तिच्या जगण्याची जिद्द ……………… !



आजच्या महिलादिनी माझ्या आईच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी हि पोस्ट लिहावीशी वाटली. तस हे व्यक्तिगत असलं तरी फार खासगी काही नाही 

ते दिवस तसे बेताचे पण तिचा संघर्ष कधी कमी पडला नाहि आणि म्हणून आज इथपर्यत पोहचता आल. दारोदार भाजी, दुध आणि इतर गोष्टी विकत जिन आम्हाला वाढवलं तिच्या कित्तेक आठवणी जाग्या झाल्या खरं तर हे सारं लिहून मला कुणाची सहानभूती मिळवायची नाहि पण दिवस कसे हिमतीनं पालटता येतात ते मी पाहिलंय म्हणून वाटलं शेअर करावसं.

आई बद्दलची हि एक आठवण

रात्री ९ ची वेळ आम्ही नुकतच जेवून झोपायची तयारी करत होतो. बाबा दोन दिवसांपूर्वीच चिपळूणला कामासाठी गेलेले. खरतर आज ते येणार होते पण ते आले नाहीत . आणि निरोपही आला नाही. त्यावेळी आमच्या गावात साधा land line पण नव्हता. आई जेवताना म्हणाली बाबू उद्या राजू जाधावाकडे जावून विचारून ये हे कधी येणार ते मी हो म्हटलं, आणि तितक्यात आंबावकर साहेब आणि राजू जाधव घरी आले. एवड्या रात्री हे कसे आले .म्हणून आई सोमर गेली. आम्ही तेव्हा अगदीच लहान मी तर अंथुणातच बसलो होतो. तशी आम्ही सगळीच जागे होतो. मी तेव्हा ४ थी ला असेन. साहेबांनी विचारलं नानी पोरं जेवली का ? आई म्हणाली हो आम्ही आत्ताच जेवलो पण तुम्ही कसे काय इतक्या उशिरा आलात. आणि हे नाही का आले ? साहेब थोड्या बसक्या स्वरात म्हणाले नानी तात्यांना अपघात झालाय .लोट्याच्या माळावर वायर तुटली आणि हाताला मार लागला .आई कोसळली गांगरली तिने एक मोठा हुंदका दिला. पण काही वेळात ती भानावर आली. आम्ही पोरं घाबरून आईला बिलगलो आमची रडारड सुरु झाली . कसबसं राजू दादांनी आम्हाला गप्प केलं आणि साहेब म्हणाले तसे बरे आहेत ते चिपळूणात admit केलंय त्यांना आम्ही जातोय तिकडे तुम्ही चला हवतर आमच्यासोबत तेव्हा अर्चू ताई आमच्या मध्ये मोठी १० वी ला असेल तेव्हा ती. आईने आम्हाला गप्प केलं. काही नाही झालय त्यांना मी जावून घेवून येते त्यांना घरी अर्चू तू बघ यांना मी जाते .इतक्यात राजू दादाची आई आली. जाधव काकी नेमही आमच्या सुखं-दुखात सोबत असायच्या आणि या वेळी पण एवढ्या रात्री काळोखातून धडपडत त्या शेवटी आल्याच आईने त्यांना मिठी मारली वाहिनी नेमक काय झालंय सांगा ना ?काकींना पण काही कल्पना नव्हती म्हणून त्या आईला गप्प करत बोलल्या वाहिनी जा तुम्ही मी बघते पोरांना तुम्ही येईपर्यंत मी आहे इथेच … .............

या अपघातानंतर आईने कंबर कसली बाबांचा पगार उपचारात खर्च व्हायचा घरी ४ पोरं , १० गुर ,६ एकर शेती आणि बाबांना बघायला येणारे दिवसभरातले ५-६ पाहुणे वेगळेच. पोरांना भाकरी , गुरांना वैरण काटी , आलेल्या पाहुण्याला घोटभर चहा आणि बाबांना भाताची पेज तिनं सगळं एक हाती निभावलं. संध्याकाळी गाईच्या दुधाची धार काढतांना आमच्या काळ्या गाईन जर चुकून लाथ मारली हि आई म्हणे बाई तूच बाकी होतीस लाथ मारायची . मी बाजूला तांब्या घेवून बसलेला असायचो तेव्हा मला आईची हि बडबड तशी फारशी कळायची नाही . पण आता कळतय आई काळ्या गाईला तिचं सारं दुखं सांगत असे आणि ती पण ह्म्म्म हम्म करत ते ऐकत असावी कदाचित …...........

तिनं जे केलं ते आत्मविश्वासाने म्हणून ती कधी मागे पडली नाहि. मला अजूनही आठवतंय इतक्या कमी पैशात ती घर चालवायची आम्ही तेंव्हा दुकानातून अगदी मोजक्या पैशात बाझार आणत असू . पैसे पुरले नाहीत म्हणून कधी कधी काही घेतलेल्या वस्तू आम्ही परत करायचो. आमचे फाटक आप्पा म्हणायचे टाकळे घेवून जा रे आईस देयील पैसे मग, पण आमचा हिशेब आम्हला ठावूक असायचा. आता नेमकं काय ? कमी करूया असा प्रश्न पडायचा मग साबणाच्या ६ वड्या असतील तर त्यातल्या ३ परत द्यायच्या , तोंडाच्या पावडरीचा मोठा डबा देवून जरा लहान डबा घ्यायचा आणि परत एकदा हिशेब जोडायचा बरं आता जमलं २ रुपये उरलेत त्याच्या गोळ्या घे मी अपर्णाला सांगायचो. कारण तो ओझ्याचा जिन्नस डोक्यावरून घरी जाईस्तोवर तोंडात ओलावा टिकला पाहिजे . मागे मी आईला मॉल मध्ये घेवून गेलो होतो. तिला म्हणालो काय हव ते घे आता इथे घेतलेल्या वस्तू परत करायची वेळ येणार नाही आपल्यावर , त्यावर ती म्हणाली बाबू जेवढा पैसा येईल तेवढा तू मोठा होशील पण आपले दिवस कधीच विसरू नकोस !

काही असो आईने जिद्दीने संघर्ष दिला आणि ती जिंकली. आज मी इथवर पोहचलो ते तिच्या या जगण्याच्या जिद्दीमुळे.

आजही आईची मेहनत अविरत चालू आहे. ३ गाई , ४ बैल आणि ३ पाडे असा गुरांचा गोतावळा , ५ शेत, ३ माळरान ,९० काजूची आणि ४० आंब्याची झाडं असलेली बाग आणि घरची धगधगणारी चूल असा सगळा कामाचा गाडा आई बाबांसोबत आजही रेटते आहे .तेहि आवडीनं मला वाटतं तिला आत्ता विश्रांती घ्यायला हवी. पण ती म्हणते तू कितीही मोठा झालास तरी माझी मेहनत थांबणार नाहि . रोज सकाळी आई - बाबा दोघहि शेत ,गुरं ,आणि बाकी कामत गुंततात बाबांनी स्वतः लावलेल्या आंब्याची बाग जेंव्हा हिरव्या पिवळ्या आंब्यांनी फुलते तेंव्हा माझी पावलं अभिमानाने त्या बागेत फेर फटका मारतात. आणि आई जेंव्हा भातावर साजूक तुपाची धार धरते तेंव्हा तिच्या डोळ्यातलं समाधान त्या तुपाच्या धारेत चमकून सागंत गाड्या मेहनत कर दिवस असे बदलतील.


- संतोष टाकळे

फोटो - अमेय घरत ( आमचा अमु दादा )


No comments:

Post a Comment