सॉरी साहेब .....................!



पवार काका थेट दिल्लीतून गरजले तेव्हा कुठं महाराष्ट्रातल्या नेत्यांची धुंदी उतरली .मुला मुलींच्या लग्नात जाधव दादांनी जो थाट मांडला होता.तो किती भव्य दिव्य होता ते आपण वृत्तवाहिन्यांवरून पाहिलच असेल आणि सोबत जाधव साहेबांची सारवासारवही अहो पण मला आमच्या मन्या सुताराचा फोन आला होता. तो गेला होता लग्नाला भास्कर दादांची आणि त्याची जुनी मैत्री मन्याच आखो देखी वर्णन त्याच्यात शब्दात .....

........ पत्रिका आली तेव्हा मी हिला म्हटला बघ याला म्हणतात दोस्ती मला तो विसरला नाय आपण जायाचा लग्नाला पण हिला जल्ला कसली हवूस नाय मला म्हणाली एवड्या मोठ्या लग्नात आपण कसा बाय जायचा मागच्या ऐत्वारी त्या पेडणेकराच्या पोराच्या लग्नाला ही माणसा आलेली हातात ताटल्या घेवून जेवत काय होती मोठ्या मोट्यान हसत काय होती त्या बायका पण काय शिकलेल्या फाड फाड विगर्जी बोलत होत्या . मना असा वाटला झक मारली आणि मी हयित आली. कसा बसा पाकीट दिला आणि मी आनी केळसकराच्या सुमीन तिथनं पल काढलाव आणि बहादूर शेठ नाक्याच्या मनीषा हॉटेलात रस्सा पाव खावून आपली घरात आलीव नको बाय मला बा नाय जमनार तुम्ही हवा तर जा सोबत कोण नसल तर त्या कदमच्या विन्याला घेवून जा .मेला एव्हडी बुका शिकलाय तरी नुसता घरात लोळत असतो तसा पण त्याला काय काम धाम नाय तुमच्या मित्राला सांगून चिकटवा कुठ तरी मन्या जास्ती तिच्या नादाला लागला नाय आणि लग्नाला गेला .

जाधव साहेबांनी आंब्या फणसाच्या झाडत वाढलेल्या कोकणी माणसाला अलगत थेट जयपूरच्या राजमहालात न्यावं असा राजमहाल उभा केलेला मन्या सुतार हबकला आणि म्हणाला तिच्या आयला काय पण सुतार काम केलानी हाय जल्ली सागाची लाकडा ह्यात कि भेल्याची इतक्यात जाधव साहेबांनी मन्याला बघितलं मिठी मारत साहेबांनी त्याच स्वागत केल आज मन्याला चार पावलं वर चालत असल्याचा भास होत होता .त्याने लागलीच मला फोन केला बाबू ( मन्या मला खासगीत बाबू म्हणतो ) मेल्या तू हवा होतास, काय पण दादांनी खर्च केलानी हाय.आख्या चिपलूनात असा लग्न झाला नसल जेवणात तर सतराशे साठ डीश्या आपली पानी पुरी म्हणू नकोस , जिलबी म्हणू नकोस आनी तुम्ही ता चायनीज खाताव ना तो पण हाय ..अनी मंत्र्याची तर लाईन लागेलेल सगली झाडून आलीत.आणि तुला यायला काय धाड भरली होती .............. काही वेळ मन्याला काय प्रतिक्रिया देवू असा संभ्रम झाला मन्याच्या नजरेत मी मोठा पत्रकार आहे. मला सगळे मंत्री , सगळे हेरो -हेरोईनस ओळखतात त्याला बऱ्याच वेळा मी समजवायचा प्रयत्न केला. बाबा रे मी काही इतका मोठा नाही. पण मन्या नेमही बाबू तू आता भाव खाऊ नकोस. मोठ्या साहेबांना ( सन्माननीय बाळासाहेब ठाकरे) भेटलास ना मग मेल्या तू आता अजून किती मोठा व्हयाचा बाकी रायलास ... अस म्हणत माझ तोंड बंद करतो .. असो मन्याची स्टोरी मग सांगेन कधी तरी आता नेमका विषय मांडायला हवा

मुद्दा आहे तो शो बाजीचा या नेत्यांकडे इतका पैसा आला कुठून यांची तपासणी कोण करणार मागे गडकरींनी उघड उघड धमकी देवूनही आपल्या income tax विभागाने त्याचं काय वाकडं केलं , तटकरे काकांच्या शेतीचा हिशेब अजूनही झाला नाही , कृपा भैया मोकाट सार्वजनिक कार्यक्रमात वावरतायत, कलमाडी मामा तर एव्हडी उलाढाल करूनहि निर्लज्जपणाचा कळस म्हणजे पुन्हा अध्यक्ष पद मिळाव म्हणून अर्ज करतात तेही हजार एक कार्यकते सोबत घेवून ,अजित दादांनी तर पाण्यातून पैसा कसा कमवता येतो याचा उत्तम प्रबंध मांडला म्हणून कि काय त्यांना पुन्हा मंत्री मंडळातल्या अर्थ खात्यात जागा मिळाली .आमचे माऊली ( वारकरी ) बबनराव पाचपुते पण पैशाच्या मोहाला बळी पडले आणि आदिवासी योजनांचा घोटाळा झाला. सेनेच्या जैन साहेबांनी गरिबांच्या घरकुलात मनी वेल लावत पैशाच हंगामी पीक काढलं काय म्हणावं यांना माझ्या तोंडात तर शिवी येतय ...

पण एकंदरीत राजकारणातल्या या आर्थिकक्रांती मुळे गल्ली बोळातले लोक राजकारणात आलेत . साधी मोटार सायकल घ्यायची ज्याची लायकी नव्हती. आज तोच १० एक लाखाची गाडी मिरवत फिरतोय , वाढदिवसाला जेवणावळी उठवतोय , साई बाबांची मंदिरं बांधतोय , लोकांना पिकनिकला नेतोय आणि आपण मात्र भाऊ भाऊ करत नालायका सारखे त्याला अधिक मोठं करतोय. मी राजकारणात येतो अस जाहीर केलं तेव्हा लोक मला वेड्यात काढतात म्हणाले तुला जमणार नाही पैशाचा खेळ आहे बाबा उगाच नको ते खूळ घेवू नकोस ....

सरसकट सगळेच १९ -२० म्हणायला हरकत नाही. पक्षाच्या हाय कमांडला तर तर हे लोक धूप घालत नाहीत, सेटिंग वर चाललय सगळं हे गणित हे वेगळं सांगायला नको .परवा सोनिया गांधी ज्या बालविकास कार्यक्रमात आल्या होत्या, त्यात त्यांना कुणी तरी चाफ्याच्या काळ्यांचा हार घातला. बाई तासभर त्या काळ्यांचा वास घेत बसल्या दुसऱ्या दिवशी बाईंचा हार कुरवाळतानाच्या फोटो सहित ४ कॉलम बातमी आत्ता काय बोलणार .. पवार साहेबांची पकडहि हळू हळू ढिली होत आहे CM to PM अशी सुपर फास्ट मेल पकडून साहेब जेव्हा दिल्लीत गेले होते.तेंव्हा एकदिवस साहेब PM होणार अशी खात्री कार्यकर्त्यांना होती. मात्र साहेबांनी क्रिकेट प्रेमापाई कृषी खात्याची जी दैना केली. त्यानंतर तर त्यांना मंत्री मंडळात यापुढे जागा मिळेल कि नाही हाच प्रश्न आहे .. मागे त्यांनी रुसून पण त्यांना कुणी पुसून विचारलं नाही यातच काय ते समजा .. इकडे सेनाकरांची देखील स्थिती काही समाधानकारक नाही नेत्यांची गर्दी आणि सच्या कार्यकर्त्याची गळचेपी ,सारा काही अलबेल .... साहेब गेले पण सगळा रंगच फिका पाडला जादूगाराच्या हातातली जादूची काठी हरवल्यावर जादुगार जसा नुसताच हात चलाखी करतो अगदी तसच ...

करोडोंचे घोटाळे झाले , दुष्काळ झाला , कसबाला इतके वर्ष पोसून फाशी देवून झाली आणि अतिशय भायावहक म्हणजे आपल्या जवानांची मुंडकी कापून नेण्या इतपत शेजारच्या राष्ट्राची मजल गेली. बोला अजून अस काय भयानक व्हायचं बाकी आहे कि मग आपण पेटून उठू ....................


-संतोष टाकळे


No comments:

Post a Comment