काल मातोश्री वृद्धाश्रमातून निघताना ज्या गाण्याच्या ओळी सहज मनात आल्या त्या ……
रूठ के हमसे कभी जब चले जावोगे तुम
ये न सोचा था कभी इतना याद आवोगे तुम ......
चहरे जितक्या प्रभावी बोलतात . ते समजून घ्यायची शक्ति मात्र अपुरी अणि मर्यादित आहे. जे काल प्रकर्षानं जाणवलं , मोह - माया- ममता यांची भूक अनुभवतांना जगणं किती अदभूत आहे याची प्रचीती आली. मातोश्रीच्या प्रांगणात हिरवळीवर सांडलेले पाण्याचे थेंब जितक्या अनिश्चित स्वरूपाचे आहेत. तसंच काहीसं इथल्या हर्षील जगण्याचं आहे. मऊशार गादीवर अंग टाकल्यावर घरी जशी निवांत झोप लागते तशी ग्लानी मात्र इथ येत नाही. सतत भिरभिरणाऱ्या नजरा कुणाच्या तरी शोधात असतात , लोकरीचं विणकाम करणारे हात झटापट चालत असले तरी मनाची विरहाची झुंज मात्र निवांत एकाकी लढत असते कुठल्याही शत्रा शिवाय….
बांगड्या जुन्या झाल्या लेका कासारीन येणार आहे आज चांगल्या डझनभर भरीन म्हणते डाळींबी रंगाच्या………. ,हल्ली होत नाही माझ्याने नाहीतर तुला छानसा रुमाल विणून दिला असता मी अगदी एका तासात …………. , आम्ही सकाळी योगा करतो ते पण डॉट ६ च्या ठोक्याला बाई खूप चंगल्या आहेत आमच्या ………. , .ती कोपऱ्यावरची रूम आहे ना ती आमची तुम्ही जेऊन घ्या आधी आणि मग या गप्पा मारू तेव्हडच मन मोकळं करता येईल ग … , चार महिने झाले काका जाऊन आता मी एकटीच आहे पण हि आहेत ना माझी माणसं यांनीच केलं हो माझं सगळं दुसरं माहेरच आहे हे माझं ( पदराचा कोपरा थोडा ओला झालाच आपसूक ) ,………… मी सरकारी नोकरीत क्लास वन ऑफिसर होतो. मुलं परदेशात असतात मी इथं रमलोय अगदी मजेत जगतोय ………, असे अनेक सवांद मनात गुंतून राहिलेत तेही कायमचे …
वसंत आजोबा म्हणतात तस आपण लोकांची दुःख उगाळीत बसण्यापेक्षा आनंद वाढवयाला हवा . मातोश्रीच्या या भेटीत भावनिक झालरीच्या किनारीत आनंदाचा मोर काही वेळ नाचून गेलाच लक्ष्मी आजीची शेरो शायरी , शहा आजोबांनी गंमती जमती सांगत पाजलेला ग्लास भर चहा , मंदा आजीने गायलेल थरथरत्या पण लयबद्ध स्वरातलं " हर किसीका नसीब " हे गाणं …… पुन्हा या हा होणारा ह्रिदयपर्शि आग्रह आणि उद्या ऑफिसला जायचंय या वास्तविकतेने पुन्हा भानावर आलेलो आम्ही सगळेजण.
कदाचित इथं आलेलो आम्ही मातोश्री आश्रमच्या शेजारून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाह प्रमाणे आहोत ज्या घाटावर गोतावळा दिसेल तिथं थोडं संथ व्हावं आपल्या जाण्यातला गारवा त्यांनाही द्यावा आणि नियती प्रमाणे पुढे प्रवाहित होत राहावं कारण …
आयुष्य तेच आहे
अन हाच पेच आहे ............
- संतोष टाकळे

No comments:
Post a Comment