कुंपणाशी सेटिंग ….





आमच्या कोकणात कुंपणावर भांडणं होतात . अगदी जबरी या भांडणात असतील नसतील ती लफडी बाहेर पडतात. खालच्या अंगाला संबोधून शिव्या , एकीमेकीच्या खानदानाचा उद्धार, आणि फारच टोकाचा वाद असेल तर झिंज्या उपटायला आम्ही कमी करत नाही. आजचा विषय आहे तो सेटिंग वाल्या विरोधी पक्षाचा कोण जाणे हि मंडळी नेमकी काय करतात. काल वृत्त वाहिन्यांच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये नीलम ताई , विनोद दादा , आणि अन्य गण डोक्यावर हंडा घेवून पोज देतांना दिसले. सोबतचे काही मित्र पक्ष तिकडे राज्यपालांना अडवत होते. म्हणे आम्ही निषेद करतोय या दुष्काळाचा पण मुळात आपण सगळेच या परिस्थितीला जबादार आहोत. मतदानासाठी साड्या चोळ्या  , पावशेर -खंबा , बिर्याणी  आणि माणसी २ ० ० रुपये घेताना. आपण केला होता का विचार मग आता विधानसभेच्या थंडगार ए सी मध्ये बसून या नेत्यांनी आपल्याला दात दाखवले तर आपण काय म्हणून हात दाखवणार 
तशी आपल्या हाताला मतदान करून शाई लावे पर्यंततच किमंत आहे नाही का ? आपण आपली लायकी फक्त २ ० ० रुपयाला विकली आणि म्हणून आज राजकीय पक्ष त्यांची हिशोबाची बांधिलकी दाखवता आहेत . 


विरोधी पक्ष … 

गाजलेला विरोधी पक्ष नेता कोण हो ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी खूप मागे जावून तपासायला लागेल. कारण सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांवर सेटिंगचे आरोप केले जाता आहेत.  आणि ज्या पद्धतीने मागच्या काही वर्षांपासून सभागुहात कामकाज चाललंय त्यावरून हे कदाचित खरं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सभागुहात एखादा विषय गाजला कि त्याची ब्रेकिंग न्यूज आणि विशेष कार्यक्रमांचा हैदोस  सुरु होतो.  पत्रकार विधान भवना बाहेर बूम घेवून कोकलतात  वृत्तवाहिन्यांच्या चर्चा सत्रात तर पाहुणे खुर्ची  वरून हात वारे करत काय वाटेल ते आरोप लावतात . पण हे सगळं त्या दिवाळीतल्या फटाक्यांसारख आहे . नुसत काही क्षण तुडतुड करणाऱ्या लवंगी मिरचीच्या माळी सारखं चर्चा संपली कि दुसऱ्या दिवशी दुसरा विषय बरं वरून सागितलं जातं पाहायला विसरू नका पण नेमकं काय ? पाहावं आम्ही दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातलं खारट पाणी कि विधान भवना बाहेर हंडा घेवून मिडिया समोर मिरवणाऱ्या नेत्यांची  नाच गाणी  विरोधी पक्ष म्हणून काय केलंत खडसे साहेब याचा एकदा लोकांना अहवाल सांगाच.  कारण तुमच्याच पक्षाच्या नेत्यांना जेंव्हा आम्ही जाब विचारतो तेंव्हा त्याचं कॉमन उत्तर ठरलेल अहो सत्ता नाही आमच्याकडे आम्ही तरी काय करणार . मान्य करतो तुमच्या हातात सत्ता नाही. पण विरोधी पक्ष नेते पद तुमच्या पदरात असतांनाहि  तुम्ही काहीच करणार नसाल तर सत्ता देवून काय करू शकाल यावर सविस्तर विचार करावा लागेल. 

उट  सूट मिडिया समोर निदर्शनं करायची आणि दुसऱ्या दिवशीच्या पेपरात पहिल्या पानावर फोटो छापून आणायचा.  हे किती दिवस चालणार . विरोधी पक्षातल्या एका जेष्ठ नेत्याचा काल बाईट होता. ते म्हणाले लोकांना कळतंय त्यांचे प्रश्न काय आहेत आणि ते कोण सोडवणार तेही आता बोला.  अहो आम्हाला कळतंय कोण काय करील ते पण निदान आता तरी कामाला लागाल कि नाही . नुसत्या तलवारी फैलावून राज्य आणता येत नाही त्यासाठी त्या तलवारीची धार जाई तोवर लढावं लागतं. आणि ते महाराजांनाच जमलं आपलं काम नाही ते आपण फक्त चार आण्याच काम करणार आणि १ रुपयाचा ब्यानर लावून ओरडून सांगणार आम्ही करून दाखवलं , सनकून उठणारा, लोकांचे प्रश्न लावून धरणारा आणि सत्ताधारी पक्षाला सळो कि पळो करणारा महाराष्ट्रात एकही लढवय्या नेता नाही.  कमाल आहे बाबा अहो म्हणून तर आपण मुख्यमंत्री आयात केला. 


कुणाशी कुणाच नातं … 

आमच्या भास्कर रावांच्या घरच्या लग्नात झाडून सगळे नेते हजार होते . आणि बिचारे दादा वादात अडकले तेंव्हा यातलेच काही नेते मिडिया समोर येवून म्हणाले साहेबांनी  भास्कर जाधवांना पक्षातून काढून टाकावं काय रे काल याच दादांना मिट्या मारत फुलगुच्या देतांना आणि भाराभर पदार्थ मिटक्या मारून खाताना नाही आठवलं का आपण कुठे आहोत ते. आम्ही कोकणातली माणसं पाहुण्याला पोटभर जेवायला वाढतो अगदी पाव्हणा जमिनीला हात टेकून उठे पर्यंत पण हाच पाव्हणा जेव्हा खाल्या मिठाला आव्हान देतो तेव्हा मात्र आम्ही त्याची काही बाकी ठेवत नाही. मुद्दा आहे तो एका ताटात जेवून आम्ही त्यातले नाहीच असा कांगावा करणारे महाभाग मिडीयाच्या माध्यमातून बेताल वचवच करता आहेत. त्यांना थांबवायलाच हवं कृपा भैया आणि त्याचं प्रकरण इतक्या थंड गतीने का ? चालू आहे. कारण कृपा भैयाने आपली कृपा उघड केली तर किती लोक नागवे होतील याची कल्पनाच करणं अशक्य आहे . तरीही कृपा भैया गंगा  नाहायके सध्या बिनधास सार्वजनिक कार्यक्रमात वावरतात ते वेगळंच … 

सगळ्यांशी सगळ्यांचे कित्ती चांगले संबंध आहेत. हे एकदा घोटाळा उघड झाल्या शिवाय सोमर येत नाहीत. पुर्ती ची कीर्ती गडकरी काकांना थेट दिल्लीत भोवली, सासू बाईचं ऐकल्यावर काय होतं याचा आदर्श अशोक रावांनी घालून दिलाय. अशी बरीच उदाहरणं आहेत सवडीनं यावर बोलू पुन्हा ...


पक्ष प्रमुखांचा रिमोट 

रिमोट कन्ट्रोल ने पक्ष चालवणाऱ्या पक्ष प्रमुखांनी आता जरा रिमोट मधली  battery  चेंज करायला हवी. त्यांच्या नाका खाली काय चाललं आहे  हे थोडं झूम करून पाहायला सुरवात केली पाहिजे. नुसतं गडावरून आदेश द्यायचा जमाना गेला. पूर्वी गडाच्या दोन तोफा वाजल्या कि मावळा घोड्यावर टाप मारून सुसाट निघायचा आताच्या मावळ्यांना १ ० कॉल कले कि झोपेतून उठतो.  


राजकारणात जेंव्हा पासून पैसा नाचायला लागला तेव्हा पासून नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पक्षावरची निष्ठा कमर्शियल झाली. ऑफर , प्याकेज, सेटिंग , फिल्डिंग , तोड , बडा माल ,  भाव , ४ पेटी , फंडिंग , ज्याक , पावर , वजन आणि असे कित्तेक नवे शब्द आणि नवे धंदे राजकारणात  सुरु झाले. लोकांनी लोकांसाठी असणाऱ्या लोकशाहीच्या भरल्या शेतात हे कोल्हे - लांडगे शिरले कुठून याचा तपास कशाला हवा अहो यांनी कुंपणाशी सेटिंग लावली डायरेक तीही तुमच्या आमच्या देखत … 

-  संतोष टाकळे 

No comments:

Post a Comment