोप बघत वेळ घालवण्यात अधिक रस दाखवतात.

दापोलीत असताना संपूर्ण मे महिना रग्गड कामात जायचा. गुरांची वैरण गोठ्यात भरून घ्या, चुलीची लाकडं खोपीत मांडा , दारातल्या वळचणीला आडोसा घाला, रोज नव्या कामाची यादी तयार असे. कोकणात तर मीठ ,सुकी मासळी , कोकम , आंब्या फणसाचे साठे , करवंद , कैऱ्या आळूच्या उसऱ्या, सुकवलेल्या

आठला, एवढंच काय पूर्वीचे लोकं म्हणे पावसाळ्यात उपयोगी पडतील म्हणून ओल्या भाज्या सुकवून ठेवत असत . मे महिन्यातल्या आठवडा बाजारात खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडत असे . पावसात छतावर घालायचा प्लास्टीक, नांगरासाठी नवीन कासरे,छत्र्या , पावसाळी चपला ,शाळेतल्या पोरांना दप्तर- नवीन पाटी ,ते अगदी मसाल्याच्या मिर्च्या , लसूण -कांदे अस किडूक मिडूकच्या जिन्नसाची खरेदी करतांना बटवा पार हलका होयीस्तोवर तीन चार चकरा मारीत अख्खा बाजार पालथा घातला जाई . ते दिवसही तसे होते म्हणा. मुसळधार पावसात कित्तेक गावांचा संपर्क तुटत असे. आणि एकदा पावसाळा सुरु झाला. आणि लोक शेतीच्या कामाला वाकले कि मग पुढचे दोन तीन महिने त्यांना फुरसत नसे . अशा वेळी दिवसभर शेतात राबून घरी आल्यावर गरम गरम भातावर सुक्या मासळीच कालवण घालून आडवा हात मारायची मजा काही ओरच. दुपारी शेतावरच्या बांधावर बसून फणसाच्या आठला घालून केलेल्या जवळ्या सोबत भाकरीचा तुकडा मोडताना भुकेचा आणि मन तृप्ततेचा एक अनोखा आनंद अनुभवता येत असे.

"मी तुझ्या पेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत " हि म्हण उगाचच प्रचलित नाही . निसर्गाच खरं रोद्र रूप पावसातच पाहायला मिळत. लहानपणी एक गोष्ट होती. ' कावळ्याच घर होतं शेणाच आणि चिमणीच घर होतं मेणाचं ' काय गम्मत होती नाही. अजूनही ती गोष्ट जशीच्या तशी आठवतेय. कोकणातल्या पूर्वीच्या जुन्या घरी कवलातून टीप टीपणाऱ्या पाण्याखाली टोपं लावताना आमची तारांबळ उडत असे. पण त्यातही एक वेगळी मजा होती. मातीच्या घरात जो ओलावा होता तो सध्याच्या सुखवस्तू घरात नाही. दिवस बदलले शेती करणारी लोकं हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच राहिलीत. पापड , लोणची, तिखट मसाले बाजारात रास्त दारात रेडी मेड मिळू लागले .आठला , साठे , उसऱ्या घालणं हळू हळू काल बाह्य झालंय. तसही पक्षी ,प्राणी वा माणसं सगळ्यांनाच या ऋतूत चार गोष्टी जमवायला लागतात. कारण पावसाळा पहिला असो वा दुसरा झोडपणाऱ्या पावसाच्या सरी मनात रंजी घालत असतानाच घोंघावणांर वादळ कधी सारं उध्वस्त करेल याचा अंदाज बांधता येत नाही.

© संतोष टाकळे

* फोटो प्रातिनिधिक स्वरूपाचा .

एन्जॉय Mango सिझन…………!





साहेब आंब्याची पेटी …………दारावर आलेल्या डिलिवर बॉय ने रसरशीत आंब्यांचे चित्र असलेला बॉक्स समोर धरला …………… पण आम्ही नाही मागवलेत ………. इतक्यात किचन मधून आवाज आला घ्या ती पेटी मीच ऑर्डर केलीय . ऑनलाईन शॉपिंग केलीय माझ्या नवीन क्रेडीट कार्ड ने ……… ३ हजाराचा बॉक्स चक्क २५०० ला मिळालाय. ………अग पण २५०० पण जास्तीच आहेत कि ……………तुम्ही ती पेटी आधी घ्या हो हिशोब कसला मांडताय ………. ऐकून चार सह्या केल्यावर आंबे माझ्या ताब्यात आले . वर ते डिलिवरी करणारं पोरगं म्हणालं सर एन्जॉय mango सिझन ……………… काय डोम्बल एन्जॉय करू अडीच हजाराचे आंबे ……………. एके काळी वृत्तपत्रात महिनाभर बातम्यांचा रतीब दिला कि तीन एक हजार मिळत तेही TDS चे १४० रुपये कापून ……………सरकारी नोकरी असलेली बायको असण्याचे फायदे पूर्वी ऐकले होते आज ते अनुभवता येतायत असे अनेक विचार मनात मोहरून येत असतानाच बाई पुन्हा उद्गारल्या अहो ऐकलत आज आमरस करू का हो ? केशर घालून …………….सोबत चार पुऱ्या करते खूप दिवस गोडाचा बेत नाही झालाय आज जमवतेच कशी ……………मी काय बोलणार त्या महागड्या रसरशीत आंब्यांचे चित्र असलेल्या बॉक्सकडे पाहत म्हटलं कर तुझी इच्छा असेल तर पण आधी आईला विचार फोन करून कस करावं नेमकं ती फर्मास बनवते आमरस …………स्मिता तुला आठवतय तू पहिल्यांदा आपल्या कोकणातल्या घरी आली होतीस तेंव्हा आईने आमरस पुरीचा घाट घातला होता . डीगीच्या माळवनातले आंबे उतरवले होते तेंव्हा त्यातल्या पिवळ्या धम्मक आंब्याचा रस काढून त्यात वेलची पूड आणि थोडसं जायफळ घालून केलेला तो आमरस आजही जिभेवर चव टिकवून आहे. तू केलेल्या खरपूस पुऱ्या पाहून आईन सून सुगरण मिळाली हो अस चार जणीत कवतुक मिरवलं होतं. मी पार एव्हाना कोकणातल्या चुलीकडल्या पडवीत पोहचलो होतो. आणि पुन्हा भानावर आलो ते स्मिताने कणिक भिजवायला समोर ठेवलेल्या परातीच्या खानकिणी आवाजान .

आई पुराण संपल असेल तर जरा एव्हड कणिक मळून द्या . तोवर मी मिसेस पाटीलना फोन करते त्यानी "mango pulp सामोसा" हि नवी रेसिपी इनोवेट केलीय संध्याकाळी चहासोबत करता येतील. ……………… साला एकदा लग्न झालं कि पुरुष माणसाच जगणं चूल मुल आणि जन्माची दिशाभूल असच रे बाबा . ……………तिकडे बाई टेरेस गार्डन च्या झुल्यावर झोका देत ……अय्या हो का ……. ह्म्म्म, ओह्ह्ह्ह्ह्ह्ह काय सांगताय काय ……… खरं आहे …………. हो ना …………. अहो म्हणून तर online मागवली पेटी . pure देवगडी हापूस आहेत हो म्हणजे त्यांनी तसं certificate दिलंय पेटी सोबत आणि ५०० रुपये discount मिळाला शिवाय फ्री home delivery……… . आणि हल्ली कोण जातंय बाजारात. काय ती गर्दी , उकाडा आणि तिथ जाऊन पण मेली बार्गेनिंग आलीच आणि हल्ली भय्ये हातोहात फसवतात हो . आमच्या ह्यांनी गेल्या वर्षी बाराशेला आणलेला हापूस नुसता आंबट ढांण होता . एक किलो साखर घातली तरी मेली चव आली नाही त्या आमरसाला ……………त्यांना साधे टोम्याटो निवडून आणता येत नाहीत ते आंबे आणणार म्हणजे पाटील वाहिनी तुम्ही कल्पनाच न केलेली बरी ह्हाहाहा ( बायकांना आपल्या नवऱ्याची अशी शोभा करतांना काय स्वर्गीय आनंद मिळतो कोण जाणे ) सो म्हणून आय order my mango this time online. बरं तुम्ही mango pulp सामोश्याची रेसिपी सांगतायना एक मिनिट हा ………………. अहो तो नोट प्याड आणि पेन घेऊन या ………. हम्म बोला हे घेतायत लिहून …साहित्य - मैदा २ वाट्या , साजूक तूप चार मोठे चमचे , आंब्याचा रस १ मोठी वाटी चवी पुरतं मीठ …………………. कृती - प्रथम मैदा ……………………………………. ओह thank you पाटील वाहिनी आज करतेच आणि कळवते कसे झाले होते. बरं ठेवू ………… ( बाई १ पाऊन तास झाला आवर आता ) माझ्या सारखे अनेक पुरुष लग्न झाल्यावर मनातल्या मनात बडबडण्याच्या रोगाला बळी पडतात. बाई पुन्हा ओरडल्या काय हो किती घाण अक्षरात लिहिलंय हे आणि चवी पुरतं पीठ नाही हो मीठ लिहायचं होतं सामोसे लालसर तळायचे असतात हो काळसर नाही हो कुणी केलं बुवा पत्रकार तुम्हाला त्यांची गाठ घालून द्याच एकदा ………….

२ एक तासांनी पान वाढलीयेत या आता आणि TV बंद करा आधी तो चोवीस तास त्याचं त्याच बातम्या डोकं गरगरत कस नाही तुमचं . तशी कितीही बडबड केली तरी स्मिताच्या हाताला चव आहे. पानात पुऱ्या आणि आमरसाची कठोकाठ भरलेली वाटी विशेष आकर्षण होती. मी सवयी प्रमाणे भाजी सोबत पुरी मोडली ………पुन्हा बाई पेटल्या अहो दोन तास खपून आमरस केलाय त्याचा घास घ्यायचा सोडून भाज्या कसल्या चाखताय . अगदीच कसे हो अरसिक तुम्ही तरी माझी मैत्रीण म्हणत होती. बातम्या देणारा नवरा नको करूस त्यांना फक्त शब्दात रस असतो. बाकी सगळचं अवांतर ………… तिची बडबड सुरूच होती. पण मला पुन्हा कोकणात चुलीकडच्या पडवीत जावसं वाटलं जिथे आई चुलीवर पुऱ्या करतेय . तळ गाठत आलेल्या आमरसाच्या टोपातला चमचा पुन्हा पुन्हा भरून माझ्या पानात वाढतीय. चागलं झालंय का रे घे ना अजून दोन पुऱ्या ……….रस टाकू अजून …………….पोट भर जेव रे ………तू येणार आहेस गावाला असा निरोप मिळाला आणि ह्यांनी आपला शेडी आंबा उतरवला ………बंडा अण्णा चढले होते झाडावर त्यांना जाताना चहापाण्याला दे तेव्हडे न विसरता . हल्ली ते येतात म्हणून कामं होतायत नाहीतर यांचा हात दुखावल्या पासून सगळंच अडलंय बाबा …………. उद्या फणसाची भाजी आणि कोकमाची कढी करू का रे आपल्या बरक्या फणसाच्या कुवऱ्याना भारी चव हाय. आता जेवलास कि पडवीत पड जरा उन्हातून फिरत बसू नकोस मग जा वाडीत संध्याकाळी ………… ताक करू घेशील ग्लास भर विरजण मोडून नवीन लावते आज. जेवून उठताना एक नजर आमरसाच्या टोपात उरलेल्या चमचाभर रासाकड गेल कि या किंचित रसात आई किती पुऱ्या मोडिल हा प्रश्न काळजात कुरकुरतो पण शेवटी तीच एक वाक्य अमाप सुख देत . तू पोटभर जेवलास ना माझा आत्मा तृप्त झाला बग …………………………अहो आमरस खाऊन झाला असेल तर उठा आता आणि ताट बेसिन मध्ये टाका सुवर्णा येईल इतक्यात तिचा खोळंबा नको तिला आपल्याकडे नेहमी लेट होतो म्हणून तिची कुरबुर चालू असते. मला अजून बरीच कामं पडलीयत संध्याकाळी "mango pulp सामोसा" करायचाय , सोसायटीच्या महिला मंडळाच्या पिकनिक संधर्भात मीटिंग आहे. आणि पार्लरची पण नेमकी आजचीच apportionment आहे . तुम्ही काय आता झोपा काढाल . बाईचा जन्मच मेला कामासाठी झालेला. आंब्याच्या सीझनमधली पहिली आंबापेटीचा फोटो टाका हो FB वर आणि मलाही tag करा माघाचच्या गडबडीत राहुन गेलं फोटो description मध्ये एन्जॉय mango सिझन लिहा.

© संतोष टाकळे
 


शांता आक्का ...........!




गावात पाटपाणी -साखरपुडा- लग्न - वा अगदी …सत्यनारायण असो हिची लगबग ठरलेली . अगदी भटजी काकांना पुजेच्या तयारीत लागणारं दही दुध हि स्वतः नेऊन देण्यापासून ते पहिल्या दोन मंगलाष्टका झाल्यात मुलीला आणा असा मांडावातला हुकुम येताच नव्या नवरीला घेवून काकू डोळे पुसत पायऱ्या उतरेल ……… कुठल्याही शुभ ठिकाणी काकू नाही अस फारच कमी वेळा घडत असेल . तिचा एक हाती शेकडो माणसांच्या जेवणाचा अंदाज, कितीही कमी पडलं तरी पुन्हा चूल पेटवायची जिद्द , शेजारी पजाऱ्याची पडती वेळ खंबीर पणे उचलून धरण्याची तयारी. लग्न घर कोणाचही असो यजमान पद आपसूक हिच्याकडे देण्याचा लोकांचा विश्वास अशी अत्यंत हव्शी उत्साही आणि तितकीच भावूक आमची हि काकू आम्हा सगळ्यांचा मोठा आधार ………… तुझ्या लग्नात भरल्या काठा पदराची साडी नेसून वरात गाजवीन म्हणणाऱ्या ह्या आमच्या लाडक्या काकूची कथा "अशी ती माणसं " या पुस्तकातून लवकरच तुमच्या समोर येयीलच .

© संतोष टाकळे

निरोपाचा तास …………. !



गेली ३ महिने प्रत्येक शुक्रवारी होणारा तास आज शेवटचा अस सकाळ पासून अनेकदा मनात येऊन गेलं का कुणास ठावूक पण खूप down फील होत होतं ………मुळात k c college journalism च्या क्लास रूम ची सवय आणि आमची जमलेली टीम दोन्ही गोष्टी एकत्र मोडणार होत्या. K.C म्यानेजमेंटच्या स्मिता मॅमचा गेल्या आठवड्यात आलेला कॉल आणि त्यांनी एकंदरीत lecture बद्द्ल व्यक्त केलेलं समाधान सोबत the end होणाऱ्या निरोपाच्या तासाची केलेली आठवण . times च्या रोहित गोळे ने केलेलं recommendation आणि मराठी आडनाव ऐकून तुम्ही नक्की इंग्लिश मध्ये शिकवू शकता का ? हा म्यानेजमेंटला पडलेला प्रश्न यातून पुढे सरकत तासावर तास होत गेले. काही ठिकाणी इगो , जास्तीचं ज्ञान आणि असे बरेचसे अडसर आलेच पण शो मस्ट गो ऑन म्हणत प्रयोग चालू राहिला हळूहळू मतभेत आणि दुरावे मिटत गेले. रिकामे बेंच भरत गेले.उत्साहाचं तापमान वाढत गेलं . अर्थात विसंवाद संपत होता. प्रोजेक्ट्स मधून अनेक गोष्टी नव्याने मलाही शिकता आल्या . वेळ भरभर निघून गेली आणि i have only 2 lectures in my hand so please let me know if there is anything missing in our syllabus अस जाहीर करताच . पोरं ओह्ह्ह नो ………म्हणत चुकचुकली ……….

तसाही अखेरचा टप्पा आलाच जवळ याची सूचक कल्पना देणारं वातावरण अधिक मळभ दाटून आणत होतं अशातच २१ मार्च आलाच संध्याकाळचे ५ वाजून गेले असतील .points काढ , notes मार्क कर , P. P. T वर एक नजर टाक, मागच्या तासाची उजळणी घेणारं to be point review , अवांतर काय सांगायचं त्याची टिपण काढा अशी नेहमी सारखी लगबग नव्हती कारण आज काही शिकवायचं नव्हतंच आज फक्त दंगा घालायचाय . कारण पोरांनी चक्क फेयर वेल पार्टी ठेवली होती. आदित्य ,राज ,स्नेहल , पूजा यांनी केलेलं surprise पार्टीच प्ल्यानिंग , सगळ्यांनी मिळून दिलेलं गिफ्ट आणि २ तासाची फ़ूल टू धम्माल ……………………फक्त १४ lecture's ची आमची ओळख आणि student सोबत झालेली मैत्री बघून ………… खूपदा सहप्राध्यापकांनी बजावलं सर मुलांशी इतकी मैत्री ठीक नाही. नाहीतर पोरं डोक्यावर बसतील . पण आपण लिमिट्स पाळले तर अस डोक्यावर बसणं वैगरे होत नाही आणि हा नुसता समज नाही तर स्वानुभव आहे . हे कित्तीक जणांना सांगत बसावं.

© संतोष

कोंन कहता है भगवंत होते नहीं ……………!





रविवार मोकळा ठेवा Social Impact. ग्रुपच्या म्हात्रेचा कॉल आला. कुठल्याशा बालसदनात विझिट आहे. ग्रुपच्या वतीनं inverter द्यायचा आहे. असं मोघम सांगत त्याने फोन ठेवलाही. या रविवारी अजून काही प्लान होते. पण त्या निमित्ताने सगळे भेटतील .यापूर्वीच्या काही विझिट मध्ये या सागळ्यांशी जिव्हाळा तयार झालाय .विजय काका , स्मिता काकी , मीनाक्षी मॅम , वसंत आजोबा, प्रकाश म्हात्रे , प्रणय पाटील , योगेश पाटील या वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र येऊन सुरु झालेला हा उपक्रम टाळणं अशक्य . लगोलग चार दिवसांनी रविवार आलाही सकाळी आज भेटतोय असा sms होता. घड्याळ पाहिलं ९ वाजायला आले होते. १२ ला भेटायचं म्हणजे आता आवरायला हवं घरी नेहमीप्रमाणे कुरबुर सुरु झाली. पण तरीही चहा - नाश्ता तयार होताच . वेळ सरकत होती. काटा १० च्या पुढे धावत होता. आता मात्र एक क्षण थांबून चालणार नाही. येतो म्हणत घर सोडलं आणि स्टेशन गाठलं . तोबा गर्दीतून मुसंडी मारून डब्यात शिरण्याचा स्टंट केला. दीड तासांनी अंबरनाथ आलं . प्रवास बोरिंग नव्हताच सोबत होती ती सहप्रवाश्यांची त्यांच्या नाना तऱ्हा पाहत तासभर रमत गेला.

म्हात्रेने दिलेल्या पत्यावर पोहचलो.बाहेर बालसदनाचा बोर्ड होता. मुलांचा आवाज कानावर पडला अर्थात कार्यक्रम कधीचाच सुरु झाला असावा. एका हॉल मध्ये ५ ते १२ वयोगटातली मुलं फळ्याकडे तोंड करून बसली होती. Social Impact. ग्रुपचे वसंत आजोबा मुलांना चित्रातल्या गंमती जमती दाखवत होते. संथेच्या ट्रस्टी आणि Social Impact. ग्रुपचे इतर मेंबर यांच्यासोबत ओळखी झाल्या. मुलं आजोबांच्या चित्रकलेच्या तासात गुंतली होती.दरम्यान इथ आलेल्या मुलांची माहिती मिळाली. काहींनी आपले आई - वडील पहिले नव्हते तर काही जण कुटुंब मोडलं म्हणून इथं आले होते.काहींना चक्क जन्मदात्याने रस्त्यावर सोडलं होतं. प्रत्येकाची व्यथा वेगळी ………………. नुसतं ऐकून डोळे पाणावले तर ज्यांनी भोगलंय त्यांनी किती सहन केलं असेल नुसती कल्पना केलेलीच बरी……………. पुन्हा एकवार ते सगळे ते बोलके चेहरे पहिले. त्यांच्या नजरेतला आशवाद स्पष्ट दिसत होता. 

आमची निघायची वेळ होत आली होती ………………. बाई म्हणाल्या जाता जाता आमच्या मुलांच भजन ऐकून जा पोरांनी सूर धरला एका मागोमाग भजनांनी लय पकडली आणि अखेरच्या भजनाच्या ओळी मात्र काळजात भिडल्या त्या होत्या …………"कोंन कहता है भगवंत होते नहीं "……………! 


- संतोष टाकळे

आकशवाणीच हे मुंबई केंद्र..............!

 आकशवाणीच हे मुंबई केंद्र आहे आपण ऐकत अहात सकाळच्या बातम्या आणि ठळक घडामोडी पुढील प्रमाणे …………… भारताची अणु करार करण्यास अखेर तयारी ……………… राज्यात हंगामी रोजगार योजना लागू करणार - मंत्रीमंडळाचा एकमतान निर्णय मंजूर ,जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर आणि महाराष्ट्रभर थंडीचा तडका कायम पारा अधिक खाली जाण्याचा हवामान खात्याचा इशारा.……………. आता बातम्या विस्तारानं …………………गावात एकेकाळी दिवसाची सुरवात रेडियोवरच्या या बातम्यांनी होत असे माजघरातला जगाशी संपर्क ठेवणारा हा ट्रांजिस्टर रेडियो ग्रामीण जगण्यातला अविभाज्य घटक होता. पावसाळा असो वा हिवाळा मुंबई केंद्राने प्रसारित केलेल्या बातमी पत्रात हवामान खात्याचा अंदाज त्या काळी अचूक निघत असे ………बरेचदा पावसाळी शाळेत दांडी मारण्या करिता वेध शाळेचा अतिरुष्टीचा इशारा पुरेसा असे……….रेडियो संधर्भात अशा अनेक आठवणी आहेत . 

आकाशवाणीच्या याच मुंबई केंद्रात एकदातरी जावं अशी खूप वर्षांची इच्छा आज पूर्ण झालीय . अस्मिता वाहिनीच्या "भेटीगाठी" या लोकप्रिय कार्यक्रमात अभय करंदीकर या मित्राने घेतलेली माझी "सोशल नेटवर्किंगच्या लाटेवरवरचा युथ " या विषयावरची मुलाखत आपण येत्या १९ मार्चला रात्री १० वाजता ऐकू शकाल . आपल्यापैकी बऱ्याच जणांचा यात संधर्भ येणार आहे. मुळात अभय ने विचारलेल्या काही क्लीन बोल्ड प्रश्नांना उत्तरं देताना आज कस लागला खरा सोबत तो काळ पुन्हा आठवणीत ताजा झाला. एकूणच धम्माल झालीये हि मुलाखत आपण नक्की ऐका आणि कळवा तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियाहि .

विशेष आभार - प्राजक्ता खेडेकर , अभय करंदीकर , आरती मॅम ,आणि तुम्ही सगळेच जिवलग मित्र. 



© संतोष टाकळे

मनस्पर्शी ……………!

सोशल नेटवर्कींग ने दिलेली प्रसिद्धी आणि समविचारी मित्र यांचा गोतावळा आता अधिक वाढतोय ……Mark Zuckerberg या अवलियाने उपलब्ध करून दिलेलं हे प्रभावी शस्त्र काय किमया करू शकतो याचा प्रत्यय एव्हाना तुम्हा आम्हा सर्वांना आलाच असेल .FB वर फावला वेळ जावा म्हणून येणारे अनेक जण आज वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होतायत . विचारांची तांत्रिक क्रांती घडते आहे . आणि आपण सगळेच याचे निर्माते आहोत हे विशेष .
फेसबुक वर आपण एकमेकांच्या सुख- दुखात मिसळून जातो . आणि यातून एक नवा मनस्पर्शी प्रवाह सुरु होतो . याचा स्वानुभव मी सध्या घेतोय . काही दिवसांपूर्वी ओळख झालेल्या सोलापूरच्या प्राध्यापक सुधीर देशमुख सरांनी स्वाक्षरात लिहिलेलं पत्र सोबत अच्युत गोडबोले यांच मुसाफिर आणि सलाम चाऊस यांचं यश शात्र हे पुस्तक पाठवून मला जाहीर झालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने माझं कवतुक केलंय ………. दापोलीतल्या घरी जेंव्हा हे पार्सल धडकल तेंव्हा बाबांचा फोन होता. विजापूरहून तुझ्यासाठी पार्सल आलंय तुला न विचारताच फोडून पहिल. दोन पुस्तकं आहेत आणि सोबत एक चिठ्ठी . चागलं लिहिलंय त्या माणसाने. अनपेक्षित होत हे सगळं माझ्यासाठी………… नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी या संभ्रमात आहे मी ………. पण तरीही या सगळ्याच श्रेय तुम्हा सर्वांना आहे. माझ्या पुरत्या लिहिलेल्या लिखाणाला तुम्ही स्वीकारलत, मी नोंदवलेल्या निषेधाच्या काफिलात तुम्ही सामील झालात . सतत काहीतरी लिहित असाव म्हणून तुम्ही तगादा लावत राहिलात . आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये एक प्रसिद्धीचं वलय तयार झालं . सो हे सगळं तुम्हीच दिलंय ते तुम्ही आणि मी असे पर्यंत टिकून राहावं ही सदिच्छा !!

© संतोष टाकळे

कर्मवीर दादांची आदिवासी आश्रमशाळा.........!




दापोली पासून २२ किलोमीटरवर असलेल्या असोंड सारख्या निसर्ग रम्य ठिकाणी या वर्षा अखेरच्या वीकचा शेवट झाला . मुंबईत गेली ६ महिने कार्यरत असलेल्या Social Commitment Team ने इथल्या आदिवासी आश्रम शाळेत नवीन वर्षांची सुरवात सामाजिक कार्याने केली. कुणाल कदम , प्रकाश म्हात्रे , दीपा चव्हाण , डॉ शिरीष घाडी , स्मिता पाटील , अक्षय दातार , रवींद्र गायकवाड या तरुणांचा यात सहभाग होता .विविध क्षेत्रात कार्यरत असलेलेली हि मंडळी एकत्र आली आणि त्यांनी इथल्या भटक्या विमुक्त आदिवासी मुलांसोबत रमली त्यांच्यात मिसळली आणि काही काळ इथल्या वातावरणात एकरूप झाली . टाळ्यांच्या कडकडाट करीत आमचं स्वागत करण्यात आलं मुलींनी स्वागत गीत म्हणत कार्यक्रमाची सुरमय सुरवात केली . तब्बल ३ तास आम्ही सगळे इथल्या मुलांसोबत होतो.कर्मवीर दादां इदाते यांनी उभ्या केलेल्या या आश्रमात दापोलीच्या खेड्या पाड्यातून आलेल्या आणि शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आहे. 

अतिशय खडतर डोंगरात दादांनी वसवलेल्या या विद्यासंकुलात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थानी श्रमदानातून इथे तब्बल १०० काजू ,५० एक चिकू ,नारळ, आंबा अशी फळबाग तर २०० एक शे झाडाचं मेडीसीन गार्डन तयार केलं आहे. एक कुटुंब असणारं हि आश्रमशाळा अविरत चालू असली तरी ती सक्षमपणे चालवणं तितकंसं सोपं नाहि. लाखाच्या घरात जाणारा वार्षिक खर्च आणि तुटपुंज मिळणारं सरकारी अनुदान सगळंच अलबेल आहे. पण काही समाजसेवी हितचिंतक मंडळी पडती वेळ निभावून नेतात आणि पुन्हा नवी सुरवात करून देतात.

रस्त्यावर काम करणाऱ्या लामांनी समाजाच्या भटकणाऱ्या मुलांनी इथ शिक्षणाचा श्रीगणेशा सुरु केलाय. मुळची निपानीची कोमल या आश्रम शाळेत आली आणि तिचं वणवण भटकणं थांबलं . रस्त्यावर दिवसभर खेळणाऱ्या मुलांना फळ्यावरची अक्षरं खुणावू लागली आणि जी कोमल नीटशी मराठी बोलू शकत नव्हती तीच आज मराठीच्या पहिली इयत्तेच्या सगळ्या कविता एका दमात म्हणते . तिच्या आयुष्यात उगवलेली हि नवी पहाट अशा अनेकांच्या आयुष्यात उजाडू शकते गरज आहे . ती तुमच्या आमच्या पाठबळाची 

आपण केव्हाही या आश्रमशाळेला भेट देवू शकता इथल्या परिसरात तुम्हाला एक वेगळंपण दिसेल मला खात्री आहे तुमच्या एका भेटी नंतर तुम्ही या प्रकल्पात सहभागी व्हाल .नुसतं सर्वशिक्षा अभियान किवा पढेगा इंडिया तोही बढेगा इंडिया म्हणून भागणार नाहि तर आपलं योगदान इथे अपेक्षित आहे.

Social Commitment Team ने मदतीचा हात पुढे केलाय.आपणा सर्वांच सहकार्य अपेक्षित आहे. तुम्हाला शक्य असल्यास जरूर मदत करा .


अधिक माहिती आणि तुमच्या मदतीचा धनादेश किंवा online transfer साठी संपर्क

डॉ शिरीष घाडी /प्रकाश म्हात्रे / संतोष टाकळे 

9930051552/ 9819101186/9167694922