सुमारे १० एक वर्षांपूर्वीची गोष्ट दुपारच्या मध्यानं प्रहरी टाळ मृदुंगाचा गजर कानावर पडला आणि इतक्या भर उन्हात रस्त्याने नेमकं काय निघालय हे बघायला लोकांची गर्दी अंगणात कुंपणाच्या कोपऱ्यावर जमली . तब्बल ५० एक जणांचा ताफा पुढे चाललेल्या तीन माणसांच्या हातात सोनेरी फ्रेम असलेले फोटो दोन माणसांचे एक बाईचा तिघंही राजबिंड वर्णाची त्या फोटोतल्या बाईंच्या अंगावर भरजरी साडी ,नाकात थोरली नथ , ओठाला भडक लाल रंगाची लिपस्टिक , कपाळावर चंद्र कोर, केसात गजरे आणि गळ्यात ठसठशीत दागिने , मधला फोटो विरप्पन सारख्या मिश्या असणाऱ्या माणसाचा त्याच्या मागे रुद्र अवतारातला हनुमान पुढे हा सलमान स्टाईल पोज देत उभा असलेला,मागून दिव्य प्रकाश वैगरे दाखवलेला , आणि शेवटच्या फोटोत एक गोंडस प्रसन्नं चेहरा असलेला मध्यम वयीन माणूस त्याच्याही मिश्या थोड्या वळणदार आणि एक मध्यम वयीन त्याच्या एकंदरीत लुकला बघून त्याच्याकडे दिव्य शक्तीचा आभाव असल्याचं जाणवत होतं . या तिन्ही तस्बीरींना वरून केशरी चंदनाचा नाम लावलेला , मंद वासाच्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा हार घातलेला शिवाय वर वेल्वेटच्या नक्षीदार शालीच उपरणं त्या काळच्या वैरागी बाबांच्या जमान्यात अशा आय कॅन्डी धार्मिक गुरूंच्या ओजस्वी दर्शनाने रस्त्याच्या दुतर्फा जमलेले लोक हात जोडत होते . कुणी त्या ओळींन चाललेल्या भक्तांना निरखुन न्याहळत होत . तर कुणी कोण ही नवी महाराजी फ्यामीली अशा संभ्रमात पडलेला तस अजुन विशेष आकर्षण म्हणजे या ताफ्यातल्या बऱ्याच जणी निट्सर साड्या नेसलेल्या फोटोतल्या त्या गुरु बाईंशी काहीसं मिळतं जुळतं म्हणजे लिपस्टिक , कपाळावर चंद्र कोर, केसात गजरे आणि गळ्यातले ठसठशीत दागिने वैगरे वैगरे , पुरुष मंडळीही अगदी निट नेटकी उंची कुर्ते घातलेले वैगरे ……………१५ एक मिनिटांत हा ताफा पुढे सरकता झाला. पण अनिरुद्ध म्हणा अनिरुद्ध म्हणा दुखी:तांचे दुखं: तोच हारी ………अशा मंत्र घोषाच्या नामस्मरणाने अवघा माहोल अध्यात्मिक झाला . आणि या नव्या महाराजांच्या चमत्कारांच्या आणि त्यांच्या लीलेच्या भाकड कथांना उत आला . बायका काय बाय चढवत अधिक रंगवत चर्चेत उत्सुकता आणीत होत्या शिवाय ज्यांच्या घरी ह्या बापूंच्या, त्यांच्या गुरुपत्नीच्या आणि गुरुबंधुच्या तस्वीरी आल्या होत्या ते गावातले तसे प्रतिष्ठित सदगृहस्त म्हणजे सहाजिकच विश्वास अधिक दृढ होणार यात शंकाच नाही.
पुढे हा सत्संग ४ दिवस चालला गावातले अनेक सामान्य आणि नामवंत लोकांची दर्शनाला रीघ लागली . यजमानांनी येणाऱ्या प्रत्येकाला चहा ,नाश्ता, आरतीच्या वेळी विशेष प्रसाद म्हणून साजूक तुपातल्या शिऱ्याच्या पुड्या , विभूती , गुरुजनांचे पूजेला लावता येतील असे दिव्यप्रकाश रहित फोटो , त्यांची महती प्रकट करणारे चालीसा , मंत्रांची पुस्तके असं compact रिटन गिफ्ट म्हणून दिलं .जे गावात अनेकांनी देवघरी प्रतिष्ठपिठ केल्याचं आठवणीत आहे ...... त्यातल्या त्यात इथ येणाऱ्या आणि अगदीच खास असणाऱ्या VVIP पुरुष दर्शनार्थीला बापूं -माई- दादांच्या फोटो समोरचा नारळ , हार , फळ, शेला किंवा महिला VVIP नां माईंना घातलेला गजरा- वेणी वैगरे देत त्यांना उत्सवपीठाधीन यजमान आणि त्यांच्या सौ कृतकृत्य करतांना आमच्या सारख्या अतिसामान्य भक्तांच्या नजरेत हे आपल्या नशिबी का नाही? याची खंत प्रखरपणे जाणवत असे. बर शिवाय यात प्रशासकीय , शैक्षणिक, वैद्यकीय , राजकीय क्षेत्रात बहुचर्चित असणऱ्या व्यक्ती असल्याने कुतूहल अधिक जास्ती शिगेला पोहचणारं .
एकुण चार दिवसांचा सत्संग , भजन ,आरत्या , नामस्मरण अशा अती भारावलेल्या या अध्यात्मिक उत्सवाला रोज भरगोस गर्दी करणारे अनोळखी चेहरे हळूहळू ओळखीचे होतात मग त्याची गट्टी जमते पुढे ते बापू -माई भक्त म्हणून सदमार्गी होतात . आणि तस्बीरीं आणताना असणारा ५० जणांचा ताफा आता २०० च्या वर संख्याबळ गाठतो . शिवाय इथ येणाऱ्या कुणाकुणाचे किती प्रॉब्लेम या नव्या ओळखीच्या माध्यमातून मार्गी लागतात. आता सामान्य बापू भक्ताच्या मदतीला सिस्टीम मधला बापू भक्त उभा राहिला म्हटल्यावर आणिक काय हवे . भक्तीच्या या प्रवाहात अनेक नवे चेहरे येत राहतात त्याचंही कल्याण होत राहतं पुढे भक्तीच्या या गर्दीत हळू हळू कमर्शियल गोष्टींचा शिरकाव होतो मग त्यात एकरोंच्या परिसरात पसरलेले आश्रम , बापू माई यांच होम प्रोडक्शन असलेली पुस्तकं , पोथ्यां , सोन्या चांदित मडवलेले लॉकेट्स,अगदी दंतमंजना पासून ते अंगाच्या साबणा पर्यंतची दुकानदारी भक्तानां लुटण्याचा व्यवसाय सुरु करतात याचं रीतसर कंत्राट काही खास लाल गाळू भक्तांच्या पदरी पडतं आणि पैशाचा ओघ बाबा मातेंच्या दिशेने वळता होतो . सोबत हजारोंच्या बोलीत होणाऱ्या पादपूजा , महारुद्र अभिषेक , चंडीयज्ञ आणि आता राधे माँ च्या जनरेशन मधे पप्पी, झप्पी , गोदीत घेणं फ़िल्मी गाण्यांवर नाचण खिदळणं वैगरे वैगरे .
आक्षेप असा कि पैशाचा पाऊस पाडणारा हा धंदा जेंव्हा राजरोसपणे चालू असतो तेंव्हा नेमकी आपली यंत्रणा काय करीत असते . राधे माँ , आसाराम , नित्यानंदा या भोदुंच्या मुसक्या आवळणे आपल्याला आधी का शक्य झाले नाही. हा कसला भक्तिचा बाजार भरलाय त्याची चौकशी का केली जात नाही. वा आताही त्यांच्यावर कार्यवाई करण्या करिता इतका विलंब का लागतोय? याचं कारण भारतात चमत्काराला तत्काळ नमस्कार करणाऱ्या मूर्ख लोकांच लाक्षणिक संख्याबळ आहे . त्यांच्या धार्मिक भावना लागलीच दुखावल्या जातात . कहर म्हणजे काहीजण तर बाबा -माता -गुरुमाँ यांच्या आश्रमाबाहेर सशत्र त्यांच्या बचावार्थ मार्शल च्या रोल मधे उभे ठाकतात हमारी जान लेलो लेकिन हम आपको बापू को हात लगाने नाही देंगे इतक्या आवेषांत यांची भक्ती उफाळून येते हे आपण या पूर्वीही पहिलच आहे ………………पण तरीही आपण मात्र नेहमी प्रमाणे प्रशासनाच्या नावाने शिमगा करीत बसतो पण खरतर त्यापेक्षा आपल्या मानसिकतेच्या बुरसटलेपणावर थोडा विचार केला तर . आपल्याला नेमकं उत्तर सापडेल. नाहीतर आता फ़ोर्स ने चालू असलेल्या मेजर ब्रेकिंगस् मग पुढे थोडक्यात बातम्या झाल्या कि लोक हा प्रकार विसरणार हे ज्यांना माहित आहे त्यांचे बाजारू दरबार यापुढेही खुले होत राहतीलच आपल्या भारतीय डोळेझाकू भक्तांच्या कल्याणार्थ.
© संतोष टाकळे .
Note - वरील लेखाने कुणाच्याही अध्यात्मिक भावना दुखावल्या असतील तर त्यांनी तात्काळ क्षमासहत्र मंत्र किमान १० वेळा म्हणावा राग तर शांत होईलच आणि मनही प्रसन्नं होईल यात शंकाच नाही.

Dear Admin, pls check following link..
ReplyDeletehttp://aniruddha-bapu-my-sadguru.blogspot.in/2012/08/about-shree-aniruddha-upasana-foundation.html
राग तर शांत होईलच आणि मनही प्रसन्नं होईल यात शंकाच नाही
आत्ताच तुमचा ब्लॉग वाचला आणि थक्क झालो . यावर काही बोलण्याची माझी कुवतच नसल्याचं जाणवलं एकंदरीत काय जे इतर ठिकाणी घडतंय ते इथेही चालू आहे . चार सामजिक कामं करून थोतांड लपवू शकत नाही . इतकंच कि हे सगळं आंधळ्या श्रद्धेपाई होतय बाकी प्रतिक्रिया द्यायला उशीर झाल्याबाबत क्षमस्व
ReplyDelete