पुस्तकांच देणं ..........!
दापोलीत असतांना माधव काकाने वाचनाची आवड लावली …त्यानं त्याच्या शेल्फ मधून दिलेलं पाहिलं पुस्तक होतं वीणा गवाणकरांनी अनुवादित केलेलं "एक होता कार्व्हर" ……फक्त दोन दिवसात अख्खं वाचून झालं कार्व्हरच्या लढवय्या जगण्याची जिद्ध कायम मनात घर करून राहिली . तसही माधव काका ( जेष्ठ लेखक माधव गवाणकर ) स्वतः लेखक आहे त्याने कार्व्हर हातात देताना काहीतरी नक्की ठरवून दिलं असणार . अर्थात त्याच्याकडे पुस्तकांचा खजिनाच होता म्हणजे आजही आहे . कार्व्हरनंतर दोन दिवसाआड नवीन पुस्तक असा नित्यक्रम सुरु झाला
काकाच्या संग्रही असलेले कितेक लेखक वाचून झाले . आणि लिखाणाच्या उत्तमोत्तम शैली डोक्यात उतरू लागल्या …………काका हे बघ यात ह्या लेखकाने हा प्रसंग कसला भन्नाट रंगवलाय …काल्पनिक लिहितांना फ्लो कसा हवा रे ………हा शब्द नेमका कोणत्या अर्थाने इथे आलाय वैगरे वैगरेची विस्तृत चर्चा अवंतिकाच्या बाल्कनीत तासन तास होत असे . तब्बल ६ महिने वाचन -विवेचन आणि मग काकाने मला लिहिण्याची परवानगी दिली . आणि लिखाणाला सुरुवात झाली. व्याकरणाच्या चुका ………विषय मांडणी यावर अनेकदा काकाने माझे कान पिळलेत पण हळूहळू कागदावर जे उमटलं ते काकाला आणि इतरानाही भावलं शिवाय त्याला काकाने त्याच्या "साद" या नियतकालीकात .प्रसिद्धीहि दिली. करियर मधला तो पहिला कॉलम काकाच्या संपादनात सुरु झाला. कोकणातल्या दापोली सारख्या इतकुशा गावातून प्रकाशीत होणार हे नियत कालिक पोस्टाने महाराष्ट्रभर जात होत.हळूहळू प्रतिसाद म्हणून वाचकांची पत्र आली . त्यात नावासमोर लेखक वैगरे लिहिलेलं पाहतांना भारी वाटू लागलं . इतरांचं वाचता वाचता स्वतःच लिहण्याची ती अनोखी किमया पुस्तकांनीच केली .
"अर्थात लिखाण हे मला पुस्तकांनी दिलेलं अनमोल देणं आहे "
नाहीतर आमच्या सारख्या गावठाणात शब्दांची तोंड ओळखच पुरेशी होती.
#जागतिक #ग्रंथदिन
No comments:
Post a Comment