शब्द असो व पदार्थ फोडणी महत्वाची काल परवाच मी स्वयंपाक घराचा एक दिवसाचा चार्ज स्वीकारला. तशी आमची ताई सुगरण तिच्या हाताची चव रेंगाळत राहणारे बरेच पाहुणे पुन्हा पुन्हा तिची तारीफ करतात आणि मी देखील माझ वजन वाढतंय याचं सगळ श्रेय तिलाच देतो. मी तसा नॉन वेज चवीनं खाणारा रविवार असला कि माझी तिची एकच झुंबड उडते मच्छी मार्केटला जाण्यापासून ते कालवण चुलीवर चढे पर्यत आमच्या कामाची वाटणी ठरलेली . चवीच्या या प्रवासात खूप दगदग असते राव अगदी मच्छीचा १०० चा वाटा घसा घीस करून ७० ला मिळाला. कि काय समाधान मिळत ते तुम्ही एकदा अनुभवाच .. मला केदार शिंदेच्या अग बाई अरेच्या मधला एक सीन आठवतोय संजय नार्वेकर जेव्हा स्वतः मटण घेवून येतो तेव्हा त्याच्या आईची प्रतिक्रिया मनाला भिडते नेहमीच्या रगाड्यात घरच्या कारभारणीला जरा विसंत द्यायलाच हवी नाही का ?
खूप दिवसांनी माझी चुलीच्या पुढची उलाढाल चालू झाली. आज कोलंबी भाताचा बेत होता. लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची जमवा जमाव चालू होती. आणि अर्थात ताईच लक्ष होतच ,आज तिची फेवरेट मालिका नेमक्या याच वेळेस लागली. हे नशीब नाही तर न राहून ती मला मदत करायला आलीच असती .मी मनातल्या मनात त्या मालिकेच्या निर्मात्याचे आभार मानले. अगदी अचूक वेळेत तो धावून आला होता. तशीही मला काम करताना कुणाचीही लुडबुड खपत नाही. पण काहीवेळ मिळून अशी काम करण्यात सॉलिड मज्जा असते. शिमग्यात आमच्या दापोलीच्या घरी पालखी येते १०० एक खेळी ( पालखी सोबतचे मानकरी आणि गावकरी ) या वेळेस आपल्याकडे जेवतात . सकाळ पासूनच माझी आणि अपर्णाची ( माझी थोरली बहिण ) लगबग सुरु होते. तस आमचं प्ल्यानिंग एक महिन्या आगोदर पासून ठरलेलं असत. जीन्नसाच्या याद्या, गोड धोड काय करावं याचा निर्णय झालेला असतो .पण पालखी येयिल त्या दिवसाची सकाळ प्रचंड धावपळीची .अपर्णाच्याही हाताला चव मुळात ती सारं आवडीने करते . चार पायलीचा भात ( १२ किलो ) , ५ किलोची भाजी , ३ किलोची डाळ , कढी ,पुरण पोळ्या ,कोशिबीर, पापड , भरलेल्या मिरच्या ,फोडणीच ताक, दोन एक चटण्या , इतक सगळ ती एक हाती करते ,सोबत मी आणि इतर माणसं असतोच म्हणा पण लीड मात्र तिचाच तिची खासियत म्हणजे मिठाच्या बरणीत एकदा तिने हात घातला कि अगदी अचूक मिठासोबत हात बाहेर , तिच्या कामाचा वेगही तसा तुफानी इकडे भात निम्बरत ठेवला नाही. तर तिकडे डाळीला फोडणी पडलेली असते . मध्येच कांदा जरा अजून बारीक हवा , तो कडीपत्ता नीट धुवून घे , पुरणाच्या पोळीला जरा तूप जास्त लाव , अग हात भाजेल फडका सरळ पकड , बाबू ( म्हणजे मी ) चल भात झाला. टोप उतरुया अशा कित्तेक सूचना आणि ऑर्डर्स मिनिटामिनिटाला update होत असतात नाही .आणि दुपारच्या आत जेवण तयार ...
एव्हाना माझी सगळी तयारी झालेली कोलंबी मस्त आलं लसणाच्या पेस्ट मध्ये मुरून लालसर झाली होती . मी टोप चुलीवर अर्थात शेगडीवर चढवला अंदाजे ९ पळ्या तेल गरम करायला ठेवलं आणि कोलंबी भाताची फोडणी एकदाची पडली कडक तेलात कांदा तांबूस परतला गेला होता . लाल तिखटाचा रंग अधिक गडद लाल झालेला गरम मसाले फ्लेवरची मेजवानी देत होते आणि मोहरी तडतडून शांत झालेली . सगळे एकत्र आले कि वेगळेपणा सोबत टिकवून यात स्वतःला मिसळून घेतो आणि जे मिश्रण तयार होत त्याची खरच चव लाजवाब..
माझ्या फोडणीच्या वासाची रेंज एव्हाना चाळीतल्या ४ -५ खोल्यात पोहचलेली असते. आणि मग ताई काय मस्त फोडणी दिलीस ग म्हणत शेजारी बिनधास घरात शिरतात. मला किचन मध्ये लुडबुडताना पाहून जरा बिचकतात कारण आपल्याकडे बाईने चुलीच्या धगाशी खेळत भुकेलेल्या नवऱ्यासोबत पोरा बाळांच्या पोटातली आग शांत करण्याची प्रथा आहे. आजही जेव्हा मी गावी जातो तेव्हा मटना सोबत लेकाला गरम गरम वडे मिळवलेत म्हणून आई चुलीच्या निखार्यांशी जी कसरत खेळते ते पाहून मटण कितीही टेस्टी झालं असलं तरी दोन घास कमीच जातात ती जोपर्यत दोन घास खात नाही तोपर्यंत माझं पोट तस भरलेलं असलं तरी मन मात्र उपाशीच असतं तिच पोट भरे पर्यंत .........
फोटो प्रातिनिधिक स्वरुपात वापरला असल्याची नोंद घ्यावी ..
- संतोष टाकळे

No comments:
Post a Comment