उन्हाचा कडाका वाढला कि होळी जवळ आली असा कोकणातल्या माणसांचा अंदाज गावातल्या होळीवर आम्ही पोरं तेव्हा जमायचो पहिल्या होळीला कोकणात शेवरीच्या झाडाला मान आहे .होळी खणून झाली कि शीत ( होळीच्या मधोमध ज्या झाडाची पूजा करून उभं केलं जातं त्याला कोकणात शीत म्हणतात ) आणायची लगबग सुरु व्हायची कुणाच्या परसावात न फुललेली शेवरी आहे याची शोधा शोध करताना फार मजा येई धमाल नुसती. तेव्हा मी दापोलीत होतो. वर्षभरातले हे सर्वात उत्साह वर्धक दिवस रोज होळीसाठी लाकड गोळा करत गाव भर आम्ही पोरं फिरत असू
हि लाकड जमवताना एक विशेष गाणं आम्ही म्हणत असू
हळकुंड सलकुंड सदा शिवा
होळीला केंबरा कुणी द्यावा
नाय देल त्याची चोरी करा
आयना च्या बैयाना
घेतल्या शिवाय जायना
( असंच काहिसं ते गाणं होतं )
शिमग्याचा प्रत्येक दिवस खास असायचा शाळेतून आलो कि दप्तर टाकून थेट होळीवर पळत सुटायचं अंगात शाळेचे कपडे तसेच . होळीवर आलेल्या गवतावर उड्या मारताना तर मी किती वेळा पडलोय रक्तबंबाळ होवून घरी आलो कि बाबा वर अजून दोन तडाके द्यायचे पण शिमगा खास होता आणि आजही आहे . वर्षांनी देव घरी येतो या सणाला अशी समजूत आहे. पालखीतून मिरवत गाव देव जेव्हा आपल्या दारात येतो तेव्हा आनंदाला उधान येतो . ढोल ताशे बडवत खेळी वेडा होतो. धुपारती घेवून गुरव पालखीच्या सोमर फेर धरतो काही बाया वाडायला लागतात. दह्या दुधाच्या पवित्र अमृताते देवाचे पाय धुतले जातात , सुवासिन तिच्या पदराने देवाचे पाय पुसते पंचारती घेवून घरची मालकीण देवाची आरती करून स्वागत करते. रंगीत रांगोळीचा सडा पडलेला असतो पण देव मात्र खरखरीत घोंगडीवर बसतो. पालखी खाली बसवतांना पुन्हा खेळी गजर करतात आणि वाजंत्री शांत होतात. पाण्याचे तांबे मांडवात फिरतात खेळी घटा घटा पाणी पितात खांद्यावरचा ढोल खाली उतरवतात आणि मांडवाच्या खांबाला टेकून जरा लांब होतात. इकडे देव बसून विसंत घेतोय न घेतोय तोच ओट्या भरण्यासाठी बायकांची झुंबड लागते. गुरव पुन्हा एकदा धूप करतो देवाचा गजर करीत मानकऱ्याच्या बायकोला पहिला मान देतो. डोक्यावरचा पदर सावरत मानकऱ्याची बायको गर्दीतून वाट काढत पालखीच्या दिशेने येताना दिसते. गळ्यातल्या चार पदरी मंगळसुत्राने तिची श्रीमंती झळकत असते गुरवाला १ ० ० रुपयाची कोरी नोट देत मानकरी गाऱ्हाणे घालायला सांगतो आणि गुरव त्याच्या चढ्या आवाजात हे देवा भैरी महाराजा म्हणत मानकऱ्याच्या नावाने देवाला convenes करतो. …
एव्हाना बायांची लगबग कमी झालेली पोर मधेच ताश्यावर एकादी डाव मारतात . मांडवात गावकरी शेत- भाता पासून ते अगदी राजकारणातल्या गप्पा गोष्टीत रमलेले त्यातच एकदा मुंबईचा चाकरमनी त्याच्या मोबाईल वर फेसबुक चे update पाहण्यात रमलेला गाव कुठे का जाईना आपली मुंबई आहे ना जागेवर मग झालं . त्याच्या कडक इस्त्रीच्या कपड्यामुळे आणि सुगंधित अत्तराच्या वासाने तो मांडवात अधिक भडक पणे उठून दिसत असतो. देव जागेवरून उठवायला एक थाप तमाशा होऊदे कुणी तरी पै पाहुण्यापैकी आग्रह करतो. खेळ्यांचा मेन मानकरी ढोलकी वर थाप मारतो आणि बाईच्या वेशातला १ ० - १ २ वर्षाच पोर पायाला हिसके देत नाद नका करू सोडा पदराचा काट …. अशी अडवू नका वाट … भावोजी नका धरू हात या गाण्यावर ताल धरत त्या पोराची पावलं थिरकत असतात. आणि तासभर हा तमाशा चालतो …
देव उठवायचा हुकुम मानकरी देतो . खेळी उठतात खिशातून तंबाकू काढून हातावर चांगल मळून एक बार तोंडात टाकतात आणि ढोल ताशे पुन्हा गळ्यात अडकवतात . गुरव पण तयारीला लागतो देवाच्या पालखीत जमलेले पैसे नारळ काढले जातात पुन्हा धूप घालून गाऱ्हाण घातलं जातं मानकरी पालखी उचलतो आणि अंगणात येतो . देव परत जायच्या आधी आपल्या दारात देव नाचला पाहिजे म्हणून मानकरी पालखी खांद्यावर घेतो. ताशे बडवले जातात आणि ठेक्यात पालखी घुमते ….
अंगणात तांदूळ , फुलं आणि अंगाऱ्याची उधळण होते . खेळी पालखी आपल्या ताब्यात घेतात आणि देव पुन्हा त्याचा मार्गाला लागतो. दूर दूर त्याचा ढोल घुमत असतो . पुढच्या वर्षी पुन्हा येतो मानाने म्हणत खेळी आणि पालखी हळू हळू दिसेनाशी होते . ढोल ताशे हवेत विरून जातात चाकरमनी कपडे गुंडाळतो आणि पुन्हा मुंबईच्या एस टीत बसतो . टीचभर पोटा साठी घरदार सोडून पुन्हा या गर्दीत पैसा शोधायचाय या विचारत त्याला झोप लागते आणि सकाळी पहाटे मास्तर सायन , दादर अशी हाक मारतो आणि जाग येते ….
- संतोष टाकळे

No comments:
Post a Comment