पडावा आहे हे लहानपणी चुलीवर शिजणाऱ्या डाळीच्या वासाने कळायचं .आई सकाळी पाचला उठायची अंगण - घर सारवून गुढीची तयारीची लगबग सुरु होत असे.परसातल्या बांबूच्या बेटातली एक उंच काटी तोडायची ती धुवून स्वच्छ करायची. मग रानात जावून चाफ्याची फुलं गोळा करायची यादिवशी चाफ्याच्या फुलांना खास महत्व आहे. तोवर आई बाकीच्या तयारीला लागे. सकाळी विहरी वरून ताजं पाणी आणण्या पासून ते दारात रांगोळी काढण्यापर्यंत सगळ एकटी आई करे आम्ही तेंव्हा सगळी भावंड अगदी लहान मददी पेक्षा आम्ही कामं वाढववत असू .. आणि सणासुदीला एखादा फटका पडला कि तोंड फुगवून काहीवेळ कोपऱ्यात बसायचो. पण आई मात्र पोरांना भूक लागली असेल म्हणून हात अधिक तेजीन चालवत असे .एका चुलीवर एकीकडे डाळीला फोडणी दिली कि ती वैलावर चढवायची आणि भाजीचा टोप मुख्य चुलीवर पुढच्या फोडणीसाठी तापवायला ठेवायचा . पुरणाची डाळ चांगली शिजली कि तिला गरम गरमच पाट्यावर वाटायला घ्यावी लागत असे. तेंव्हा आता सारखे आधुनिक पुरण यंत्र नव्हते १ किलो डाळीच पुरण पाट्यावर वाटायचं म्हणजे किमान पाऊन तास जायचा तोवर आम्ही पोर कुठ पुरण खा , कुठं कैऱ्या शोधा नाहीतर गावात कुणी कशा गुढ्या उभारल्यात याची पाहणी करून या अशा टिवल्या बावल्या करीत नुसत्या उनाडक्या करीत असू.
दुपारी उन्हं डोक्यावर अधिक कडक व्हायच्या आत आमची पूजा सुरु होई अंगणात आईने काढलेल्या वळणदार रांगोळीवर पाट मांडला जाई. बाबूंच्या काठीला हळदी कुंकवाचे ठिपके लावले जात . काठीच्या टोकावर नवी कोरी साडी बांधली जाई सोबत आंबा -कढीलिंबाची डहाळी , साखरी आणि चाफ्याच्या फुलाची माळ बांधून त्यावर अष्टगंध लावलेला तांब्या चढवला जाई . आणि अखेर गुढी उभी रहात असे. कामाचा रगडा कितीही असला तरी आई ठेवणीतल्या साडी पैकी एकादी उठावदार काठ्पदरी साडी नेसे . त्यावर खास वेळी घालायचे दागिने , केसांचा आंबेडा त्यात गजरा किंवा वेणी. तिला आजही मी हट्टाने असा साज करायला लावतो कारण ति आजही अगदी तशीच दिसते जशी आम्ही तिला लहानपणी पाहिलंय. तिने केलेल्या पंचारतीने पूजेचा समारोप होई. मग ओल्या खोबऱ्या सोबत कढीलिंबाच पान खाण्याची कडू वेळ आली कि नको नको म्हणाऱ्याच्या तोंडात जास्ती पाला कोंबला जाई. इकडे आईचा स्वयंपाक झालेला असे. कोकणात सणासुदीला केळीच्या पानावर नैवेद्य वाढला जातो . मग केळीची पानं पुसायचं काम माझ्याकडे किमान पाच पदार्थ तरी पानावर असत .त्यात सगळ्यात पहिली पुरण पोळी ,मसाले भात , गोड आंबट डाळ,पुरी डाळिंब्यांची भाजी , आणि घरगुती दह्याचं ताक , सोबत कोशिंबीर, लोणचं ,पापड,फेणी असे तोंडी लावणीचे तत्सम पदार्थ देखील असत . याने पान पूर्ण भरून जाई पानातली गर्दी बघूनच पोट भरत असे. तरीही गुढीला नेवेद्य दाखवेपर्यंत आम्हाला धीर नसे कधी एकदा पोळी खातोय अस होई . पण आज कित्तेक वर्ष झाली आईच्या हातची पुरणपोळी खाल्ली नाही. इथे मुंबईत सगळे इतके कामात गुंतलेले कि सणासुदीला काही विशेष करायला प्लान करावा लागतो. कधी वेळ नसेल तर बाजारातून पूजेच्या साहित्या सोबत पुरणपोळी , सजवलेली मिनी गुढी असं सगळं आणावं लागतं तेंव्हा कुठे मुंबईत सण साजरा होतो. काहीजण अजूनही वेळ काढून घरी सगळं आवर्जून बनवतात. त्याचं कवतुकच आहे …
पण दिवस बदलतायत तशी साणा -उत्सवांची मजा कमी होत चाललीय. बाजारीकरण वाढतंय .सण नुसते सण राहिले नाहीत त्यांचे इवेंट झालेत. साध्या शोभायात्रा शक्ती प्रदर्शनात रुपांतरीत झालीय. . मराठी संस्कृतीचा पुळका राजकीय पक्षांना अधिक आलाय कुणी ५० फुट गुढी उभारून त्याची राजकीय उंची दाखवतो तर कुणी नाक्या नाक्यात पोस्टर लावून त्याची लायकी …
मराठी संकृती आणि परंपरा आता ग्लोबल झाली आहे हे खरं असलं तरी. जी संकृती पूर्वी गावखेड्यात होती . तीहि हळू हळू विरळ होते आहे. सुख -समृद्धी - आनंदाच्या गुढीला पुन्हा तो साज चढणं कठीण वाटतंय. गुढीला चढवलेल्या सुती साडीच्या जागी आता रेशमी काठ पदरी साडीची वर्णी लागलीय , अंगणात ,खिडक्यात, ग्यालरीतल्या मोकळ्या उभ्या राहणाऱ्या गुढ्या एव्हाना लिव्हिंग रूमच्या शो पीस झाल्यात . अर्थात पारंपारिक सुती साडीची उब रेशमी सिल्कला येणं शक्यच नाही.
तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
© संतोष टाकळे

No comments:
Post a Comment