विचारांची होळी …. ......!




होळीवर ताशा वाजला आणि आम्ही पोरं शीत आणायला निघालो .सगळेच नवीन चेहरे दिसत होते तसहि मी फार कमी गावात जातो . म्हणून असेल कदाचित काही ओळखीच्या माणसांनी खास खांद्यावर हात टाकत विचारपूस केली. काय करतोस  बावा कसा चाललाय म्हणत पाठीवर हात फिरवत शाबासकी दिली खूप बरं वाटतं अशा वेळी आपण खूप गोष्टी करत असतो पण कुणी त्याची दखल घेतली कि आणि काहीतरी करायची एक नवी उर्जा मिळते होळीच्या निमित्ताने नाना भेटले एके काळचे हे भजन सम्राट त्यांनी पेटीवर नुसता सूर ओढला तरी रसीक क्या बात है अशी मनमुराद दाद देत त्यांनी एक काळ गाजवला होता.  पंचक्रोषित त्यांच्या भजनाला तोड नव्हती . गवळण तर त्यांची खासियत " नेसले ग बाई मी चंद्रकला टीपक्यांची " रसिक ३ - ४ वेळा ऐकत आज नाना पार थकलेत त्यांना आधार देऊन उठवताना लागलं मनाला कुणी किती उंचीवर जावून पुन्हा एका फटक्यात खाली यावं  त्याची अनुभूती आली …

होळीवर लाकडांचा ढीग पडलेला , गवताच्या ४ फुटी मोळ्या , काही ओल्या झाडाच्या फांद्या आणि बरच काही जमा होतं . मानाच झाड नाचवत आणताना मनात विचार आला.  येत्या २ वर्षात ज्याझाडला आंबे आले असते ते वयात आलेलं झाड आपण तोडलंय आणि आता त्याला नाचवत होळीच्या आगीत जाळणार आहोत पटतंय का मनाला ??? आतून नाही असा आवाज आला.  पण परंपरा आणि रिवाज ओरडून हो  … म्हणत होते. इतके वर्ष चाललंय ते अस अचानक कसं बदलेल पण कदाचित येत्या काही वर्षात हा बदल अपेक्षित आहे . 


खटकलेल काही …. 

शीत नाचवताना आम्ही सगळीच एकत्र असतो इथे मोठा लहान असा भेद नसतो. ढोल ताशे जोशात वाजत होते . रंग अधिक चढला होता आणि एका गोष्टीने मात्र माझी झोप उडवली बारा पंधरा वर्षाच्या कालच्या पोराच्या तोंडाला दारूचा वास आला.  काही वेळ माझा विश्वास बसेना पण नीटसं पाहिलं आणि एका क्षणात मला अस्वस्थ झालं . अरे याच्या वयाचं असताना आम्हाला साधा तंबाकू कुणी मळला तरी शिंका येत.  आणि हि कालची पोरं टल्ली होऊन दारू डोसून आमच्या समोर डूलतायत एका सर्टन वेळेत या गोष्टी माणूस करतो ते मान्य आहे . पण हे न पटण्या सारखं आहे . बरं आता यावर आपण बोलावं तर आपल्या नव विचारांना काडीची किमंत नाही . यावर काहीतरी करावं या विचाराने मी हा मुद्दा एका ज्येष्ठ व्यक्ती कडे मांडला पण त्याचं उत्तर होत . बावा तू कधी तरी येतोस कशाला पडतोस या भानगडीत जावूदे त्यांना हवं ते करूदेत तुला काय पडलीय … 


इकडे तयारी झाली . होळी सजली फाक म्हणून झाले आणि ५  पुरुष उंच होळीला आग  लागली . किमान १० घरांना वर्षभर पुरेल इतकं सरपण , ५ ० एक गुरं खातील इतका चारा , आणि बरच काही येत्या तासाभरात जाळून राख होणार होत… लक्ख प्रकाशात सगळे चेहरे उजळले होते . उंच आकाशात निखारे पसरले होते . पाल्या पाचोळ्यागत आमचे नव विचार या होळीत पुन्हा एकधा जळून खाक झाले . पण आमच्या विचारांचा निखारा अजूनही धुमसतो आहे.  त्यांनी पेट घेतला तर खरा खुरा अंधार दूर होयील आणि प्रकाशाच्या वाटेवर पुन्हा एकदा वसंत बहरून येयील … 


- संतोष टाकळे 

No comments:

Post a Comment