भाड्याच घर ……!




दिवसभर वणवण करून घर गाठलं आणि घट घटा एक ग्लास पाणी प्यायलं कि काय समाधान मिळतं ते मला असं शब्दात कसं सांगता येईल. घर नुसतं फर्निचर,महागड्या सुख वस्तू आणि हाय  प्रोफाईल लोकांनी भरलेलं नसावं तर आपल्या हक्काच्या माणसांनी , काही क्षण रमवणाऱ्या चीजांनी सजलेलं, आणि मुळात समाधानी वातावरणाने भरलेलं असावं नाही का ? नुकतच आम्ही घर बदललं वरळीत या पुढे नुसतं उभं राहायला देखील पैसे लागतील अशा चढ्या भावाने इथल्या घरांच्या किंमती मनाला वाटतील तशा वाढता आहेत . दलालांचा सूळसुळाट ,रूम मालकांचा सुकाळ आणि भाड्याने राहणाऱ्या भाडेकरूच्या निशिबी मात्र आर्थिक दुष्काळ अशी काहीशी परिथिती आहे.  असो ,पण आमचं नवीन घर मिळेपर्यंत हे सार सोसावं लागणार हे अटळ आहे. तशी हि नवीन रूम तितकीशी वाईट नाही.  पण तरीही त्या जुन्या रूम सोबतचे ऋणानुबंध अजूनही ओलेषार आहेत. मुळात शेजार अगदी घरगुती झाला होता . समोरच्या गीता काकी अखेर आम्ही जातोय म्हणून ढसा ढसा रडल्या त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि आम्हालाही ना इलाजास्तव ते घर सोडावं लागल, आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमची सोबत नसते हेच खरं पण आपण मात्र इतके गुंतत जातो कि मग त्यातून सुटतांना फार लागतं मनाला आणि गुंता अधिक गुंतत जातो. 

आमची बी डी डी चाळीतली हि ३ री रूम तसा आमचा प्रवास फार पूर्वीच सुरु झालाय आणि आता आम्ही शेवटच्या टप्यात पोहोचलोय. पण घर भाड्याच असो वा स्वतःच्या मालकीचं घरच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमच्या हर एक जगण्याची नोंद असते , ज्या गुळगुळीत भिंतीला टेकून रात्री निवांत झोप लागते ,ग्यालारीतल्या गुलाबाची पहिली कळी उमलताना खिडकीची लाकडी झडप तुम्ही किती वेळा उघडलेली असते आणि तरीही तिचा खरखरणार स्पर्श तुम्हाला सुखावून जातो , अंघोळीला बसताना बाथरूम मधल्या कारंजी नळाची भुरळ अजून मनात टप टप करत असते. पोट माळ्यावरचा तुमच्या हक्काच्या कोपऱ्यात आता कुणी नवीन माणूस बसेल या विचारांनीच मनात गदगदून येत. आणि ज्या घरात तुम्ही कित्तेक सुखाचे आणि आनंदाचे क्षण जगलेले असता त्याच घराला टाळ मारून चावी मालकाच्या हातात देतांना एक वेळ मानत येत सरळ विचारूया का याला काय हो हे घर कितीला द्याल आम्ही घेतलं तर …………… 

घर खाली करण आणि ते पुन्हा मांडण फारच तापदायक काम आहे बुवा . सामानाची बोचकी पाहून डोक गरगरत काही सुचत नाही अशावेळी पण त्यानिमित्ताने अनेक दडलेल्या गोष्टी पुन्हा समोर येतात. या वेळी घर खाली करताना मला सॅमने  ( Samantha Furtado) सिंगापूरहून आणलेला टी शर्ट मिळाला . आता तो जुना झालाय पण परदेशांतून आलेली माझी पहिली वाहिली भेट म्हणून तो अजूनही जपून ठेवला आहे. तसही ताई नेहमी प्रमाणे जुने कपडे वेगळे करून त्याचं गाठोडं बांधते आणि भांडी वाल्याची वाट बघत असते.  ४ प्यांट , २ साड्या आणि दोन तीन बारीक सारीक कपडे दिले कि तो भांडीवाला टोपल्यातल्या भांड्याकडे एक नजर टाकतो. आणि दिवाळीच्या वेळेस वर्षभर आपण रग्गड दागिने केल्याच क्रेडीट म्हणून सोनाराने आपल्याला पाव किलोचा मैसूर पुडा पाठवावा तसं एखादं बारकस टोपस काढून बघा ताई किती वजनदार आहे .म्हणत ते नव कोरं चांदेरी ठसे असणारं  जेमतेम २ वाट्या भात होईल एवढंसं  चीनकाट टोपस देवून तो पळ काढतो आणि इकडे ताई  मात्र बरी दिलान मेल्यान टोपशी मला मच्ची साठी होयील अस म्हणत तब्बल १० बारा कपड्याची अडचण एका  टोपसीत  दूर होते. 

घर कधीच जसच्या तसं पुन्हा सजत नाही . बऱ्याच गोष्टी बदलतात आणि पुन्हा नवी सुरवात करावी लागते. सतत घर बदलण आणि नव्या माणसांमध्ये मिसळण आता आमच्या अंगवळणी पडलंय. मुळात ते आम्हाला परिथितीने शिकवलंय आता पण नवीन घरत मन हळू हळू रमतय दोन दिवस नीटशी झोप लागली नाही मधेच गौरी आणि सेजल खेळतांना काका खाऊ दे ना अशी हाक , गौरीची आई संतोष आधी इकडे ये जरा खाली जाना आपल्याला नाश्ता घेवून ये , गणेश दादा santo चल रे काय तू पण चाल एक राऊंड मारून येवूया नाक्यावर , आमच्या कोपऱ्यावरच्या मालवणी काकी 
काय हो कधी इलाव कामासून, शेजारची दीदी संतोष जरा तुझा फेसवॉश दे रे बघू किती चेहरा उजळतो माझा असे अनेक संवाद कानात गुंजी घालत होते 
पण वेळ जसा जात असतो तसं आपण काही काळ पुढे सरकतो आणि मागच्या गोष्टी हळू हळू अंधारत जातात …. 

या घरी जेम तेम सेट झालोय आम्ही या घरातहि पोट माळ्यावर मस्त मोकळी जागा आहे.  माझी पुस्तकं , laptop , लिखाणाची टिपणं , reference ची कात्रणं , आणि रात्रीच्या निवांत वेळी भीमरावांच्या गजल ऐकण्यासाठी माझा छोटा म्युझिक player, मध्येच तोंडात टाकायला मिक्स सुपारीचा डब्बा असं बारीक सारीक ताई आणि किशोरने छान अरेंज करून दिलंय.  रात्री इथंच बसून दिवसभराच्या उलाढल्या आठवत आणि नेटवर्किंग साईडवर मित्रांशी बोलता बोलता डोळे जड होतात.  आणि मावशीने दुबई वरून पाठवलेल्या मखमली रजाईत झोप कधी शिरते कळतच नाही . सकाळी माळ्याच्या खिडकीला लागून असलेल्या उंबराच्या झाडावर चिव चिव करत चिमण्या फेर धरतात आणि हिवाळी गारव्यातली गुलाबी झोप अलगत उघडत जाते.  काही वेळ नुसतंच पडून रहावसं वाटतं त्या चिमण्यांचा खेळ पाहत या फांदीवरून त्या फांदीवर पिंगा घालत असतात नुसत्या . त्याही मस्त आनंदात , मग आपण का रुसावं घर बदलताना प्रत्येक फांदीवर जसा नवा आनंद त्या शोधतात तसा नवा आणि निखळ आनंद आपण या घरात शोधायला हवा नाही का ? शेवटी भिंती आणि दार बदलली तरी चालतील पण तुमची आमची मन मात्र तशीच रहावीत मोकळी , साधी आणि सरळ ……


- संतोष टाकळे 

No comments:

Post a Comment