शाळा - बाई आणि गुरुजींची ................!



आमची कोव्लारू मराठी शाळा सकाळी १० चा टोला पडायच्या आत आम्ही धावत पळत शाळा गाठत असू हातात कापडी पिशवीचं दप्तर, त्यात एक पाटी पेन्सिल, दुपारसाठी डबा आणि शाळेत बसायला गोन्ता, तेंव्हा आमचा गणवेश पांढरा शुभ्र ( खरतर थोडासा मळलेला ) शर्ट आणि खाकी हाफ प्यांट

तो काळच फार वेगळा होता कधी पायात चप्पल नसेल तर कुणी हसलं नाहि किवा कापडी पिशवीच दप्तर आहे. म्हणून कुणी भुवया उंचावून कुतूहल पूर्वक हिणवलं नाहि ,जे होतं ते होतं तिथे दिखावा नव्हता. एक किस्सा आठवतोय मी तेंव्हा पाचवीत होतो. यावेळेस आलेल्या वर्गशिक्षिका बर्वे बाई फार कडक स्वभावाच्या त्या गणित शिकवायच्या एकदा गृहपाठ तपासताना त्यांनी गणिताच्या वहीत मराठीचा गृहपाठ केलेला पहिला त्या खुप चिडल्या अगदी वही फेकून दिली .आणि शिक्षा म्हणून पट्टीने हात लाल केला. खरतर माझ्याकडे नेमक्या ३ वह्या होत्या आणि विषय ६ मग मी एका वहीत २ विषय लिहून वेळ मारून नेली होती . तेंव्हा आम्ही एकूण ४ भावंड शाळेत जायचो अर्थात आई बाबांची खर्च भागवताना काय तारांबळ होत असेल हे आता कळत आहे. पण जेंव्हा बर्वे बाईना हे सगळं कळलं तेंव्हा बाईनी स्वतः ४ वह्या आणून दिल्या. माझ्या हातात वह्या देताना बाई म्हणाल्या उगाच मार खल्लास बोलता आलं नाहि मी काय बोलणार तुम्ही बोलूच दिल नाहीत असं नुसतं बोललो असतो तर पुन्हा ४ पट्ट्या हातावर चमकल्या असत्या मी नुसतं मान खाली घालून ऐकत बसलो.

असे खुप किस्से आहेत . पण ते दिवस होतेच फार वेगळे शाळेत गुरुजींचा धाक होता. कितीही झालं तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक आपलेपणा होता. शाळेतून घरी येताना बाई किवा गुरुजींच घरगुती कामं करण्यातही एक मजा होती. त्यातल्या काही मजेदार कामांची यादी गुरुजींच्या सायकलचे पम्चर काढून आणणे, पिठाच्या गिरणीतून खमंग भाजणीच दळण बाईनच्या घरी पोचवणं ,गुरुजींच्या घरी जावून त्यांचा डबा घेवून येणं, फाटी फोडून देणं,अशी काही मजेदार कामं तर बाईनच्या खास मर्जीतल्या मुली बाईसाठी अबोली - जाईचा गजरा गुंफून आणत , त्यांना सकाळी दोन चार हांडे पाणी आणून देत, संध्याकाळी बाई घरी निघाल्या कि या मुली पुन्हा बाईनसोबत त्यांची पिशवी सांभाळत घर गाठत कधी कधी बाई आजारी असल्या तर या मुली चार पाच दिवस बाईनच्या सेवेत असत अगदी त्यांना पुन्हा शाळेत घेवून येस तोवर यांची सोबत असे .काही असो पण तो जिव्हाळा वेगळाच होता.आम्ही हक्काने म्हणायचो गुरुजी उद्या सुट्टी आहे बोला काय काम आहे. थोडं डोकं खाजवत गुरुजी म्हणत असं म्हणतोस अरे त्या आमच्या बागेत जल्ला पातेरा किती झालाय उडवून दे उद्या दुपार पर्यंत कि आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी तयार दुपारपर्यंत बाग चकाचक साफ मग गुरुजी अभिमानाने लोकांना सांगत माझी पोरं नाहि हो मला काही करू देत. तेंव्हा त्यांचा चेहरा एक विलक्षण तेज आणून समाधान देत असे.

आज शिक्षक दिन ते जुने दिवस पुन्हा आठवले खरतर जे दिवस निघून जातात ते असेच कधी तरी आठवतात आणि आपण पुन्हा काही क्षण त्या विश्वात पुन्हा एक फेर फटका मारून येतो . पुन्हा नव्याची सुरवात करण्यासाठी

तसे सगळेच शिक्षक लक्षात राहणारे होते पण माझ्या मराठी शाळेतल्या नरवणकर बाई ,सैतवडेकर बाई , बोभाटे गुरुजी, पुळेकर आणि तलाठी गुरुजी, बर्वे बाई , कुलकर्णी बाई आणि असे अजून बरेच माझे गुरुवर्य ज्यांची आठवण फक्त शिक्षकदिनी नव्हे तर नेहमीच येते लिहताना एखादं अक्षर चुकलं किंव्हा तत्वतः न पटणारी गोष्ट केली कि गुरुजींच ते वाक्य आठवतं बाळ असं करू नये मी हेच शिकवलं का तुला ...... !!!

- संतोष टाकळे.


1 comment: