स्मारकात अडकले शिवराय ………. !




तोफांच्या निनादात कड्याकपारीत बुरुजाच्या निधड्या छातीच्या आणि वीर माता जिजाऊचा पराक्रमी शिवराय आता अरबी समुद्राच्या खडकावर विराजमान होणार आहे. करोडोचा निधी महाराष्ट्र सरकारने मंजूर केलाय . इम्पोर्टेट मुख्यमंत्री स्वतः जातीनं तो खडक पाहून आले . आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्मारकाला एक जागतिक ओळख मिळेल यात शंका नाही . पण तरीही हे स्मारक नुसता पैशाची उधळ पट्टी आहे अस माझ ठाम मत आहे.

ज्या लोकनेत्याने रयतेच्या भल्यासाठी सदा कल्याणकारी कामं केली त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात आज तहान भागवायला पाणी नाही . शेतकऱ्याच्या जीवाला मोल नाही , कायदा आणि प्रशासन याचा धाक नाही , राजकारण्याच्या वागण्याला सुमार नाही .कष्टाने पिकवलेल्या मालाला मोल नाही आणि दयनीय महाराष्ट्राला सावरायला एकही हुकमी नेता नाही . काय करावं महाराज आम्ही जगतोय या राज्यातल्या दुष्काळी वणव्यात , बेढंगी नेत्यांच्या गुंडागिरित, भ्रष्टाचारी लांडग्यांच्या कळपात ………….

महाराज तुमची जयंती वर्गणी काढून लाखो रुपये खर्च करत साजरी होत आहे . डेक वर मोठ्याने पोवाडे वाजवत तुमच्या स्मृती जागवल्या जातायत . तुमच्या जयंतीला शृंगारिक लावण्या , ब्रेक डान्स आणि DJ रिमिक्स गाण्यांच्या तालात तरुणाई थिरकत बेधुंद होते आहे. आजी माझी नेते , पुढारी , समाजसेवक आणि कार्यकर्ते तुमच्या अर्ध्या कृती पुतळ्याला आज हार तुरे वाहतील पोस्टरवर तुमचा फोटो छापून शुबेच्या देतील पण महाराज तुमचा आदर्श आचरणात आणणारे तुमचे मावळे हाताच्या बोटावर मोजण्या इतपत राहिलेत याचं दुःख तुम्हाला अवस्थ करत असेल याची कल्पना आहे आम्हाला …
तुमच्या नावाचा वापर करत जागर करणारे महाराष्ट्राच्या त्या राजकीय पार्टीलाहि तुमचा विसर पडलाय मागे याच पार्टीचे युवराज तुमच्या एका गडावर फोटो शूट करून आले पण त्यांना तुमच्या गडाचा ढासळलेला बुरुज दिसला नाही याच नवल वाटत नाही कारण सध्या जाणूनबुजून दुर्लक्ष करणं फार अंगवळणी पडलंय आमच्या …


राजे तुमच्या गडाची डागडुजी करण्याची इच्छा काहींना आहे. यातले काही तरुण गडावर येवून जेव्हा विस्कटलेल्या पायरीला परत पक्की करतात, ढासळलेल्या बुरुजाच्या दगडी पुन्हा नव्याने मांडतात , पाण्याची कुंड उपसून स्वछ करतात, गडाच्या पवित्र वास्तूत दारू पिऊन उच्छाद मांडणाऱ्या लोकांनी फेकलेल्या बाटल्या आणि काचा गोळा करतात अशा तरुणांनाच्या विचारांना मनाचा मुजरा करावासा वाटतो . नाहीतर २ लाख उडवत धिंगाणा घालणारे आमचे कार्यकते नेमकं काय साधतात हा प्रश्न विचारायची वेळ आज आली नसती ….

खरतर महाराज आणि डॉ आंबेडकर याचं स्मारक बांधून शो बाजी करण्यापेक्षा हा निधी महाराजांकडे असलेल्या गड - किल्यांच्या डागडुजी साठी वापरावा . गडावरच्या नैसर्गिक झर्याच्या पाण्याला तहानलेल्या जनतेपर्यंत पोहचवा. आडगावातल्या लाल मातीतल्या रस्त्यावर एक थर का होयीना डांबर घाला , माळ रानावरच्या झोपडीत विजेच्या दिव्याने प्रकाश पोहचावा , भूक भूक करत मारणाऱ्या कुपोषितांना दोन घास भरवा,वेशीबाहेर आजही कुड्याच्या भिंतीत अडकलेल्या हलकीत दिवस काढणाऱ्या उपेक्षित , दलित समाजाला निदान हक्काचं घर तरी मिळवून द्या भीम रावांच्या नावावर मोठ्या झालेल्या नेत्यांनी इंदू मिलची जागा मिळाली म्हणून जो जल्लोष केला. त्या निळाईच्या झगमगाटात माझा पाड्यावरचा भिम्या मात्र हरवून गेला .

शेवटी या चार ओळी

भिमाले बये यांनी दगडची कोंडीला
आमचे कपाळी कुणी दरिद्र गोंदिला
शेमड्या पोराचा बगे झाला हो पुढारी
भीमाचे नावले यांनी विकले बाजारी

शिवा जिजाऊचा होता
मावळ्यांचा गड नेता
तलवारीच्या धारेला
तळपती यशोगीता

- संतोष टाकळे

लाखाच्या घरात बजेट असणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मी वक्ता म्हणून येत नाही असं कळवताच ज्यांनी नाकं मुरडली आणि ज्यांनी मला असंक्य प्रश्न विचारले त्यांनी हि पोस्ट वाचून नक्की कळवा माझा निर्णय योग्य होता कि अयोग्य …

धन्यवाद …. !

No comments:

Post a Comment